आज 27 डिसेंबर, 2022 डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयंतीदिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम. 27 डिसेंबर, 1897 रोजी पापड या गावात भाऊसाहेबांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचे नाव शामरावबापू कदम देशमुख व आईचे नाव राधाबाई देशमुख होते. डॉ. भाऊसाहेबांचं प्राथमिक ते मॅट्रिक पर्यंतच शिक्षण पापड, चांदुर रेल्वे, कारंजा लाड, अमरावती या ठिकाणी झालं. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये पुढील शिक्षण झाले आणि उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. त्या काळात परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे आणि तेही बहुजन समाजातील विद्यार्थ्याने फार अवघड होते. पण भाऊसाहेबांची बुद्धिमत्ता व त्यांची शिक्षणासाठी असलेली तळमळ पाहून वडील शामराव बापू यांनी आपली जमीन गहाण ठेवून त्यांना इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी पाठविले. डॉ. भाउसाहेबांनी तेथे एडिनबर्ग विद्यापीठातून एम.ए., ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आणि Bar-at-law ही कायद्याची पदवी घेऊन ते मायदेशी परतले. भारतात परतल्यावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. वऱ्हाड प्रांतात निवडून आले. मंत्री झाले. अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. शिक्षण, शेती, सहकार, अस्पृश्योद्धार, जातीभेद निर्मूलन, धर्म इत्यादी विविध क्षेत्रात त्यांचे फार मोठे कार्य आहे. जातिनिर्मूलनासाठी स्वतः पुढाकार घेऊन आंतरजातीय विवाह केला. क्रांतिकारी हिंदू देवस्थान संपत्ती विधेयक मांडले, कर्ज लवाद विधेयक पारित करून शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचातून मुक्त केले. अस्पृश्यांना अमरावती येथील अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह केला. या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले होते. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री असतांना कृषी प्रदर्शन व परिषदा भरविल्या. नवीन तंत्रज्ञान व नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी स्वतः पुढाकार घेतला. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना आखल्या. शेतकरी कष्टकरी बहुजन समाजासाठी, त्यांच्या उत्थाणासाठी सर्वोतोपरी कार्य केले. आपल्या या कार्यानेच ते कृषिरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी संविधान सभेचे सदस्य म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. डॉ.भाऊसाहेबांनी तळागाळातील समाजाला, शेतकरी कष्टकरी व बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण मिळावे म्हणून 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली आणि आपल्या या शैक्षणिक कार्याने ते शिक्षणमहर्षी झाले. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याने संत गाडगेबाबां प्रभावित झाले त्यामुळे गाडगेबाबांनी त्यांना सहकार्य केले. त्यांचा गौरव केला. आणि समाजाला भाऊसाहेबांना मदत करण्याचे आवाहन केले. आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा खूप मोठा विस्तार झाला आहे.
डॉ. भाऊसाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आज या संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व शाळा, महाविद्यालये, वसतिगृह व संस्था ह्यामध्ये डॉ. भाऊसाहेबांची जयंती मोठ्या थाटात साजरी करतात. अनेक दिवस विविध कार्यक्रम करून, प्रबोधन सत्र ठेवून भाऊसाहेबांच्या जयंतीचा सर्वत्र आनंद साजरा केला जातो. ही फार चांगली व अभिमानाची गोष्ट आहे. कारण यानिमित्त तरी डॉ.भाऊसाहेबांच्या विचारांची आठवण व उजळणी होते. मात्र भाऊसाहेबांच्या नावाचा व विचाराचा जयघोष करतांना भाऊसाहेबांच्या विचारांचे आचरण होते का? हा चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेशी संबंधित प्रत्येक घटकांसाठी तो स्वनिरीक्षणाचाही प्रश्न आहे. तसे सगळे महापुरुष आम्ही जयंती व स्मृतिदिन साजरे करण्यापूरतेच मर्यादित केले. मग छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्र संत तुकडोजी असो किंवा इतर सर्व महापुरुष किंवा महानायिका असो आज फक्त उत्सवापुरते शिल्लक आहेत. जयघोष करण्यापूरते मर्यादित आहेत. त्यांचे विचार व शिकवणुक आचरणात आणून त्यांचे कार्य पुढे नेण्याचं काय? म्हणून डॉ. भाऊसाहेबांची जयंती साजरी करतांना आम्ही विचार केला पाहिजे की, काय आम्ही आजही जाती व त्यावरून भेदाभेद करणे सोडले का? आम्ही सर्वांना समानतेने वागवितो का? खऱ्या गुणवत्तेची कदर करतो का? गरिबांना प्रवेश देण्यासाठी मदत करतो का? काय आम्ही शिक्षणाचा बाजार तर करत नाही ना? इतर संस्थांसारखे आम्ही डोनेशनचाच विचार करतो की गरिबांनाही शिक्षण व नोकरीची संधी देतो? काय आम्ही डॉ.भाऊसाहेबांना अपेक्षित असलेला समाज व माणूस घडावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतो ? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. भाऊसाहेब व डॉ.बाबासाहेब, गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी, क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचं परस्परांशी असलेले वैचारिक नातं आम्ही समजून घेऊन जाती पातीच्या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून विचार करतो का? या सर्व चिंतनाशिवाय व आचरणाशिवाय आम्ही त्यांचे पाईक किंवा अनुयायी म्हणवून घेण्यास पात्र आहोत काय ? याचाही विचार व्हावा हीच सदिच्छा. आम्ही भाऊसाहेबांना मानतो पण जाणतो काय? हा विचार आपल्या मनात येईल तेव्हाच भाऊसाहेबांना खरे अभिवादन होईल असे वाटते. अशा या थोर समाज क्रांतिकारक, शिक्षणमहर्षी, कृषिरत्न आणि शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यात पोहचवून सर्वाना माणुसकीच, स्वाभिमानाच व समतेच जीवन जगता यावं यासाठी आयुष्यभर झटणारे महापुरुष डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन.- *प्रा.डॉ.एम.आर.इंगळे*