
समाजसेवा ही केवळ एक जबाबदारी नव्हे, तर ती एक जिवंत वाटचाल असते – ही भावना कृतीतून जपणाऱ्या बौद्धाचार्य नितिन दामोदर साळवे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नारायणगाव यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हजारो भीमसैनिक, बौद्ध बांधव आणि समाजप्रेमींनी आपल्या उपस्थितीत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
बौद्ध संस्कृतीचा दीप तळमळीने तेवत ठेवणारा चेहरा
२०१९ पासून अखिल भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याचे बौद्धाचार्य म्हणून नितिन साळवे हे कार्यरत आहेत. त्यांनी तालुक्यातील असंख्य मंगल परिणय, पुण्यानुमोदन व धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊन बौद्ध संस्कृतीची शुद्धता, सात्विकता आणि आदर्श आचारधर्म जनमानसात रुजवला आहे.
त्यांची कार्यशैली म्हणजे निस्वार्थीपणाचा आदर्श. प्रत्येक विधी, प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी उपस्थितीतांवर केवळ बौद्ध तत्वज्ञानच नव्हे, तर एक सकारात्मक ऊर्जा फुलवली आहे.
समतेची मशाल घेऊन तरुणांसाठी आदर्श
समाजातील तरुणांना शिक्षण, स्वाभिमान व आंबेडकरी विचारांची दिशा देणारे साळवे हे केवळ बौद्धाचार्य नसून एक जिवंत चळवळ आहेत. समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्यांनी नवतरुणांना संघटित केले, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागवला. डॉ. आंबेडकर आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दिलेलं संरक्षण कार्य हे त्यांचं आंबेडकरी विचारांप्रती निष्ठेचं प्रतीक आहे.
नेतृत्वाची ओळख – जबाबदाऱ्या स्वीकारल्या, यशस्वीपणे पार पाडल्या
भारतीय बौद्ध महासभेच्या उपाध्यक्षपदापासून ते संरक्षण विभागाच्या नेतृत्वापर्यंत त्यांनी जेवढ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या, त्या सर्व यशस्वीपणे पार पाडत एक जबाबदार आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
गौरव सोहळा थाटात पार पडला
या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष के. डी. वाघमारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बी. वाव्हळ, उपाध्यक्ष राजेंद्र रणदिवे, कार्याध्यक्ष विलास कडलाक, सचिव अशोक खरात, आणि खजिनदार मिलिंद वाघांबरे हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी साळवे यांच्या कार्याचा मागोवा घेत त्यांच्या कार्यपद्धतीचं आणि तळमळीचं कौतुक केलं.
उपस्थित आमदार, विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, समाजबांधव आणि जुन्नर तालुक्यातील तमाम भिमसैनिकांनी आपल्या मन:पूर्वक अभिनंदनाने कार्यक्रमाला गौरवाचे स्वरूप दिले.