26 दुकानांचे 40 लक्ष रुपयांमध्ये व्यवहार झाल्याची तेल्हारा शहरात चर्चा
अधिकारी आणि दुकानदार अंतर्गत व्यवहार करून कोट्यवधी ची जागा हडपण्याचा करत आहेत डाव?
तेल्हारा शहरात मध्यभागी अगदी नगर परिषद च्या समोर जिल्हा परिषद कन्या शाळा असून आज रोजी ती शाळा बंद पडलेली असून शाळेच्या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. जिल्हा परिषद कन्या शाळा विद्यार्थी पटसंखेमुळे बंद पडून बरेच वर्षे झाली होती, त्यानंतर जिल्हा परिषदेचे मा सभापती मा राजू बोचे ह्यांनी येथे जवळजवळ 15 वर्षे अगोदर आर आर पाटील महाविद्यालय चालू केले होते परंतु विद्यार्थी संख्येच्या अभावामुळे ते पण बंद पडल्याच्या स्थितीत आले. नंतर राजू बोचे ह्यांच्यात आणि जिल्हा परिषद प्रशासन मध्ये संबंधित शाळेच्या जागेवरून दोन्ही पक्ष कोर्टात गेले. कोर्टात निकाल हा जिल्हा परिषद च्या बाजूने लागून ती जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे हे सिद्ध झाले. तदनंतर राजू बोचे ह्यांनी आता उच्च न्यायालयात ह्या बद्दल अपील केली असून उच्च न्यायालयात सादर प्रकरण दाखल आहे. इथं जो निकाल येईल तो येईलच परंतु ह्या कोट्यवधी किंमत असणाऱ्या शाळेच्या जागेवर मागील 2 महिन्यांच्या पासून 26 दुकाने उभी करण्यात आलेली आहेत.
एक दुकानांची किंमत अंदाजे दीड लक्ष रु असे ठेवण्यात आली. दीड लक्ष रु द्या आणि आम्ही तुम्हाला ह्यात एक दुकान देऊ अशी चर्चा संपूर्ण शहरात चालू झाली. 26 दुकानांचे दीड लक्ष रु प्रमाणे जमा झालेले जवळ जवळ 40 लक्ष रु कोणाच्या घशात गेले ? ह्यात पंचायत समिती गटविकास अधिकारी व पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अजून गप्प का ? 40 लक्ष रु मधे ह्या अधिकाऱ्यांचे हात ओले झालेले आहेत का अशी चर्चा सामान्य नागरिकांच्या मध्ये होत आहे.
सदर जागेवर 2 वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघडी च्याच काही गोरगरीब पदाधिकारी ह्यांनी दुकाने टाकली ते तत्कालीन गट विकास अधिकारी भरतसिंग चव्हाण ह्यांनी पोलीस प्रशासन ला हाताशी धरून ते अतिक्रमण काढून टाकले होते. मग आज त्याच सामान्य वंचित च्या पदाधिकारी मध्ये चर्चा आहे की ह्या अतिक्रमण ला नेमका आशिर्वाद कोणाचा. आज पक्षाचे पंचायत समिती मधील पदाधिकारी पण का गप्प आहेत.सदर प्रकरणाची शहरातील पदाधिकारी ह्यांनी पक्षाच्या तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी ह्यांना तोंडी तक्रार केली होती पण त्या कडे सर्वांनी दुर्लक्ष केले. काही दिवस अगोदर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा सुनिल फाटकर ह्यांनी पण ह्या विषयावर गटविकास अधिकारी ह्यांना खुलासा मागितला होता परंतु तो अजून पर्यंत गट विकास अधिकारी ह्यांनी दिला नसल्याचे समजते.
शहरात अतिक्रमण मुक्त मोहीम राबवून शहर आज नवीन रूप धारण करत असताना परत शहराच्या मध्यभागी कोणाच्या आशीर्वादाने अतिक्रमण बसविल्या जात आहे हा प्रश्न आहे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष ह्या मध्ये लक्ष घालून झालेला घोटाळा उघडकीस आणतील का ह्या कडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


