मेळाव्याला येणाऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचे धपाटे, चटणी, कचोरी आणि गोड पदार्थ देण्यात येणार आहे. खाद्यपदार्थ खराब होऊ नये अशा पद्धतीने हा मेनू तयार करण्यात आला आहे.
गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, ठाणे: शिंदे गटाने उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी (dussehra rally) जय्यत तयारी केली आहे. बीकेसीवर एकाच वेळी लाखो लोक बसतील अशी सुविधा करण्यात आली आहे. या मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बसगाड्या, चारचाकी वाहने आणि ट्रेनही बुक करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मेळाव्याला येणाऱ्यांसाठी खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर तब्बल दोन लाख लोकांच्या जेवणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या दृष्टीने प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी तयारीही केली असून ठाण्यातील (thane) एका मराठी व्यावसायिकालाच दोन लाख लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली आहे.
प्रताप सरनाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्याच्या तयारीची माहिती दिली. दसरा मेळाव्यासाठी खेडेगावातून येणाऱ्या दोन लाख लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मराठी व्यावसायिकाला जेवणाची ऑर्डर देण्यात आली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
मेळाव्याला येणाऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचे धपाटे, चटणी, कचोरी आणि गोड पदार्थ देण्यात येणार आहे. खाद्यपदार्थ खराब होऊ नये अशा पद्धतीने हा मेनू तयार करण्यात आला आहे. प्रशांत कॉर्नरच्या मालकानेही दोन लाख लोकांच्या जेवणाचं शिवधनुष्य उचलले असल्याचं त्यांनी सांगितलं.
उद्याच्या मेळाव्याला ग्रामीण भागातून लोक येणार आहेत. बीकेसी मैदानावर अनेक शिवसैनिक बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचाराचं सोनं लुटण्यासाठी येणार आहेत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार घेऊनच एकनाथ शिंदे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. ट्रीझरमध्ये म्हणूनच आम्ही शिंदे यांचे स्वत:चे विचार न मांडता बाळासाहेबांचेच विचार मांडले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
9 जून 2021मध्ये मी उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं होतं. भाजपबरोबर आपण युती करून लढलो. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका असं बाळासाहेबांनीच सांगितलं होतं. पण माझ्या पत्राची दखल घेतली गेली नाही. फक्त एकनाथ शिंदे यांनी माझ्या पत्राची दखल घेतली. त्यानुसार त्यांनी भाजपशी युती करून राज्याची धुरा सांभाळली, असंही ते म्हणाले.