तलाठी भरती मध्ये भरमसाठ फी लुट आणि दलाल सक्रीय असल्याने गैरप्रकारांची शंका – वंचित युवा आघाडी

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४,६४४ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत, भरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गासाठी ५००, तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकडून ३५० रुपये परीक्षा शुल्क आकारले होते. मात्र, यंदा त्या तुलनेत त्यात दुप्पट वाढ करून खुल्या प्रवर्गासाठी १०००, तर मागासवर्गीयांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क तीनपट वाढ केल्यामुळे तलाठी पदासाठी अर्ज करताना मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक लुट करण्यात येत आहे.२३ जुलैपर्यंत शासनाकडे १२ लाख ७७ हजार १०० अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल १२७ कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. एवढंच नाही तर हा आकडा येत्या दोन दिवसात अजून वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे एवढं शुल्क रक्कम मिळूनही परीक्षा पारदर्शक होत नाहीत, हा मागच्या काही परीक्षांचा अनुभव आहे. मागील परिक्षा मध्ये गुन्हे दाखल होवुन देखील ह्या परिक्षा साठी दलाल सक्रिय आहेत त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक होणार असल्याची साधार शंका वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारने नोकरी त्या नावावर खाजगी कंपनी व सरकारची तिजोरी भरायला ही क्रुर शुल्क आकारणी केली आहे, ही बेरोजगारांची लुट आहे.त्यामध्ये खुल्या व मागासवर्गीय बेरोजगारांवर शासकीय दरोडा टाकला जातो आहे.राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्याची घोषणा झाली होती, मात्र ही घोषणा हवेतच विरली. त्यानंतर होणारी ही पहिलीच भरती होय. त्यामुळे ही भरती वय वाढत चाललेल्या अनेक तरुणांना आशेचा किरण निर्माण झाला. त्यामुळेच तलाठी पदासाठी अनेक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही अर्ज केले आहेत.हि बेरोजगारीची विदारक स्थिती विषद करते.उच्चशिक्षित तरुण नोकर भरतीच्या अनुषंगे सरकारी धोरणावर संताप व्यक्त करताहेत.एकूणच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये हजारो पदे रिक्त असताना सरकार वर्षांनुवर्षे शासकीय भरती काढत नाहीत. अन् काढली की बेरोजगार तरुण ती मिळवण्यासाठी अनेक वर्षे परिश्रम करणारे बेरोजगारांची फसवणूक व लुट केली जाते.

मागील (२०१९) तलाठी भरतीमधील घोटाळ्यांचा अनुभव बघता ह्या पदभरतीमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहेच.मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेली उपकरणे वापरून पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. येथील अनेक गावे गैरप्रकारात सहभागी असल्याचे याआधी समोर आले आहे. सूक्ष्म आकाराचा कॅमेरा, प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र परीक्षा केंद्राबाहेर पाठवणे, बाहेरून ‘मायक्रो ब्लूटूथ ‘द्वारे उत्तरे मागवण्याचे प्रकार याआधी समोर आले आहेत. तलाठी भरती – २०१९, आरोग्य पदभरती – २०२२, म्हाडा भरती, पिंपरी चिंचवड पोलीस भरती – २०२२, मुंबई पोलीस भरती -२०२३ आदी नोकर भरतीमध्ये या टोळ्यांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. म्हाडा पदभरतीत ६० आरोपी, पिंपरी चिंचवड ५६ आरोपी, तलाठी भरती १२ आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत.२०१९ मध्ये झालेल्या तलाठी जाहिरात येताच काही विद्यार्थ्यांना दलालांकडून संपर्कही करण्यात आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. याच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मुंबई पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आणले होते. यापूर्वी २०१९ मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यात झालेला गैरप्रकार सर्वश्रूत आहे.
त्यामुळे यावेळी साडेचार हजारांवर पदांसाठी होत असलेल्या भरतीमध्ये गैरप्रकार होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. असा गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी मागणीही देखील वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.