🔥 जुगारपटूंना झटका – “ऑपरेशन प्रहार”अंतर्गत तीन ठिकाणी धाडी!

अकोला | प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशावरून अकोला जिल्ह्यात “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यांवर जोरदार धाड टाकत ८ आरोपींना अटक केली असून, २९,७३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १३ जून २०२५ रोजी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोट फाईल परिसरातील पुरपीडीत कॉलनीत छापा टाकत चार जुगारपटूंना रंगेहाथ पकडले. आरोपींमध्ये अनिल मोरे, नदिमशहा अजमजशहा, भिमराव लांडे आणि उस्मानशहा लुकमानशहा यांचा समावेश असून, त्यांच्या ताब्यातून ८,०५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यानंतर १४ जून रोजी, डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर परिसरात धाड टाकण्यात आली. येथे सागर पूर्णये आणि प्रशांत ठाकूर यांना अटक करत १५,४५० रूपयांचा जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

तसेच, खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डायमंड स्कूलजवळील ठिकाणी कारवाई करत निलेश नागरीकर आणि शिवप्रसाद बरदीया यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६,२३० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या संपूर्ण कारवाईत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून, २९,७३० रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत महेंद्र मलीये, अविनाश पाचपोर, वशीमोद्दीन, रवि खंडारे, अब्दुल माजिद, अशोक सोनवणे, उमेश पराये, आकाश मानकर, स्वप्ना चौधरी आदींचा सक्रिय सहभाग होता.

पोलीस विभागाकडून यापुढेही अशा अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.