सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

जस्टीस पी. बी. सावंत

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे 1986 मध्ये, शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते, त्यावेळी ते मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती होते. त्यावेळीही त्यांनी डॉ. आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज सुरू केले, त्यामुळे कोकणातून मुंबईत आलेल्या मुलाला वकिलीचे शिक्षण घेता आले. बाकी कॉलेजेसना संधी मिळत नव्हती. कारण, ती कॉलेजेस सकाळी दहा नंतर भरत असत. तर सिद्धार्थ कॉलेज सकाळी सात वाजता भरायचे, अशी आठवण सांगून, ते म्हणाले पोटासाठी मला हॉटेलमध्ये काम करावे लागत असे. सकाळी कॉलेज आपटून मी दहा नंतर कामावर जात असे. सिद्धार्थ कॉलेज त्यावेळी चर्चगेट स्टेशन समोरील एस.एन.डी.टी कॉलेजच्या जागेवर बैठ्या बराकीत भरत असे. त्या ठिकाणी आमचे कॉलेजचे वर्ग भरत असत अशी आठवण सांगून ते म्हणाले, आंबेडकरांनी माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांची निकड ओळखून सकाळी सातचे वर्ग भरवले होते. त्यामुळेच मी हायकोर्टात जज होऊ शकलो. भोईवाड्याच्या बौद्धजन पंचायत समिती हॉलमध्ये 1987 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा बाबासाहेबांचे आभार मानले. ते म्हणाले मी आज सुप्रीम कोर्टात जज बनलो, ते केवळ बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेजची निर्मिती केल्यामुळेच. न्यायमूर्ती पी.बी. सावंत कोकणातून येऊन, मुंबईत लोहार चाळीत वास्तव्याला होते. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी मुंबईत शेतकरी कामगार पक्षात काम सुरू केले. कामगार आंदोलनात त्यांनी भाग घेतला. लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणी हॉल देत नसत. दिले तर अव्वाच्या सव्वा पैसे मागायचे. या रागातून त्यांनी प्लाझा थिएटर दादर (पूर्वीचा कोहिनूर सिनेमा) पश्चिमेला एक प्लॉट घेतला. तिथे शिवाजी मंदिर नाट्यगृह उभारले. छत्रपती शाहू सभागृह उभारले. मुंबईतील सांस्कृतिक चळवळीला त्यांनी चेहरा मिळवून दिला. मालवणी दशावतार, मामा वरेरकर, पु.ल. देशपांडे, शांता शेळके, विजय तेंडुलकर, प्रल्हाद केशव अत्रे, रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकर, राम गणेश गडकरी, वासुदेव वामन खरे, विष्णुदास भावे, मच्छिंद्र कांबळे, वामन गोपाळ जोशी, अशोक पाटोळे यांना प्लॅटफॉर्म मिळवून दिला. पाटोळेंच्या ‘आई रिटायर होतीये’ चा पहिला प्रयोग, 17 ऑगस्ट 1989 ला शिवाजी मंदिर येथे झाला, त्यावेळी मी स्वतः तिथे हजर होतो. जब्बार पटेल यांचा ‘घाशीराम कोतवाल’, विजय तेंडुलकर यांचं कन्यादानचे येथेच प्रयोग झाले. प्रशांत दामले, विजय कदम, मंगेश कदम, अविनाश नारकर या रंगकर्मींचे हे दुसरे घरच होते.1973 पासून ते मुंबई उच्च न्यायालयात गेले. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी 1982 च्या एअर इंडिया दुर्घटनेची चौकशी केली होती. तर वकिली बरोबर त्यांनी न्यू लॉ कॉलेज मुंबई येथे 1966 मध्ये प्राध्यापकी केली. लग्न झाल्यानंतर त्यांनी दादर पूर्वेला कॉम्रेड डांगेंच्या घराजवळ घर घेतले. तेथून ते शिवाजी मंदिरच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी जात असत. त्यांच्यासोबत सी.एस. सावंत हे शेकापचे तीन वेळा आमदार राहिलेले त्यांचे घनिष्ठ मित्र सोबत असत. सी.एस. सावंत हे मेजर सुधीर सावंत यांचे वडील. न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे नाव भाजप सरकारने एल्गार परिषदेत गोवल्यामुळे, महाराष्ट्र आणि मुंबईतील एकाही रंगकर्मीने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ज्याने आपल्याला प्लॅटफॉर्म मिळवून दिला, त्यांनाच हे लोक विसरली. न्यायमूर्ती पी.बी. सावंतांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, वर्ल्ड प्रेस कौन्सिलचे चेअरमन पद भूषवले होते. मोदी काळातील मीडियाची गळचेपी बघून त्यांना खूप संताप यायचा. गोद्रा ट्रेन जळीत कांड, गुजरात दंगल यावर 2002 साली चौकशीसाठी जस्टिस कृष्ण अय्यर, पी.बी. सावंत यांचा चौकशी आयोग नेमला होता. त्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना दोषी ठरवले होते. त्यांच्यावर खटला भरून मनुष्यवधासाठी त्यांना दोषी ठरवावे असे त्यांचे मत बनले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना देशमुख यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या प्रभावाखाली जस्टीस पी. बी. सावंत यांची नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन, विजयकुमार गावित यांची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली होती. त्यामुळे नवाब मलिक आणि सुरेश जैन यांना राजीनामा द्यावा लागला होता. चीफ जस्टीस दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीश जस्टिस मदन लोकूर , जस्टिस रंजन गोगोई, जस्टीस चेलमेश्वर, जस्टीस कुरियन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. त्याला प्रथम पाठिंबा जाहीर करणारे न्यायमूर्ती सावंतच होते. भाजप ही संधी नसून राष्ट्रीय आपत्ती आहे, त्याचे अनुभव भारतीय जनतेला पदोपदी येत आहेत, तरी भारतीय जनता ही अंधभक्ती सारखी वागते आहे असे त्यांनी 2015 मध्येच भाष्य केले होते. ते आज खरे ठरते आहे. 370 कलम काढल्यावर ते प्रचंड संतापले होते. ते म्हणाले नवजात बाळाला आईपासून दूर नेण्यासारखे आहे. 370 कलम हे काश्मीर आणि भारतातील एक कराराचा भाग होता. त्याने लेह- लडाखला प्रगतीची संधी लाभणार नाही आणि हे आता सत्यच ठरले. चीन लेह लडाखमध्ये घुसला आहे. त्यांचे सहा आमदार होते. ते आता हिल कौन्सिलमुळे गेले. आता त्यांचे प्रतिनिधी कोणीच नाही. म्हणून सोनम वांगचुक यांनी दिल्लीपर्यंत लॉंग मार्च काढला. न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी सातत्याने ‘द हिंदू’, मेन स्ट्रीम, ‘द इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकांमध्ये आणि मासिकांमध्ये सामाजिक आणि राजकीय प्रबोधन करणारे लिखाण केले आहे. त्यांची ‘Grammar of Democracy’, लोकतंत्र का व्याकरण , लोकशाहीचे व्याकरण, न्यायव्यवस्था व आरक्षण, कायद्याचे राज्य, धर्मचिंतन, सहकार चळवळ, लोकन्यायालय, क्रांतिकारक भगतसिंग, महात्मा फुले – सत्यशोधक चळवळ आणि समाज क्रांती, तरुणांना आवाहन, महाराष्ट्रातील समाज सुधारणांचे शिल्पकार, विद्यापीठ आणि पदवी, न्यायालयीन सक्रियता, समाज क्रांतीचा भारतीय मार्ग, भारतीय राज्यघटनेची मूलसूत्रे व अंमलबजावणी अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. लोकांचा वकील, मानवी हक्काचा रक्षणकर्ता, संविधानाचा रक्षणकर्ता ही ओळख त्यांनी कायम ठेवली. सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा वाढवणारे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तीना त्यांच्या चौथा स्मरण दिनी प्रबुद्ध भारतची विनम्र आदरांजली.– महेश भारतीयराष्ट्रीय खजिनदार, वंचित बहुजन आघाडी

Leave a Reply

Your email address will not be published.