भारताचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली राहला आहे. भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेने जगाला एक वेगळी दिशा दिली आहे.
शांती आणि विविधतेत एकता ही आपल्या देशाची जागतिक पटलावर ओळख आहे.
भारत हा जेवढा वरून समृध्द देश वाटतो तो तितकाच आतून पोकळ आहे. कारण विटांवर विट ठेवून तुम्ही एखादी खोली बनवू शकता पण घर नाही. तसेच तुम्ही बाह्य अंगाने विकासाचा मुलामा लावून देशाला विकसनशील देशा कडून विकसित देशाकडे घेवून जाल ही पण देशाचा प्राण असणाऱ्या परंपरा, तत्व, विचार,प्रेम,बंधुभाव ,एकात्मता, समता हा विचार समृध्द केल्याशिवाय तुम्ही सुखी संपन्न होऊच शकत नाही. कारण हजारो वर्षापासून भारत देशवासीयांनी अनेक प्रकारचे अत्याचार सहन केले आहे. धार्मिक दंगली, जातीवाद, प्रांतवाद, रंगवाद, वंशवाद अशा कित्येक प्रकारच्या वादात देशाची सामाजिक परिस्थिती ढासळत चालली आहे.
जिथे अन्याय होईल तिथे क्रांती होईल हा एक प्रकारचा नियतीचा नियमच झाला आहे.
या सर्वांमध्ये अन्यायावर प्रतिकार करण्यासाठी नेहमी कुठली ना कुठली चळवळ उभारल्या गेली.
म्हणून मानव मुक्तीसाठी अनेक संतांनी, महापुरुषांनी, क्रांतिवीरांनी, समाजसुधाकांनी आपले प्राण पणाला लावून मानवी मूल्ये अबाधीत राहण्यासाठी व्यवस्थे विरोधात आवाज उठवून लढा दिला. परीवर्तन घडवुन आणण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक व माध्यम बनली ती म्हणजे चळवळ.
त्यात कामगार चळवळ,आदिवासी चळवळ, दलित चळवळ, मागासवर्गीय चळवळ, स्त्री चळवळ, कष्टकरी चळवळ, विद्यार्थी चळवळ, मध्यमवर्गीय चळवळ, मानवी हक्क आणि पर्यावरण वादी चळवळ, प्रबोधन चळवळ,फुले,शाहू, आंबेडकर चळवळ इत्यादी चळवळींचे प्रकार सांगता येतील त्या प्रत्येक चळवळीचे स्वरूप भिन्न भिन्न असतात.
चळवळ ह्या अनेक टप्प्यातून मार्गक्रमण करीत विकसित होत असतात समाज व्यवस्थेपुढे रोज अनेक समस्या उभ्या राहतात काही घटकांवर ते अन्याय होतो तर काही घटक विशिष्ट लाभापासून वंचित राहतो त्या वेळी त्यांच्यातील अथवा बाहेरील एखाद्या विचारवंत समाज सुधारक आपल्या विचारांची मांडणी करतो आणि त्या शोषित समाजाला आपल्याकडे आकर्षित करून चळवळ सांगतो. समाजातील लोकांचे हक्क त्यांच्यावर होणारे अत्याचार यांचे हितसंबंध हे काही लोकांच्या विचारात येतात त्यामुळे पीडित समाज एकत्र संघटित होऊन या चळवळीचे स्वरूप प्राप्त होते.
तेव्हा अशा बऱ्याच चळवळी संदर्भात आपण जाणून त्यांच्या मुळापासून ते फळापर्यंत लिहिल्या गेले पाहिजे म्हणून आज त्याच विषयवार आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी हा लेख लीहण्याचा अट्टाहास करतो आहे.
आज महाराष्ट्रात कोणतेही महत्त्वाचे आंदोलन असो मराठी माणूस राष्ट्रीय पातळीवर चळवळीच्या अग्रभागी जाणारा लढवय्या म्हणून ओळखला जातो. या नेतृत्वाचा इतिहास थेट तथागत गौतम बुद्ध, चक्रधर स्वामी यांच्या पासून ज्ञानोबा-तुकोबा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र दाभोळकर, मेघा पाटकर पर्यंत येतो . पण आज जर बघितलं तर आंदोलकांनी रस्त्यावर कमी आणि सोशल मीडियावर जास्त भरली जात आहेत याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला असून भांडवलशाही बाजार केंद्रीय व्यवस्था आणि बदलती जीवनशैली यामुळे जन आंदोलनाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. म्हणून या चळवळीचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते.
चळवळ ही जुनाट चालीरीती रूढी परंपराना विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी असते. समाजात होत असलेला विकास जर स्वातंत्र्य समता बंधुता या सामाजिक मुल्यांना धरून होत नसेल तर या मूल्यापासून वंचित असलेला समूह एका समान पातळीवर येऊन विचारप्रणाली, नेतृत्व आणि कार्यकर्ते यांचे नियोजन करून एकत्र येतात व आंदोलन, मोर्चे, घेराव ,उपोषणाच्या मार्गाद्वारे ते मिळविण्याचा प्रयत्न करतात ती म्हणजे चळवळ असते.
भारताने लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकांच्या मागण्या संसदेत मांडतील असा हेतू होता पण तेच प्रतिनिधी लोकांच्या विरोधात धोरणे राबविताना दिसून येतात तेव्हा करोडोंच्या आशा-आकांक्षा घेऊन संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेला जी बाहेरून धडक मारते ती असते चळवळ.
जागतिक कीर्तीचे विचारवंत पॉल विल्किन्सन म्हणतात “समाजाच्या कोणत्याही स्तरावर मोठ्या प्रमाणात सामुहिक बदल घडविण्यासाठी साम-दाम-दंड-भेद असे कोणतेही धोरण स्वीकारण्याची तयारी ठेवून काम करते ती म्हणजे चळवळ”
हजारो वर्षापासून सुरू असलेल्या या चळवळीचा इतिहास जर बघितला तर ज्यावेळी समाजव्यवस्थेपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या , काही घटकांवर अन्याय करून त्यांना विशिष्ट लाभांपासून वंचित ठेवण्यात आले अशावेळी त्या समाजामधील विचारवंत समाज सुधारक यांनी क्रांती घडवून आणली आणि इथल्या शोषित समाजाला एकत्रित करून अनेक चळवळी उदयास आल्या.
जुनाट चालीरीती रूढी परंपरांना यांनी मानवी जीवनावर घाव करत अमानविय कृत्य करायला सुरुवात केली आणि धर्माच्या नावावर अन्याय अत्याचार करत वर्णवादी विचारसरणी रुजविण्याचे काम काही मनुस्मृती विचार सरणीच्या कर्मठ लोकांनी सुरू केले असता तेव्हा शिव्या शाप देणाऱ्या ओठांवर ओव्या खेळवण्याचे काम संतांनी केले. माणसाला माणूसुकीची वागणुक मिळावी या साठी आपले जीवन मातीमोल करत सामाजिक क्रांति घडवून आणली त्यात अनेक संतानी आपले प्राण पणाला लावले ती म्हणजे सर्व चळवळींना मार्गदर्शन ठरणारी संत चळवळ होती.
पुढे 1857 स्वातंत्र चळवळीत सुरू झालेला प्रवास पुढे असहकार चळवळ, वंगभंग चळवळ, स्वदेशी चळवळ शेवटी स्वातंत्र्याची ठिणगी ही 1942 च्या चलेजाव आंदोलन पर्यंत क्रांतीची मशाल होऊन जाते. मग भगत सिंग, राजगुरू, सुखदेव,राम प्रसाद बिस्मिल यासारख्या तरुणांनी गुलाम असणाऱ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभारली ती स्वातंत्र्याची चळवळ होती.
देशात हजारो वर्षापासून रुजलेला वर्गवाद,वर्णवाद,जातीवाद याविरोधात संतांनी सामाजिक विद्रोह केला. तोच विचार फुले-शाहू-आंबेडकरांनी समता,बंधुता, सामाजिक न्याय,धर्मनिरपेक्षता ही मानवी मूल्य रुजवून समाजाला माणूसपण बहाल केले. ती सामाजिक चळवळ होती.
धर्माने आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेने घालून दिलेल्या बंधनांना तोडत स्त्री मुक्तीसाठी लढणाऱ्या ताराबाई शिंदे पासून तर कमला बसिन पर्यंत अनेक स्त्रिया लढल्या मग त्यामध्ये मंदिर प्रवेश, मासिक धर्म व मि टू सारख्या चळवळीचा समावेश झाला ती स्त्रीवादी चळवळ होती.
समाजातील विशिष्ट एका वर्गाला जेव्हा हीन दर्जाची वागणूक देऊन शूद्र म्हणून हिनवल्या जायचं त्यांचा स्पर्श ही विटाळ वाटायचा अशा अवस्थेत दलितांचा स्वाभिमान जागृत करून समतेची बीजे रोवली ती दलित चळवळ.
भांडवलदारांनी कामगारांचे शोषण करून त्यांना गुलामाप्रमाणे ठेवायचे ही वृत्ती मोडीस काढत श्रमाला मूल्य आणि मजुराला प्रतिष्ठा मिळण्यायासाठी अण्णाभाऊ साठे यांनी उचलेलं पाहिलं पाऊल म्हणजे कामगार चळवळ.
कृषिप्रधान देशात जर शेतकरी विरोधी धोरणे, दुष्काळग्रस्त शेती आणि झोपी गेलेले सरकार हे कोडं जेव्हा सुटत नसेल तर इथल्या व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्यासाठी भारत बंद, महाराष्ट्रातील मोर्चे, उपोषणे आणि पंजाब शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन ह्या सर्व चळवळीला समावेश ज्यात होतो ती शेतकरी चळवळ.
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा बेशिस्तपणा, अराजकता या बाबींची जाणीव जागरूक व शिक्षणाने प्रभावित झालेल्या येथील तरुण वर्गात झाली व त्यातून प्रबोधनाची चळवळ पुढे आली.
देशाला समता, बंधुता, धर्मनरपेक्षता, सामजिक न्याय ह्या मूल्यांची जाणीव करून देत आधुनिक विचाराची पेरणी करण्यासाठी उभारली ती फुले, शाहू, आंबेडकर चळवळ.
अशा अनेक चळवळी संपूर्ण जगभरात घडल्या आणि घडत आहे यातून क्रांतीचे बीजे वेळोवेळी समाजात रोवण्यासाठी कित्येक संतांनी, महापुरुषांनी, समाजसुधारकांनी, नेत्यांनी, साहित्यिकांनी, कलाकारांनी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे देशातील तरुणांनी प्राण पणाला लावले आहेत.
पण कोणतीही क्रांति ही युवकांशीवाय होऊ शकत नाही हे तेवढच सत्य आहे. नेहमी क्रांतीचे बीजे रोवण्याचे काम इतिहासात युवकांनी केले आहे.
असे अनेक उदाहणांवरून आपल्याला पाहायला मिळेल की तरुणांनी चळवळीत भरीव कामगिरी केली आहे.
इथल्या चळवळीने तरुणांना परिवर्तनाचं, विवेकाचं, माणुसकीचं, उमद्या जीवनशैलीचं सूत्र हाती देऊन जगण्याचं बळ दिलं अन स्वाभिमानाने ताठ उभं केलं.
याच तरुणांना संदर्भात बाबा आमटे आपल्या लेखात म्हणतात “तरुण तो असतो जो इतिहासात रममाण न होता इतिहास घडविण्यासाठी प्रयत्न करतो, दुसऱ्याच्या धोपड मार्गावर न चालता स्वतःचे नवीन मार्ग प्रस्थापित करतो.”
पण आता हेच तरुण चळवळीविषयी उदासीन होऊन का बसले आहेत या कारणमीमांसेचे नकारात्मक पैलू पाहणे ही महत्वाचे आहे.
कारण इथल्या व्यवस्थेने तरुणांना सोशल मीडियाच्या मायाजाळात व 1.5 GB डेटामध्ये गुंतवुन ठेवले आहे. मग काश्मीरच्या प्रश्नात खेडवलं जातं, सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून देशभक्त नाही तर अंधभक्त निर्माण करून त्याच्या हातात झेंडे देऊन मंदिर वही बनाऐंगेचे नारे दिले जातात, nrc caa npr च्या माध्यमातून धर्मीक आणि भावनिक मुद्द्यात गुंतविन्याचे काम इथली व्यवस्था करायला लागते. तेव्हा तरुण उदासीन होऊन जातो.
मग कवी विशु स्पंदन म्हणतात कसे “गर्दीच फार झाली नुसतीच भावनांची, रक्तामध्ये कुणाच्या चळवळ जिवंत नाही.”
ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची आहे.
जेव्हा एखादा तरुण सामाजिक चळवळीत काम करत नेतृत्व करायला लागतो तेव्हा प्रस्थापित नेते त्याचा वापर कार्यकर्ता म्हणून नाही तर भाजीतल्या कडीपत्या सारखा करतात. मग कडीपत्ता झालेल्या कार्यकर्त्यांची चळवळीबाबत उदासीनता वाढायला लागते.
चळवळीतला नेता जेव्हा मोठा होतो तेव्हा तो स्वार्थापोटी चळवळीची दिशाच बदलत असेल तर प्राण पणाला लावून निर्माण केलेल्या चळवळी उध्वस्त व्हायला लागते. मग उद्ध्वस्त चळवळीमध्ये तरुणांचे स्थान काय या विचारांमध्ये तरुण उदासीन होऊन जातो.
एखादी पुरोगामी विचारावर चालणारी संघटना जर भविष्यात प्रतिगामी लोकांसोबत हातमिळवणी करत असेल तर त्या संघटनेतील तरुणांची उदासीनता वाढायला लागते.
सध्याच्या व्यवस्थेने आम्हाला भांडवलशाहीचे गुलाम केले आहे. खाजगीकरनात परीक्षा रद्द भरती बंद कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
तेव्हा प्रायव्हेट जॉब आणि सरकारी नोकरी या रेस मध्ये अडकलेल्या तरुणांचा चळवळीमध्ये असणारा वाटा कमी होत जातो.
कारण चळवळीच्या विरोधामध्ये धर्माच्या जातीच्या असंख्य ढाली तलवारी आल्यातर त्या चळवळीतील माणसांना मारू शकतात पण त्यांच्या विचारांना नाही. म्हणून माणसे मेली तरी चळवळ जिवंत राहते.
चळवळ जिवंत ठेवण्यासाठी गरज आहे ध्येयवेड्या तरुणांची जे आर्थिक बाजारपेठेत स्वतःच्या आयुष्याची माती न करता चळवळीसाठी स्वतःला झोकून देतील. सामाजिक आर्थिक सांस्कृतिक या चळवळीच्या अंगांना बळकटी प्रदान करण्यासाठी काम केले पाहिजे. सत्यासाठी सत्तेला जाब विचाणांऱ्या तरुणांना आता बंड पुकारावा लागेल. चळवळीच्या मुळाशी असणाऱ्या तत्वज्ञान पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल.
चळवळीला गतिमान करावे लागेल. हे सर्व आपण सर्व तरुण वर्ग मिळून करून शकतो तेव्हा आता चला पुन्हा एकदा या व्यवस्थेला ठणकावून सांगू चळवळ अजून आमच्या ह्रुदयात जिवंत आहे.
लेखक:-
विशाल लक्ष्मण नंदागवळी
सिद्धार्थ वाडी, संजय नगर,
नायगाव,अकोला
मो.9822480764