चोरीचा ‘करंट’ उतरला! अकोल्यात विद्युत तार चोरांची टोळी जेरबंद; १०.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला | प्रतिनिधी
अकोल्यात तब्बल चार ठिकाणी विद्युत तारांची चोरी करून वीज विभागाची लाखोंची लूट करणाऱ्या चोरट्यांचा अखेर ‘करंट’ उतरला आहे! अकोला स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईत पाच आरोपींना अटक करून सुमारे १० लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मालमत्ता चोरी प्रकरणांचा शोध लावण्यासाठी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी तपासाला गती दिली. उरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विद्युत तार चोरी प्रकरणात (गु. र. १६१/२५) तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की काही संशयित आरोपी रेडवा व अजनी (ता. बार्शीटाकळी) येथे लपून बसले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी मंगेश जाधव, विजयनाथ राठोड व रोशन राठोड या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चौथ्या आरोपी दिपक पवार व विक्रेते सैयद वजीर व गुलाम नबी यांचेही नावे उघड केली. पोलिसांनी पुढील तपासात वजीरच्या एमआयडीसीतील गोडावूनवर छापा टाकून अल्युमिनियम वायरचे ४ बंडल, वायर फिटींग साहित्य, कटिंग कटर, वाहने असा एकूण १०.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

या टोळीने शेतशिवारात चोरी केलेल्या विद्युत तारा गाडीतून शहरात आणून, वजीर व गुलाम नबीच्या गोडावूनमध्ये लपवून ठेवत असल्याचे उघड झाले. चोरीसाठी वापरलेली बोलेरो पिकअप (किंमत ७ लाख रु.) व माल वाहतूक वाहन (किंमत ५० हजार रु.) देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

चोरीच्या घटनांमध्ये उरळ व तेल्हारा पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल असून, याच प्रकरणाशी संबंधित मुद्देमाल पोलिसांनी हुडकून काढला आहे. सदर कारवाईत पोनि. शंकर शेळके, पो.नि. विजय चव्हाण, पीएसआय गोपाल जाधव व त्यांच्या चमूने उल्लेखनीय कामगिरी केली.


चोरांचा ‘करंट’ उतरवणाऱ्या अकोला पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.