
शशिकांत इंगळे सर
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षक व पालक यांचे योग्य सहकार्य आवश्यक
आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचा दर्जा जरी वाढला असला, तरी मुलांमध्ये शिस्त आणि संस्कारांचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. शाळा म्हणजे केवळ अभ्यासाचे केंद्र नाही, तर मुलांच्या चारित्र्य आणि वर्तन घडवण्याचे पवित्र ठिकाण आहे. मात्र, दुर्दैवाने सध्याच्या पालकांनी आपल्या मुलांवरील अति प्रेमामुळे शिक्षकांना दिलेला सन्मान आणि अधिकार कमी होत चालला आहे. यामुळे मुलांमध्ये शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि सामाजिक मूल्ये कमी होत आहेत.पूर्वीच्या काळात शिक्षकांना “गुरु” मानले जायचे. त्यांची फटकार ही मुलांच्या भविष्यासाठी असते, याची जाणीव पालकांना होती. त्यामुळे, मुलांना मारहाण झाली, शिक्षा झाली तरी पालक कधीच शिक्षकांकडे तक्रार करत नसत, उलट शिक्षकांनी मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेचे स्वागत करत असत. पण आजच्या काळात परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. आता शिक्षकांनी मुलांना जर थोडंसं फटकारलं, तर पालक थेट शाळेत येऊन शिक्षकांवरच दबाव टाकतात. यामुळे शिक्षकांवर असलेल्या शिस्तीच्या अधिकारावरच गदा येत आहे.आज मुलांमध्ये असणारी बेफिकिरी, अनुशासनाचा अभाव, विचित्र हेअर स्टाईल्स, फाटलेल्या जीन्स, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जाणे यामुळे त्यांच्या वर्तनात मोठा बदल दिसून येतो. शाळेतील शिक्षकांनी जर त्यांना हे समजावून सांगितले, तर त्याला विरोध केला जातो. परिणामस्वरूप, मुलांना शाळेतील शिस्त नकोशी वाटते आणि त्यांच्या वागणुकीत सुधारणा होत नाही. याच कारणामुळे आज समाजात गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे. लहान वयातच व्यसनाधीनता, प्रेमप्रकरणे, चोरी, अपघात, मोबाईल आणि सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतणे यासारख्या गोष्टींमध्ये मुलं अडकत आहेत.मुलांच्या बिघडण्याचे ५०% कारण पालक आहेत, तर उरलेले ५०% मित्रमंडळी, समाज आणि सोशल मीडिया हे आहेत. पालकांनी मुलांवर योग्य नियंत्रण ठेवणे, वेळेचे महत्त्व शिकवणे, संस्कार आणि शिस्त याची जाणिव करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, आजच्या पालकांना मुलांच्या लाडामुळे त्यांच्या चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करणे सोयीचे वाटते. त्यामुळेच मुलांचे भविष्य अंधकारमय होत आहे. शिक्षकांनी दिलेली शिक्षा ही मुलांच्या भल्यासाठीच असते. हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे.शाळेत मिळणारी फटकार ही मुलांना भविष्यात पोलिसांच्या लाठीपासून वाचवते. आज लहान वयात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. अशा मुलांना भविष्यात कायद्याचा फास बसतो, पोलिसांकडून मारहाण होते, न्यायालयात केस लावल्या जातात. यापेक्षा शाळेत शिक्षकांनी दिलेली शिक्षा मुलांना योग्य मार्गावर आणू शकते. पण आजचे पालक हे समजून न घेतल्यामुळे शिक्षकांचे अधिकार संपत चालले आहेत.मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकांचा सन्मान आणि शिस्तीला पाठिंबा देणे गरजेचे आहे. मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारी निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोठे असते. पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की, शिक्षकांनी दिलेली फटकार मुलांच्या भल्यासाठीच असते. प्रत्येक मुलाची मानसिकता आणि वागणूक वेगवेगळी असते. त्यामुळे काहीवेळा कठोर भूमिका घ्यावी लागते. पण यामागचा उद्देश मुलांना योग्य मार्गावर आणणे असतो.पालकांनी आपल्या मुलांना गुरुचा सन्मान करायला शिकवले पाहिजे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळून, वाचनाची आणि ज्ञानाची आवड निर्माण केली पाहिजे. घरातील जबाबदारी दिली पाहिजे, तसेच मुलांना शिस्त आणि वेळेचे महत्त्व समजावून दिले पाहिजे. जर पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय असेल, तरच उद्याची पिढी संस्कारी आणि शिस्तबद्ध बनेल.मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकांना दिलेली जबाबदारी ओळखा. शिक्षक हा शिल्पकार असतो, तो केवळ ज्ञानच नाही तर मूल्ये, शिस्त आणि संस्कारही देतो. त्यामुळे आता वेळ आली आहे, पालकांनी आपल्या मानसिकतेत बदल करून शिक्षकांवर विश्वास ठेवण्याची. कारण, “शाळेत शिक्षकांची फटकार सहन केली, तर भविष्यात पोलिसांची लाठी सहन करावी लागणार नाही.”