रामदास पेठ पोलिसांचा मनमानी कारभार? आंबेडकर जयंती मिरवणुकीस तोंडी नकाराने वाद पेटला

“नवीन मंडळ” कारण देत परवानगी नाकारल्याचा आरोप; लिखित आदेश नसल्याने नागरिक संतप्त

अकोला(प्रतिनिधी, प्रशिक मेश्राम):–
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीस रामदास पेठ पोलिसांनी तोंडी नकार दिल्याचा आरोप समोर येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, “नवीन मंडळ असल्यामुळे परवानगी दिली जाणार नाही” असे कारण सांगण्यात आल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन तारफैल परिसरातील तरुणांनी १८ एप्रिल रोजी शांततेत मिरवणूक काढण्याचे नियोजन केले होते. यासाठी आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी पोलिसांकडे अर्जही सादर करण्यात आला. मात्र, संबंधितांना कोणताही लिखित आदेश न देता तोंडी स्वरूपातच नकार देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, आयोजकांनी पोलिसांच्या वर्तणुकीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, परवानगीबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या तरुणांशी रामदासपेठ पोलिसांनी उद्धटपणे संवाद साधला असा आरोप त्यांनी केला आहे.
“१४ एप्रिललाच का मिरवणूक काढली नाही? १८ तारखेला परवानगी मिळणार नाही. आम्ही काय रिकामे आहोत का?”
— असा संवाद पोलिसांकडून झाल्याचा आयोजकांचा दावा आहे.

या घटनेमुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “नवीन मंडळ” हा निकष लावून परवानगी नाकारणे कितपत योग्य आहे, यावरही चर्चा रंगू लागली आहे.
संविधानाने दिलेल्या शांततेत एकत्र येण्याच्या अधिकारावर अशा प्रकारे मर्यादा आणल्या जात आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, आयोजकांनी पोलिसांकडे नकाराचे लिखित कारण मागितले असून, ते न दिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
कायद्याच्या जाणकारांच्या मते, परवानगी नाकारताना संबंधित कारणे स्पष्ट करणे आणि ते लिखित स्वरूपात देणे आवश्यक असते. अन्यथा, अशा निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
या प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, आता पोलिस प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.