
अकोला शहरातील अनेक भागात मुख्य रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक परिसरात एक आरोग्य निरीक्षक व पंचेचाळीस सफाई कर्मचारी, एक जेसीबी व एका ट्रॅक्टरची व्यवस्था अनेक वर्षापासून केली आहे. या व्यवस्थेवर वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रशासन करते. तरीही स्वच्छता का राहत नाही हा प्रश्न आहे.
शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणत निधी अकोला महानगरपालिकेला प्राप्त होतो. केंद्र व राज्य शासनाने २०२४ साली शहरात स्वच्छता होते की नाही या विषयावर एक सर्वे केला होता. या सर्वे मधे अकोला जिल्हा नापास झाला. महानगरपालिकेची स्वच्छता करणारी यंत्रणा ही केवळ कागदावर काम करत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेच्या कामासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी व्यवस्थित खर्च होत नसल्याची बाब समोर आली आहे. शास्त्री स्टेडियमच्या बाजूला, वसंत टॉकीज मागे, कृषी नगर तसेच विविध भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो. या परिसरासह इतर वॉर्ड मधील आरोग्य निरीक्षक कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा करत आहे असे दिसते. अशी तक्रार जागृत नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी आपले सरकार पोर्टल वर केली होती. त्यावेळी महानगरपालिका प्रशासन जागे झाले. व सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांना महानगरपालिका अधिकारी यांनी फोन वर संपर्क करून तुम्ही जी तक्रार केली तो कचरा कुठे साचलेला आहे दाखवा असे म्हटले. त्यानंतर अकोला महानगरपालिकेने शास्त्री स्टेडियम जवळ जेसीबी द्वारे स्वच्छता मोहीम राबविली.अकोला शहरात सर्वसामान्य नागरिकांना जागोजागी साचलेल्या कचऱ्याचे ढिग दिसतात, परंतु महानगरपालिका स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांना ते दिसत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय