नुकताच शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचा शासन निर्णय घेतला. या शिक्षकांना दरमहा वीस हजार रुपये मानधन दिले जाईल. हा शासन निर्णय म्हणजे “भुकेल्यांना उपाशी : पोटभरलेल्यांना जेवण” असा उरफाटा न्याय आहे. आज आपल्या देशात, राज्यात, जिल्ह्यात करोडो, लाखो, हजारो शिक्षित, प्रशिक्षित,उच्च शिक्षित तरुण बेकार आहेत. पीएच.डी.,पदव्युत्तर, नेट, सेट, बीएड,डीएड झालेले कित्येक तरुण वाटेल ते काम करायला तयार आहेत. पाच दहा हजार रुपये मिळविण्यासाठी कोणतेही काम करतात. तर बहुतांश बेकारांना काम नाही त्यामुळे ते वैफैल्य ग्रस्त आहेत. शिकून सवरून प्रशिक्षित होवून सुद्धा नोकरी मिळत नाही. कारण सरकार जागा भरायला तयार नाही. सर्व खात्यात प्रचंड मनुष्यबळाची गरज असतांना तिजोरीत खडखडाट आहे या कारणाने रिक्त जागा न भरता कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली जाते, तर काही खात्यात जुन्या सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक भरले जातात. ही बेरोजगार तरुणांची थट्टा नव्हे का? आता आणखी एक निर्णय शासनाने घेतला तो म्हणजे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय साठ वर्षे करण्याचा म्हणजे बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा शासनाचा बिनडोकपणाच नव्हे का?
आज शासन “हम करे सो कायदा” या न्यायाने वागत आहे. लोकांच्या मतावर निवडून गेलेले सारे लोकांना विसरून फक्त सत्तेचे गुलाम झाले, सत्तेच्या मस्तीत एवढे बेफाम झाले की, त्यांना लोकांच्या प्रश्नाचे, त्यांच्या समस्यांचे, तरुणांच्या बेरोजगारीचे काहीही सोयरसुतक नाही. आणि आमचा मतदारही फार विसरभोळा आहे. दोन दिवस फक्त विलाप करतो आणि मग “येरे माझ्या मागल्या” या न्यायाने पुन्हा तेच ते उमेदवार निवडतो. थोडाही विवेक जागा ठेवून आपल्या अमूल्य मताचा अधिकार वापरत नाही. भावनिक होतो आणि जात, धर्म, पक्ष, पैसा, दारू, मटण यावर मत देतो. जराही विचार करत नाही. म्हणून राजकारणी याचा गैरफायदा घेत आहेत. जनता बेवकुफ आहे हे त्यांना कळते. त्यामुळे निवडून गेल्यावर मनमानीपणे वागतात. विकास, प्रगती फक्त भ्रम आणि स्वतःच्या सात पिढ्यांना पुरेल एवढी माया गोळा करतात.हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो पण आमच्यात सुधारणा होत नाही. तरुण रक्त गोठलं की काय, संघर्ष नपुसंक झाला की काय असे वाटते. देशात आपल्या धडावर आपलंच डोकं असणारी माणसं इतिहास जमा झाली की काय ? बेरोजगार तरुणांनो उठा जागे व्हा आणि क्रांतीची मशाल हातात घेवून न्यायाचा व लोकशाहीचा, आपल्या हक्काचा लढा मजबूत व गतिमान करा अन्यथा तुमची गुलामी कायम राहणार एवढे लक्षात ठेवा…!
लेखक:- प्रा.डॉ.एम.आर.इंगळे ( ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत)