सुजाण पालकत्व ही काळाची गरज- प्रा. डॉ. संतोष पस्तापुरे

व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे व्यक्ती व्यक्ती म्हणून कुटुंब व कुटुंबा मिळून समाज निर्माण होत असतो. समाजाचे सातत्य टिकवण्यासाठी विवाह ही संस्था आपल्या संस्कृतीमध्ये अस्तित्वात आहे विवाह नंतरचा प्रवास म्हणजे पालकत्वाचा प्रवास आहे.’पालकत्व’ ही संकल्पना वाटते तितकी सोपी नाही. केवळ मुलं जन्माला घातली म्हणजे आपण पालक झालो असे नाही. ती एक खूप मोठी जबाबदारी असते. तो एक दिव्य प्रवास असतो, जो खूप काळजीपूर्वक पार पाडावा लागतो. सुजाण पालकत्व ही एक अशी जबाबदारी असते जिथे एक पालक सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे काम करीत असतो. मुळात पालक होण्याआधी सुजाण पालकत्व म्हणजे काय? हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी स्वतः मध्ये कोणकोणते बदल करणे गरजेचे आहे? याचा विचार होणे गरजेचे असते. मुळात बराच पालकांना सुजाण पालकत्व म्हणजे काय हेच माहिती नसतं. आता जसे गर्भ संस्काराचे वर्ग चालतात तसे सुजाण पालकत्वाचे देखील वर्ग सुरु करावेत आणि जाणीवपूर्वक सर्व पालकांनी त्याचे पाठ शिकून घ्यावेत नी जाणीवपूर्वक त्याप्रमाणे पालकत्वाची जबाबदारी पार पाडावी.

कारण बहुदा पालक नावाचा प्राणी आपलं मुलं जसं आहे तसं ते स्वीकारतच नाही. लेकरं सर्वांना हवी असतात पण ती सुंदर, हुशार, सर्वगुणसंपन्न अशीच हवी असा अट्टाहास प्रत्येक पालकांमध्ये दिसून येतो पण आपण हे विसरतो की, आपलं मुलं हे आपल्याच तीन पिढयांमधील गुण घेऊन जन्माला आलेलं असतं. त्यामुळे सर्वात आधी तो दिसायला, बुद्धीने जसं आहे तसा त्याचा पालकांनी स्वीकार करायला हवा. मुलं जसं आहे तसा त्याचा स्वीकार हे सुजाण पालकांचे पहिले लक्षण आहे. पुन्हा त्याला वाढविताना त्याच्या गरजा, आवडीनिवडी याचा विचार केला जावा. खूपदा आपण इतर मुलांशी आपल्या पाल्याची तुलना जास्त करतो. त्यावरून त्याला सतत बोलतो. त्यांची तुलना करणे टाळणे हे सुजाण पालकत्वाचे दुसरे लक्षण आहे.पालक आपल्या सर्व आवडी निवडी त्याच्यावर लादत राहतात. आपली अपुरी स्वप्ने त्यांनी पूर्ण करावी ही अपेक्षा बाळगतात. त्यातूनही त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात. म्हणूनच आपल्या पाल्याचा वयोगट लक्षात घेऊन, त्याचा कल पाहून पालकांनी त्याला आधार द्यायला हवा. मैत्रीपूर्ण व्यवहार करावा. आईनी मुलीशी व वडिलांनी मुलाशी मैत्रीपूर्ण व्यवहार करावा. पालक जेव्हा हकुमशाही पालकत्व स्वीकारतात तेव्हा मुलं हट्टी बनतात. पालकांना उलट बोलतात, त्यांच्यापासून दूर जाऊ लागतात. म्हणूनच सुजाण पालकत्व म्हणजे नेमके काय हे समजून घेणे गरजेचे असते. मुलं हट्टी असणं, रागीट असणं, खोटं बोलणं हे अगदीच नैसर्गिक असतं. पण योग्य अयोग्य याची जाणीव त्यांना गोड बोलून उदाहरणे देऊन द्यायची असते. पण अशा प्रसंगी पालकच तांडव करतात मुलांना मारतात, शिक्षा करतात त्यामुळे मुलं जास्तच आक्रमक बनतात. त्यामुळे अशा प्रसंगी पालकांचा संयम खूप महत्वाचा असतो. मुलं मोठी होताना, वयात येताना त्यांना समजून घेऊन योग्य ती दिशा दाखवता यायला हवी. पालकांच्या आपापसातील भांडणाचा देखील परिणाम मुलांवर होत असतो. या सर्व गोष्टींचा विचार सुजाण पालक करतात. जिथे असा विचार होतो तिथेच सुजाण पालकत्व निर्माण होतं. आणि अशा ठिकाणची मुले समंजस, संस्कारी होऊ शकतात. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम मुलांवर होतं असला तरी मुलांच्या वाढीत सुजाण पालकत्व ही गोष्ट खूप महत्वाची आहे.

मुलं वाढवताना कधी कधी पालकांना मुलं होऊन विचार करावा लागतो. त्यांच्या हातून एखादी चूक झाली तर ती का झाली, त्यामागे काय कारण असेल याचा सारासार विचार आधी पालकांनी करावा लागतो. त्याची बाजू समजून घ्यावी लागते. पण समाजात याच्या उलट घडताना दिसते. आपलं मुलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हेच पालक विसरतात. मुलं आपल्यावर अवलंबून आहेत म्हणजे आपण त्यांचे मालक व ती आपले गुलाम अशीच वागणूक पालक मुलांना देतात. त्याची बाजू समजून न घेता त्याला कधी कधी दोषी ठरवून मोकळे होतात. मुलं कोणत्याही वयातील असो, पालकांचे प्रेमळ शब्द त्याला आधार वाटत असतात. म्हणूनच पालकांनी मुलांना सांभाळताना त्यांना समजून घेणे खूप गरजेचे असते. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या विषयीची काळजी शब्दातून दिसायला हवी. पालकांनी त्यांना वेळ द्यायला हवा. खूपदा पालक महागड्या भेटवस्तू मुलांना आणून देतात परंतु ते मुलांसोबत वेळ घालवत नाहीत. मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांच्या सोबत खेळणं ही देखील मुलांची मानसिक गरज असते. ती पालकांनी पुरवणे गरजेचे असते. बरेच पालक अभ्यासावरुन मुलांना रागवत असतात. परंतु आपल्या मुलांचा कल कशात आहे, त्याची आवड काय आहे हे बघतच नाहीत. केवळ मुलांना मानसिक त्रास देत राहतात. यामुळे देखील मुले स्वतः चे बरे वाईट करून घेतात. अशा अनेक घटना आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. पालक आणि मुले यांच्यात एक प्रकारची दरी दिसून येते. मुले पालकांच्या अपेक्षेखाली दाबली जातात. खरं तर मुलं ही आपली खरी संपत्ती असतात. त्यांना जाणीवपूर्वक जपलं पाहिजे. त्याच्यावर संस्कार केले पाहिजेत. तरच सुजाण पिढी निर्माण होऊ शकेल.

हल्ली जिथे दोघे नोकरी करतात तिथे मुलांना आई बाबा यांचा वेळच भेटत नाही. त्यामुळे त्यांच्यातील ओलावा कुठेतरी कमी होताना दिसत आहे. मोबाईल,सोशल मिडियाचा जास्त वापर ही गोष्ट देखील सुजाण पालकत्व यासाठी घातक ठरत आहे. पैसा, प्रतिष्ठा यामागे लागलेले पालक मुलांच्या नेमक्या गरजा काय आहेत हेच विसरली आहेत. त्यामुळे हल्ली पालक आणि मुलं यांच्यातील समस्या वाढत आहेत. मुलांना वाढवताना पालक त्यांचा नैसर्गिक विकास होऊच देत नाहीत. शिस्तीच्या नावाखाली सतत बंधन त्याच्यावर लादली जातात. पण सततच्या बंधनांनी मुलं पालकांपासून दूर जातात. त्यामुळे सुजाण पालकांनी मुलांना वाढविताना प्रत्येक वयोगटातील मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करायला हवा. मानसशास्त्रामध्ये अनेक चाचण्या (टेस्ट)आहेत त्या चाचणीच्या माध्यमातून मुलांचा शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक, क्रीडाविषयक, सांस्कृतिक कल कसा आहे ते आपल्याला तपासता येईल येऊ शकते. मुलाला समजून घेऊन त्याचा विकास करायला हवा. तरच आपण सुजाण पालक बनू शकू. ह्या बाबीची सर्व पालकांनी जाणीवपूर्वक नोंद घ्यायला हवी.

प्रा. डॉ. संतोष उमाकांत पस्तापुरे (समुपदेशक)

मानसशास्त्र विभागप्रमुख श्री. शिवाजी महाविद्यालय,अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published.