
आयबीपीएस प्रशिक्षणासाठी दिलेले कंत्राट चार पैकी तीन प्रशिक्षण संस्था एकाच व्यक्तीच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने आयबीपीएस प्रशिक्षणासाठी दिलेल्या चार पैकी तीन प्रशिक्षण संस्था ही एकाच व्यक्तीची असून यामध्ये अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्याकरीता कंत्राट देण्यात आले आहे. वेगवेगळया नावाने आणि जिल्ह्यात असणाऱ्या संस्था ह्या एकाच व्यक्तीच्या नावे आहे. संबंधित व्यक्ती ही भाजप आमदाराच्या मर्जीतील असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
‘बार्टी’ ही स्वायत्त संस्था आहे तरी देखील त्यात हस्तक्षेप होत असून सचिवांनी नियमबाह्यरित्या सदर संस्थेला कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विभागाचे असणारे सचिव सुमंत भांगे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होत असून बार्टी’ च्या कायद्यातील कलम ४६ नुसार, प्रशिक्षणासाठी मागासवर्गीय संस्थाना प्राधान्य द्यावे अशी अट आहे. ती रद्द करून अन्य प्रवर्गातील संस्थाना कंत्राट देण्यात आले आहे. आमदाराच्या मर्जीतील व्यक्तीच्या संस्थेला प्राधान्य दिल्याचा आरोप केला जात आहे.
यासंदर्भात सचिव सुमंत भांगे यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत पळ काढला आहे. वरील प्रकरण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता यावर काय उपाय निघेल हे पाहण्यासारखे असणार आहे.