
अकोला, दि. ८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाजपरिवर्तनासाठी समर्पित महिलांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. बी. नानवाला होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जया वजीरे व सुषमा शिरसाठ उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मिलिंद इंगळे यांच्या “घे ग तू भरारी” या प्रेरणादायी गीताने झाली.मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणांमध्ये महिलांना सक्षम करण्याचे महत्त्व, कायद्याबाबत जागरूकता आणि समाजातील त्यांचा सन्मान यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. प्राचार्य नानवाला यांनी विद्यार्थ्यांना मातृप्रेम, त्याग आणि पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.यावेळी रिजवान खान, कोमल आठवले, महेश यादव, कोमल चिमणकर, पुनम चिखलकर, अस्मिता शेवगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. समाजकार्य विभागाच्या विद्यार्थिनी राखी वाहूरवाघ, जया पटेल, सृष्टी वानखडे, मनीषा भिलावकर, अंजली सरकटे, अस्मिता इंगळे आणि रजनी इंगळे यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.पत्रकारिता विभागातील प्रवीण वानखडे यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पालकांची महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकला. तसेच काजल पांडे, सुप्रिया तेलगोटे, मृण्मयी शेगोकार यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रावण खंडारे यांनी केले. हा प्रेरणादायी कार्यक्रम महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला.