मुंबई, ता. २४ : राज्यातील वीज ग्राहक आता स्मार्ट होणार आहे. ग्राहकांच्या वीजबिलातील गोंधळ संपवण्यासाठी महावितरणने तब्बल दोन कोटी ३७ लाख वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज वापराचे स्वयंचलितपणे अचूक मीटर रिडिंग होणार असल्याने ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या विजेचे रास्त बिल मिळणार आहे. हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणने चार एजन्सींची नियुक्ती केली असून त्याची सुरुवात १५ मार्चपासून होणार आहे.
महावितरणचे राज्यभरात सुमारे पावणे तीन कोटींहून अधिक वीज ग्राहक आहेत. कृषी पंप वगळता सर्व वीज ग्राहकांच्या वीज वापराचे मीटर रिडिंग प्रत्येक महिन्याला घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज कर्मचाऱ्याला संबंधित ग्राहकाचा वीज मीटर असलेल्या ठिकाणी जाऊन मीटर रिडिंग घेणे, त्याचे बिल तयार करून ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास दहा-बारा रुपयांचा खर्च प्रत्येक ग्राहकामागे महावितरणला करावा लागतो. तसेच मीटर रिडिंग घेताना संबंधित कर्मचाऱ्यांकडून काही चूक झाल्यास ग्राहकाला चुकीचे बिल जात असून ते दुरुस्त करण्यासाठी ग्राहकाला वीज कंपनीच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळेच महावितरणने कोल्हापूर वगळता आपल्या वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
आठ-दहा हजार रुपये किंमत
महावितरण चार कंपन्यांच्या माध्यमातून सदरचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. एका स्मार्ट मीटरची किंमत सुमारे आठ ते दहा हजार रुपये आहे. त्यामुळे एकूण दोन कोटी ४२ लाख मीटरसाठी तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वीज मीटर बसविण्यात नियुक्त केलेल्या एजन्सी
- भांडुप, कल्याण आणि कोकण झोन, बारामती, पुणे झोन : अदानी ग्रुप
- नाशिक, जळगाव झोन : एनसीसी ग्रुप
- चंद्रपूर, गोंदिया, नागपूर झोन : मॉन्टेकार्लो
- अकोला, अमरावती झोन : जीनियस