अँड प्रकाश आंबेडकर
अकोला.. केंद्रात सत्तेत बसलेल्या मोदी सरकारने दहा वर्षात फक्त टिंगलटवाळी केली आणि मोठ्या प्रमाणात ईडी आणि सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर केला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत केला.
पुढे एड बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मोदींच्या कार्यकाळात लोकशाही ऐवजी पोलीसी राज्य अस्तित्वात असल्याचे दिसत आहे. या यंत्रणेचा गैरवापर करून अनेकांना वेठीस धरण्याचे काम या सरकारने केले. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. याचा अर्थ केवळ भीती दाखवण्यासाठी मोदी शासनाने लोकशाहीच्या विरोधात जाऊन सत्तेचा गैरवापर केला असे सिद्ध होते.
तसेच राम मंदिराच्या उद्घाटनासाठी काही शंकराचार्यांनी विरोध केला होता मात्र निवडणुका तोंडावर असल्यामुळे शुभ मुहूर्त न पाहता मोदींनी घाई घाईने मंदिराचे उद्घाटन करून टाकले. 400 पार चा नारा देणारी भाजपा हि संविधान बदलायच्या प्रयत्नात आहे.
2014 ला नवीन मतदार वर्ग बीजेपी कडे वळला होता, परंतु 10 वर्षात भाजपाने अपेक्षित काहीच केले नाही व या नवीन मतदारांचा भ्रम निराश झाल्यामुळे त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही, त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी प्रचंड घसरली. आता ह्या नव्या मतदारांनी मोदी सरकारच्या विरोधातील राग व्यक्त करण्यासाठी नवीन मतदारांनी निषेध करावा तसेच शाहू, फुले, आंबेडकर तसेच मानवतावाद स्वीकारणाऱ्या मतदार वर्गावर आता एक जबाबदारी आली आहे, लोकशाहीच्या नावाखाली जो धिंगाणा मोदींच्या काळात सुरू आहे त्याला कसे थांबवता येईल यासाठी मतदारांनी जागरूक राहून निर्भीडपणे वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे अशी आवाहन एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
ह्यावेळी पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर, अकोला लोकसभा मिडीया समीती प्रमुख एड नरेंद्र बेलसरे, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव उपस्थित होते.