आंबेडकरी चळवळीतील लोककवी उत्तमदादा फुलकर यांचे दुःखद निधन

आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनाचा आवाज थांबला

उत्तमदादा फुलकर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा लेख, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम !

चळवळीतील तमाम शाहिरांना सविनय जयभीम !

जगात अनेक कवी होऊन गेले आणि होतील पण लोककवी कविसूर्य वामनदादा कर्डक यांच्या सारखा कवी शाहीर होणे नाही. म्हणून आंबेडकरी शाहिरांची परंपरा लिहितांना दादांचे समकालीन आणि त्यांच्याही अगोदर असलेल्या शाहिरांना वंदन करतो कारण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शाहिरांचे एक गाणे तर माझी दहा भाषणे असा शाहिरांचा सन्मान करणारा महापुरुष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत या वरून आपल्या असे लक्षात येते की समाज जीवनात कवीला किती महत्वाचे स्थान आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीसाठीच्या लढ्यात प्रचंड संघर्ष आपल्याला दिसून येतो. या संघर्षात्मक लढ्यातूनच दिन दुबळ्या बहुजन समाजाला स्वभिमानाचे जीवन आज जगता येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने जागृत झालेल्या प्रतिभा कविता आणि गीताच्या रुपाने जेव्हा समजात पाझरायला सुरुवात झाली तेव्हा घराघरात बाबासाहेबांचे विचार प्रचंड प्रमाणात रुजल्या गेले या मध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांनी आंबेडकरी चळवळीला नव संजीवनी मिळाली व समजात आंबेडकरीमय वातावरण निर्माण झाले. महाकवी वामनदादा कर्डक यांची गाणी आंबेडकरी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचीअसून या मुळे समाजाला प्रचंड उर्जा मिळाली असल्याचे आपल्याला दिसून येते. याच मार्गातील वामनदादा कर्डक यांचा वारसा प्राणपणाने पुढे नेणारे लोककवी उत्तमदादा फुलकर आपल्याला दिसून येतात. उत्तम फुलकर यांनी वामनदादा कर्डक यांना गुरुस्थानी मानून आपल्या आंबेडकरी शाहिरिला प्रारंभ केला आज उत्तमदादा फुलकर यांची गाणी समाज मनात प्रबोधन करताना आपल्याला दिसून येतात. हजारो भीमगीतांचे लेखन करुन त्यांची गाणी समाज प्रबोधनाचे कार्य करित असताना आपल्याला दिसून येत आहे.मुळात उत्तम फुलकर हे बुलढाणा जिल्ह्यातील पाळोदी गाव चे त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते तीन वर्षाचे होते.

त्यांचा जन्म दिनांक- 30 / 12 / 1949 रोजी त्यांच्या आजोळी म्हणजेच जलंब येथे झाला वडिल नसल्याने त्यांचे संगोपन आणि इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या मामांनी व आजोबांनी केले. खामगाव पासून जवळच असलेले जलंब हे गाव रेल्वेच्या मार्गावर असल्याने चळवळीचे गाव म्हणून संबोधले जायचे याच ठिकाणी आरंभीच्या काळात महाकवी वामनदादा कर्डक यांचे वास्तव्य जलंब मध्ये होते. वामनदादा कर्डक यांनी स्थापन केलेली विदर्भातील पाहिली व एकमेव गायन पार्टी ही जलंब चीच आहे. या गायन पार्टीचा उत्तम फुलकर यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला असल्याचे आपल्याला दिसून येते . या मधूनच उत्तम फुलकर यांची गाणी बहरत गेली.घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी गाणं सोडलं नाही. वामन दादा कर्डक याना गुरूस्थानी मानून आंबेडकरी चळवळीत त्यांनी आपलं योगदान संपुर्ण बहाल केलं आंबेडकरी गीत व कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी विचार समजात पेरण्याचे कार्य केले.आंबेडकरी विचारांचा व चळवळीचा प्रभाव हा महाकवी वामन दादा कर्डक यांच्या सहवासातून त्यांना मिळाला.जलंब येथे वामन दादा कर्डक यांचे वास्तव्य होते. याचा विसर पडू नये म्हणून त्यांनी जलंब च्या एका विभागाला “वामनदादा कर्डक नगर” ग्रामपंचायत चा ठराव घेऊन असे नामकरण करण्यात आले व या नगराचे उदघाटन खुद्द वामन दादा कर्डक यांच्या हस्ते करुन घेतले हा प्रसंग आंबेडकरी चळवळी साठी एतिहासासिक आहे. वामन दादा कर्डक यांच्याप्रती असलेली भावना, आदर आणि प्रेम या शिष्याने काळजात गोंदऊन ठेवल्याचे आपणास दिसून येते.

उत्तम फूलकर हे आंबेडकरी चळवळीतील एक महत्वाचं नाव असून गावोगावी पायी फिरून बाबासाहेबांची गाणी गात त्यांनी आपलं संपुर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीतील समाज प्रबोधनासाठी अर्पण केल्याचं आपल्याला दिसून येते. एक हार्मोनीयम पेटी आणि काही साथीदार सोबत घेऊन या गावावरुण त्या गावी जाने आणि बाबासाहेबांची गाणी गात राहणे घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी गाण्याचा विसर पडू दिला नाही. शाहिरी चळवळीत त्यांनी अनेक शिष्य घडविले त्या मध्ये समदूर सारंग हे एक आहेत . समदूर सारंग यांची गाणी एकतांना उत्तम दादा फुलकर यांच्या चळवळीतील योगदान आपल्याला लक्षात येते. आज ही वयाने जरी थकले पण विचाराने थकले नाहीत. त्यांनी वामन दादा कर्डक यांची परंपरा भीम गीतांच्या माध्यमातून गतिमान करीत असतांना दिसून येतात .त्यांच्या ” उत्तमा ” या भीम गीत संग्रहातून आपल्याला दिसून येते फुलकर म्हणतात.

जगायचे असेल तर मग सोड धाक

रेमारायचे असेल तर मग डोळे झाक,

रेयेता कानी तुझ्या अन्यायाची हाक

रे अनेक घरट्यांची पिल्ले व्हावी एक रेभर्ररं रं SSS

जमा व्हावी पाखरे बाबासाहेबांच्या नंतर समजात झालेली गटबाजी आंबेडकरी चळवळीला घातक आहे. म्हणून समाज बांधवांनी गटबाजी न करता समाजाच्या उद्धारासाठी एकत्र रहायला पाहिजे, एकीत रहा एक रहा हा संदेश कवी देतात. त्यांच्या लेखणी चे वैशिष्टये असे की आंबेडकरी समुह हा एक संध राहावा या साठी त्यांनी विविध गाणी लिहली याही पुढे जाऊन ते म्हणतात.

झाला सग्याहून सगात्यानं ठेवली नाही जागा असं दखवाया कुणाला बोटं,

होतं भीमाचं माय भीमाचं मन लय मोठं..

रक्ताच्या नात्या पेक्षा आम्ही आंबेडकरी चळवळीचं नातं महत्वाचं मानतो.आंबेडकरी चळवळच आमचं गणगोत आणि जीव की प्राण आहे.म्हणून बाबासाहेब हे आमचे सर्वकाही आहेत. वरिल गीत हे सोशल मिडियावर खूपच प्रसिद्ध आहे.कारण आमच्या जीवनात जो आमुलाग्र बदल झाला तो बाबासाहेबांच्या विचारांनी म्हणून बाबासाहेबांनी बहुजण समाजासाठी जे काही करुन ठेवले आहे. याला जगात तोड नाही. म्हणून माझ्या भीमाचं मन लय मोठं असून ते आमचा बाप आहेत. म्हणून उत्तम दादा फुलकर म्हणतात.

माझा आबा म्हणे बाप

माझा बाप म्हणे बाप

मी ही म्हणतो बाप

माझं पोरगं म्हणते बाप

असं शोधून पहा जगात

असं आहे काय कुणाचं कुणाशी

माया भीमा सारखं नातं

अशी एका पेक्षा एक सरस भीमगीतं लिहून उत्तमदादा फुलकर यांनी आंबेडकरी चळवळीला गतिमान केल्याचे आपल्याला दिसून येते. बाबासाहेबांचं आणि आपलं नातं काय आहे. या गीतात उत्तम फुलकर सांगतात.कारण समजात सर्वात महत्वाचं नातं माय बापाचं आहे. म्हणून पिढ्यांन पिढ्या झाल्या तरी बाबासाहेब हे आमच्या साठी बापच आहेत. आणि बाप राहतील म्हणून जगात असं नातं असणारा महामानाव फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांचे विचार समजात प्रचंड ताकदीने महाकवी वामन दादा कर्डक यांच्या नंतर पेरणारा कवी म्हणजे उत्तम फुलकर आहेत. फुलकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रत्येक घटकांवर व चळवळीवर अनेक गीतांचे लेखन करुन समजात सादर केल्याचे आपल्याला दिसून येते तसेच आंबेडकरी चळवळी पूर्वी कशी होती आणि आता कशी आहे याचे ही जीवंत चित्रण त्यानी पुढील गीतात सांगितले आहे. ते म्हणतातभीम बाबा तुझ्या लेकरांची

चाकारांची निळ्या पाखरांचीजनू ताकद खचू लागली रेशक्तीशाली संघटना ही पोलादीकाचावाणी ठिसू लागली रे वरिल गीत आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडते आणि आपण चळवळीत आपलं योगदान शोधायला लागतो म्हणून आपली आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी सर्वानी आता आपआपसातील हेवे दावे दूर सारुन आपलं संघटन मजबूत करा हा संदेश कवी देतातअसो मित्र हो ! आंबेडकरी समाजात धर्मांतरा नंतर जो बदल झाला जे परिवर्तन घडवून आले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही म्हणून हा इतिहास माणसांचा इतिहास आहे या मध्ये हजारो वर्ष गुलामीत जगणारा समाज माणूस म्हणून स्वातंत्र जीवनाचे गीत गात राहिला ते केवळ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड परिश्रमाने त्यांनी केलेल्या संघर्षाने म्हणून आजचा माणूस स्वाभिमानाने जीवन जगतांना आपल्याला दिसतो.म्हणूनच जगात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर लाखो गाणी आपल्याला लिहलेली आणि गायलेली दिसतात . याच विचारातून बाबासाहेबांना प्रेरणास्थान मानून लोककवी वामनदादा कर्डक यांनी हजारो गाणी लिहून गायली आणि घराघरात बाबासाहेबांचे विचार पेरलेत वामनदादांनी त्यांच्या संसाराची पर्वा न करता बाबासाहेबांचं गाणं गाऊन आंबेडकरी चळवळीला गतिमान केले , वामनदादा कर्डक यांच्याच मार्गाने मार्गस्थ होऊन लोककवी उत्तमदादा फुलकर यांनी सुध्दा चळवळीला हातभार लावल्याचे आपल्याला दिसून येते.

मित्र हो ! लोककवी वामनदादा कर्डक यांची गाणी ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालेलो आपण या पिढीतील सर्वचजण आहोत दादांनी जसे विचार पेरलेत तसेच माणसे सुध्दा पेरलीत त्यांच्या या अनेक पेरलेल्या माणसा मधूनच लोककवी उत्तमदादा फुलकर एक आहेत . आंबेडकरी चळवळीत अनेक कवी शाहीर दादांनी निर्माण केलेत त्यामधील उत्तमदादा फुलकर एक आहेत या ठिकाणी सर्वांचाच उल्लेख करणे मला शक्य नाही कारण दादा म्हणतात जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा मी वादळवारा मी वादळ वारा या वरून आपल्या लक्षात येईल म्हणून त्यांच्या विषयी कितीही लिहले तरी कमीच आहे .मी चळवळीत काम करीत असतांना मला अनेक माणसं भेटत गेली काहींची वाहवा केली नाही म्हणून तुटत गेली परंतू अस्सल फक्त अन फक्त बाबासाहेबांची गाणी गाऊन समाज प्रबोधन करणाऱ्या पैकी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नंतर अभिमानाने आणि स्वाभिमानाने ज्यांचं नाव घ्यावं अश्या अनेकांपैकी उत्तमदादा फुलकर हे एक आहेत .

उत्तमदादांनी गाण्या साठी कधीच तडजोड केल्याचे ऐकण्यात नाही त्यांनी अत्यंत गरिबी भोगली गरिबीत असतांना मात्र त्यांनी गाण्याचं भांडवल केलं नाही .बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त त्यांनी पैश्याच्या लालसे पोटी कुठल्याच बुवा बाबांचे गाणे म्हटले नाही यातच त्यांचा आंबेडकरी बाणा समाजाला दिसून येतो आणि वामनदादांचे खरे शिष्य शोभून दिसतात म्हणून मी त्यांना सविनय जयभीम ! करतो. आपल्या समाजात अनेक मोठ मोठी कवी शाहीर आहेत नाही असे ही नाही पण , बाबासाहेबांवर जीव ओवाळून टाकणारी मोजकीच कवी माणसं आपल्याला दिसून येतात .आंबेडकरी चळवळीला गतिमान करणारी समाजाला अभिप्रेत असणारी गाणी उत्तमदादा फुलकर यांनी लिहली आणि गायली म्हणूनच त्यांच्यातील प्रखर आंबेडकरवाद चमकतो . उत्तमदादा फुलकर यांच्या सोबत चर्चा करीत असतांना त्यांनी चळवळी विषयी आणि वामनदादा कर्डक यांच्या विषयी च्या आठवणी सांगतांना माझे हृदय भरून येत होते उत्तमदादा सुद्धा गहिवरले होते . लोककवी समदुर सारंग यांच्या विषयी त्यांनी भरभरून सांगितलं समदुर सारंग त्यांचे शिष्य असल्याचे त्यांना अभिमानच आहे उत्तमदादा फुलकर यांची अनेक गाणी समदूर सारंग यांनी त्या काळात गायली त्यांचे जीवन सुध्दा गाता गाता च संपले उत्तमदादा फुलकर आणि समदुर सारंग हे त्रिकुट अत्यंत महत्वाचे आहे .कारण सांगायचे विशेष असे की उत्तमदादा गीत लिहितांना शिष्यांचे सुध्दा नाव गाण्यात छापायचे आज पर्यंत सुद्धा अनेकांना माहीत नाही की हे गाणं उत्तमदादा यांचं आहे की समदुर सारंग यांचं आहे इतकी महत्वाची शैली उत्तमदादा फुलकर यांनी रुजविली आहे . पण ज्या ज्या गाण्यात उत्तमदादा फुलकर यांचं नाव आहे ते गाणे उत्तमदादा यांचे आहेत तसेच समदुर सारंग यांची गाणी सुध्दा अत्यंत महत्वाची असून त्यांनी समाजमनात नक्कीच घर केल्याचे आपल्याला दिसून येते आंबेडकरी चळवळीत जे जे प्राणपणाने लढले नंतर त्यांचा शेवट अंगावर काटे आणणारा आहे मी वामन दादांचा शेवट आणि शाहीर समदुर यांचा शेवट जवळून बघितला म्हणून चळवळीतील माणसाची अवस्था काय असते ? हे ज्याचे त्यालाच ठाऊक उत्तमदादा फुलकर यांची गाणी आज घराघरात आपल्याला ऐकायला मिळतात ज्या गाण्यात उत्तमदादा फुलकर यांचा उल्लेख येतो ते गाणे आज ही अंतकरणाचा ठाव घेतात.

काखेत पोरगं हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी

कपडा ना लत्ता खरखटा भत्ता फजिता होती माय मोठी

माया भिमानं , भिमानं मायसोन्यानं भरली ओटी ..

हे अतिशय मार्मिक आणि जिवंत चित्रण रेखाटणारं गाणं सुध्दा उत्तमदादा फुलकर यांचं आहे असे दादा सांगतात आणि त्यांचे डोळे ओलावतात . हे गाणं एकूणच मी औरंगाबाद वरून खास त्यांच्या भेटी साठी गेलो होतो आज आपल्या चळवळीत हे गाणं चांगलंच गाजतय व्हाट्सअप ,फेसबुक ,युट्यूब वर सुद्धा या गाण्याने आपला ताबा घेतलेला आहे आणि समाज मनात घर करून आहे इतकं साध्या सरळ शब्दात त्यांनी केलेली मांडणी थक्क करणारी आहे तसेच त्यांचे मावा आबा म्हणे बाप हे गाणं भीमशाहीर समदुर सारंग यांच्या आवाजात एकूण सुध्दा आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो उत्तम दादा फुलकर कधी ही प्रसिद्धच्या फंदात पडले नाहीत गाणी लिहायची आणि म्हणायची व ठेऊन द्यायची आणि जवळच्या शिष्यमित्रांना ती अर्पण करायची अशी अनेक गाणी त्यांनी लिहून आणि गाऊन त्यांनी आंबेडकरी चळवळीला गतिमान केले चळवळीला ऊर्जा प्राप्त करून दिली त्यांचे गाणे आज ही आंबेडकरी चळवळीला ऊर्जा तर देतातच पण परिवर्तनाच्या मार्गाने मार्गस्थ होतांना दिसतात .उत्तमदादा यांच्या सोबत चर्चा करतांना मला अनेक गोष्टी दिसून आल्यात नंतर मी दादांना म्हणालो दादा ज्या गाण्यात उत्तम आहे ते गाणे तुमचेच आहेत ना ! असं म्हणताच त्यांना गहिवरून आलं असो शाहिराचं गाणं गाणं असते त्यांच्या जीवनाच्या गाण्यावर आता समाजाने बोलायला आणि व्यक्त व्हायला हवं आज उत्तमदादा फुलकर यांचे निधन झाले आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनाचा आवाज थांबला त्यांच्या कार्याला सलाम करतो भावपूर्ण आदरांजली !

लेखक:- प्रा.देवानंद पवार , औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published.