
-स्थानिक- अकोला शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी पोस्टर आणि मॉडेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विविध विभागांमधून एकूण १०० नवोपक्रमांचे प्रभावी प्रदर्शन मांडण्यात आले, ज्यामध्ये ४० पोस्टर्स आणि ३० मॉडेल्सचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना, संशोधन आणि नवकल्पनांचे प्रदर्शन सादर केले, जे परीक्षक आणि प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले.कार्यक्रमाची रूपरेषा विज्ञान शाखाप्रमुख डॉ. नितीन मोहोड यांनी विशद केली तर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी प्रो.डॉ. एस.एन. चंदन, रसायनशास्त्र विभाग प्रमुख , सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ. चंदन यांनी विद्यार्थ्यांना सर सी.व्ही. रमन यांच्या जीवनप्रवासाची प्रेरणादायी माहिती दिली आणि विज्ञान व संशोधन क्षेत्रात नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तसेच, प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, संशोधन आणि प्रयोगशील शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देत भविष्यातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमाला मान्यवर अतिथी म्हणून डॉ. एस.ए. पाटेकर (जिल्हा शिक्षण अधिकारी) आणि प्रा. एस.जी. राऊत (CDC सदस्य) यांनी हजेरी लावली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले.याप्रसंगी IQAC समन्वयक डॉ. आशीष राऊत आणि विज्ञान शाखा प्रमुख डॉ. नितीन मोहोड यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत भविष्यातील संशोधन आणि प्रयोगशील शिक्षणासाठी त्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एम.आर. बेलखेडकर सर यांनी समन्वयक म्हणून विशेष भूमिका बजावली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने पार पडला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सुफिया अरीब आणि प्रा.रवि दाभाडे यांनी केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संपूर्ण कार्यक्रमाची सुसूत्रता राखली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. एम.आर. बेलखेडकर यांनी आभार प्रदर्शन केले.याप्रसंगी घेण्यात आलेल्या मॉडेल कॉम्पिटिशन मध्ये अनुक्रमे; प्रथम क्रमांक अश्विन पिंपळे व ओम शेगोकार द्वितीय क्रमांक गणेश भागेवार व रयान अहमद शेख व तृतीय क्रमांक तारक वजिरे यांनी पटकविला तर प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून वैष्णवी शेलार तसेच योगिता कावरे व तुबा अजीम यांना देण्यात आला तर पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक भूमिका लोणकर द्वितीय क्रमांक अनिकेत निंबाळकर व वैष्णवी गायकी व तृतीय क्रमांक वैष्णवी दहिभात यांनी पटकविला तर प्रोत्साहनपर म्हणून गौरी लाजूरकर व ऋतुजा मारोडे यांना गौरविण्यात आले.या विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी दिली. हा कार्यक्रम त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देणारा आणि भविष्यात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरला.