५ जानेवारी २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित झालेला ,”सत्यशोधक” हा चित्रपट क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर झळकला. विशेष म्हणजे हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत हा सिनेमा आहे. या चित्रपटामध्ये ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्री माईची भूमिका साकारली आहे. समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि आपल्या विदर्भातील मातीतील निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित चित्रपटाची निर्मीती आपल्या अकोल्यातील तहसीलदार राहुल तायडे, प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ यांनी केली आहे. चित्रपटात आपल्या अकोल्यातील प्रसिध्द व्यक्तीमत्वांना काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटाशी संबंधीत सर्व मान्यवरांचे प्रथमत: मनःपूर्वक अभिनंदन करतो.
महात्मा फुले यांच्या जीवन व कार्यावर आधारीत असलेल्या सिनेमावर काय भाष्य करायचं कारण तेवढी पात्रता चं मुळात माझी तरी नाही परंतु जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवु शकत नाही या उक्ती प्रमाणे आजच्या ई-युगातील पिढीला इतिहास सांगणे माहीत करुन देणे काळाची गरज आहे.छत्रपती शिवराय आणि विश्वरत्न भिमराय यांना जोडणारा दुवा म्हणजे महात्मा फुले होत असं मला वाटतं कारण फुल्यांनी शिवरायांची समाधी शोधुन काढुन सर्वप्रथम या देशात शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली नसती तर कदाचीत आपल्या पिढिला शिवाजी महाराज माहीत असते की नाही आणी जर असते तर ती मांडणी कशाप्रकारे केलेली असती याची कल्पना चं न केलेली बरी…
महात्मा फुले नावाचा सूर्य १८९० ला मावळतो आणि १८९१ ला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य जन्म घेतो काय विलोभनीय अशी घटना आहे. बाबासाहेबांनी फुल्यांना आपले गुरु मानले. ज्यांना कधी पाहले नाही म्हणजे फुले यांच्या विचारांची व्याप्ती आपल्या लक्षात येईल..चित्रपटावर विविध लेखकांनी आपली मते मांडली…मी या चित्रपटातुन महात्मा फुले आणि आई सावित्री यांच्या एकमेकांविषयी असलेल्या अतुट प्रेमाविषयी त्यागाविषयी मांडणार आहे. किती भयंकर काळ असेल तो आणि तेव्हा काळाच्या पुढे जावुन विचार करण्या ची क्षमता एकमेकांबद्दलचा दृढ विश्वास, समजदार पणा हा दोघांच्या नात्याचा पाया होता. आजच्या पिढीने तो आदर्श जीवनात आचरणाची गरज आहे.मुल झाले नाही म्हणुन ज्योतीराव जे उत्तर देतात ते तर हजारो लाखो पिढ्या या पृथ्वीतलावर आल्या तरी तेवढचं समर्पक राहील इतकी विचारांची महानता कुठेचं पाहायला मिळणार नाही.सिनेमा मध्ये ज्योतीरावांच्या खांद्याला खांदा लावुन चळवळीत कार्य करणारी माझी सावित्री आई किती प्रगत विचारांची होती हे प्रत्येक प्रसंगातुन व्यक्त होते.आजकाल अनेक फॅड आलीत स्री चा समावेश दोन गटात होवु लागला वर्कींग वुमेन आणि हाऊस वाईफ या विचारांच्या लोकांनी माझ्या सावित्री आई ला पाहलं तर त्यांच्या लक्षात येईल कशापध्दतीने माई ने दोन्ही भूमिका लिलया पेलल्या ते कळते..प्रेमात त्याग, समर्पण, विश्वास, प्रत्येक क्षणी भक्कम साथ महत्वाची असते ते सर्व ज्योतीराव आणि माई च्या संसारात आपणांस पाहावयास मिळते.
अनेक अनिष्ठ रुढी परंपरा धार्मीक द्वेष जातीभेद यासारख्या समस्यांना दुर करण्याचं बळ माई च्या प्रेमा मुळेचं ज्योतीरावांना मिळत होते.त्यावेळी ब्राह्मण मुलगा आणि अस्पृश्य मुलगी यांच्यातील प्रेमसंबंध; संतप्त ग्रामस्थांचे क्रूर वर्तन सावित्री आईने धैर्याने हस्तक्षेप करून त्या मुलीचे प्राण वाचवले आणि ज्योतिबाच्या संरक्षणाखाली आणि देखरेखीखाली पाठवले. आज २१ व्या डिजीटल युगात आपल्या भारतातील ऑनर किलिंगचे भीषण वास्तव आणि ‘लव्ह-जिहाद’च्या द्वेषाने चाललेल्या प्रचारासह हि घटना आजही अतिशय समर्पक आहे.१८७७ च्या दुष्काळात सावित्रीआई ने सत्यशोधक स्वयंसेवकांसोबत केलेले कार्य आजही आमच्या पिढीला उर्जा देणारे आहे. माणसे चं काय तर जनावरांना देखील वाचविण्यासाठीची त्यांची धडपड प्रशंसनिय आहे.ज्योतीरावांनी आणी आई सावित्री यांनी एखाद्या पालकांपेक्षा ही जास्त समाजाची काळजी घेतली स्वत:च्या तब्येतीची जराही तमा न बाळगता हे दांपत्य अविरत समाजसेवेसाठी झटत राहीले म्हणुन चं आजचा हा सोन्याचा स्वातंत्र्य-समता-बंधुतेने नटलेला भारत आपणांस पहावयास मिळत आहे.
आमची आणि येणारी पिढी याची साक्षी आहे. ही किमया त्या दोघांच्या कष्टाची त्यागाची प्रेमाची परिणीती आहे.विश्वरत्न बाबासाहेबांनी बुध्द, छत्रपती शिवराय, फुले, शाहू यांचे विचार राज्यघटनेत मांडुन संपूर्ण देशात मानवतेची रुजवण केली. आणि या देशातील माणसाला राज्यघटना समर्पीत केली. ज्यामध्ये सर्वांना योग्य ते अधीकार, हक्क कर्तव्य जबाबदारी देवुन या भारताचे नंदनवन केले. म्हणुन आजही जगातील सर्वात मोठा लोकशाही मुल्य जोपासणारा देश म्हणुन आपली ख्याती आहे.समतेचा धागा जोपासणाऱ्या सर्वांनी हा चित्रपट अवश्य पाहावा….
लेखक:- प्रा. राहुल माहूरे
विभाग प्रमुख,वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा,
श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय, नांदुरा रेल्वे जि. बुलढाणा.
मो. ९८२२२७८९२५