नियमित लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा

अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी

अकोला, दि. २५ : नियमित लसीकरणात समाविष्ट सर्व रोगप्रतिबंधक लसींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आज येथे दिले.

नियमित लसीकरण टास्क फोर्सच्या बैठक अति. जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मनपा वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. सिद्धभट्टी म्हणाले की, क्षयरोग, डिप्थीरिया, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओमायलाईटिस, गोवर, हिपॅटायटीस बी, अतिसार, जपानी एन्सेफलायटीस, एमआर, न्यूमोनिया आणि न्यूमोकोकल रोग आदींच्या लसी लसीकरणात समाविष्ट आहेत. बहुतेक लसींचे लसीकरण ८० टक्क्यांवर झाले आहे. तथापि, उर्वरित अल्प कालावधी लक्षात घेता ते तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

बीसीजी, पोलिओ व हिपॅटायटिस बी लसीकरण हा बाळाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. खासगी रूग्णालयांत हे लसीकरण झाले पाहिजे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. बाळापूर तालुक्यात लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. सहा वर्षांवरील शाळकरी मुलांच्या लसीकरणातही कुणीही सुटता कामा नये. त्यासाठी शिक्षण विभागाने सहकार्य करावे. काही ठिकाणी बालकांच्या लसीकरणाबाबत पालक अनुत्सुक असतात. तिथे अधिकाधिक जनजागृती व प्रबोधन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

डॉ. करंजीकर यांनी सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published.