
: दि.२४ जानेवारी २०२४श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातर्फे “शेअर मार्केट” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे अध्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. के. शेख यांनी मार्गदर्शन केले.डॉ. शेख यांनी दैनंदिन जीवनातील बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व सांगत वित्तीय साक्षरतेविषयी समीकरणे उलगडली. त्यांनी आर्थिक जीवनात गुंतवणुकीचा शास्त्रीय दृष्टिकोन व नियोजनाचे महत्व पटवून दिले. शेअर बाजारातील विविध संकल्पना सुलभ भाषेत स्पष्ट करून, गुंतवणूकदारांसाठी सावधगिरीचे उपायही त्यांनी सांगितले.

दुसऱ्या सत्रात सर्टीफाईड फायनान्स प्लॅनर सुमित मुरारका यांनी वित्तीय साक्षरतेविषयी तपशीलवार सादरीकरण केले. त्यांनी शेअर बाजारातील व्यवहारांबद्दल व त्याचा गुंतवणूकदारांच्या वित्तीय साक्षरतेवर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला. गुंतवणूक कशी आणि कुठे करावी तसेच त्यासाठी कोणत्या प्रकारचे नियोजन आवश्यक आहे, याविषयी त्यांनी सोप्या व प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले. दोन्ही सत्रात प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ संतोष कुटे व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे हे होते. या परिसंवादास विद्यार्थ्यांसह विविध महाविद्यालयीन प्राध्यापक आणि गणमान्य व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाला आयक्यू एसी समन्वयक डॉ आशिष राऊत, विज्ञान शाखा प्रमुख डॉ नितीन मोहोड, गृहविज्ञान शाखा प्रमुख डॉ. अंजली कावरे, मानव्यविद्या शाखा प्रमुख डॉ नाना वानखडे, व परिसंवादाचे समन्वयक वाणिज्य शाखा प्रमुख डॉ संजय तिडके व अर्थशास्त्र विभागाचे प्रा.धनंजय काळे ह्यांची उपस्थिती लाभली. तसेच सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन डॉ प्राजक्ता पोहरे व आभार प्रदर्शन डॉ अमरावतीकर यांनी केले.
