अकोला जिल्ह्यातील २०२६ मधील पाचवा धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

रेहान शेख रशीद यास एक वर्षासाठी कारागृहात डांबले

अकोला, (प्रतिनिधी); अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई करत सन २०२६ मधील पाचवा धोकादायक इसम म्हणून कुख्यात अट्टल गोवंश चोर शेख रेहान शेख रशीद (वय २२) यास एम.पी.डी.ए. (M.P.D.A.) कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
अकोला शहरातील पिंजारी गल्ली, कच्छी मस्जीद मागे, मच्छी मार्केट परिसरात राहणाऱ्या शेख रेहान शेख रशीद याच्यावर यापूर्वी गोवंश जनावरांची चोरी, जनावरांना ठार मारणे किंवा विकलांग करणे, गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे, खोटी माहिती देणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तसेच अकोला जिल्ह्यातून हद्दपारही करण्यात आले होते. मात्र या सर्व कारवायांचा त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला नव्हता. वारंवार गुन्हे करत कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करत असल्याने त्याच्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांच्याकडे सादर केला होता.
मा. जिल्हादंडाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःच्या स्रोतांद्वारे माहिती मिळवून सदर इसम हा धोकादायक असल्याची खात्री केल्यानंतर दि. ०८/०२/२०२६ रोजी त्यास एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश पारित केला.
सदर आदेशानुसार शेख रेहान शेख रशीद याचा तात्काळ शोध घेऊन आदेश तामील करण्यात आला व दि. ०८/०२/२०२६ रोजी त्यास अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोउपनि. माजीद पठाण, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय ईश्वरप्रसाद शुक्ला तसेच पोलीस स्टेशन अकोट फाईल येथील पोनि. शेख रहीम व इतर पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेऊन पार पाडली.
दरम्यान, आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यांन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.