मालाबार ज्वेलर्समधून २.४८ लाखांचे दागिने लंपास! पोलिसांचा जलद तपास – २४ तासांत महिला चोर जेरबंद

स्थानीय गुन्हे शाखेची झटपट कारवाई; चोरलेला सोन्याचा ऐवज व गाडी असा सुमारे २.९८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अकोला | प्रतिनिधी : अकोल्यातील मालाबार गोल्ड अँड डायमंड शोरूम मधून चोरी गेलेल्या २.४८ लाख रुपयांच्या सोन्याच्या चैन प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत उलगडा करत महिला आरोपीला जेरबंद केल्याची धडक माहिती समोर आली आहे. या कारवाईतून पोलिसांनी २ चैन आणि चोरीस वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

दिवसाढवळ्या गहाळ झाल्या सोन्याच्या चैन

दिनांक ०८ मे २०२५ रोजी फिर्यादी प्रविण बालाजी वडजे यांनी पोस्टे सिव्हील लाईन, अकोला येथे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मालकीच्या मालाबार ज्वेलर्स मधून एक अज्ञात महिला ग्राहक सोंगात येऊन २४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, एकूण किंमत ₹२,४८,६२२/-, चोरून घेऊन पसार झाली होती.

या प्रकरणी गुन्हा क्र. १६५/२५ अन्वये कलम ३०५ भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आणि पोलिसांनी तपासाला गती दिली.

तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांची भूमिका निर्णायक

गुन्ह्याच्या उकलसाठी तांत्रिक विश्लेषण, सिसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा करण्यात आली. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी व पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

पोउपनि विनोद धर्माळे, पोकों प्रदीप पवार व नं. ६२९ सिव्हील लाईन पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या केलेल्या शोधकार्यातून महिला आरोपीला ओळखून तिला तातडीने अटक करण्यात आली.

चोरीचा माल व गाडी दोन्ही जप्त

तपासादरम्यान आरोपीकडून दोन्ही सोन्याच्या चैन हस्तगत करण्यात आल्या. शिवाय चोरीसाठी वापरण्यात आलेली ज्युपिटर दुचाकी (किंमत ₹५०,०००/-) देखील ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत एकूण ₹२,९८,६२२/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादीकडे सोन्याचा ऐवज परत

गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या चैनबाबत न्यायालयीन आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या फिर्यादी प्रविण वडजे व शोरूम मॅनेजर आकाश सुरेंद्र वाहुरवाघ यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. ही सुपूर्तता मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते करण्यात आली.


अवैध कृत्यांवर पोलिसांचा फटका, गुन्हेगारीला रोखण्यासाठी प्रत्येक विभाग सक्रिय; गुन्हेगार कितीही चलाख असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत, हे स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईतून पुन्हा सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.