रमा तू नसतीस तर? -भिमराव परघरमोल

ऐतिहासिक महापुरुष आणि महानायकांच्या जीवन विश्लेषणांती किंवा अभ्यासांती कळते की, ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’. ही म्हण त्यांच्या त्यागी, कष्टी, समर्पित तथा परोपकारी जीवनाला तंतोतंत लागू पडते. तशीच आमची कोटयानुकोटींची आई रमाई. जी संस्कारवल्ली होती. रमाई केवळ व्यक्ती, पात्र किंवा स्त्री नव्हती, तर ती संस्काराचे महाकाव्य होती, सूर्याची सावली, करूणा, त्याग आणि मानवतेचा महासागर,, मातृत्वाची मातृत्वमनाची काळीजकथा, संपूर्ण जीवनाचा दुःखाशय, दुःख म्हणजे जीवन. अशी ती दुःखमय जीवनाची अंतहीन ओवी होती. अशा त्या दुःखाच्या अंतहीन ओवीने कवी, लेखक, साहित्यिक, अभ्यासकांसह मानवी जीवनाला झपाटलं नसेल तर नवलच!

रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ ला दाभोळ जवळील वनंदगावात झाला. अस्पृश्यांच्या पाच-पन्नास घरांमध्ये संस्काराची वाणवा नसणारं घर म्हणजे भिकुजी धुत्रे यांचं. वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच मुलीचं लग्न व्हावं अशी तात्कालीन प्रथा आणि परंपरा. अल्पवयीन रमाच्या समजूतदार व्यक्तिमत्त्वामध्ये शहाणपण ठासून ठासून भरलेलं होतं. तरीही आई रखमाबाई रमाच्या जीवनात सुखी संसारासह परोपकार कसा करावा यांच्या संस्कारांचं सिंचन करतच होती. त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व सहनशीलता, त्याग, समर्पण, स्वाभिमान, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्याचा मानसन्मान करणे, कोणाचाही अपमान न करणे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे, या नैतिक मूल्यांनी ओसंडून वाहत होतं.

अशातच विदुल्लतेचा आगडोंब कोसळून संपूर्ण जीवन भस्मसात व्हावं असा आईच्या मृत्यूचा पहिला दुःखरुपी कडेलोट रमाईच्या जीवनात झाला. जीवन एकदम सैरभैर झालं. तरीही त्यामधून सावरत ती स्वतःच वडिलांसह दोन लहान भावंडांची आई झाली. त्या दुःख ज्वालांनी होरपडून होणाऱ्या जखमा भरून निघत नाही तोच वडिलांनीही इहलोकीचा निरोप घेऊन अनाथपणाच दुर्दैवी जीवन पदरी आलं. तो जखमी काळजावर दुसरा असह्य आघात होता. तेव्हा मात्र रामाचं आकाशच फाटलं. अनावर दुःखामुळे अश्रुनीही पाठ फिरवली. काळीज स्थिजलं. आईच्या मृत्यूसमयी दगडालाही पाझर फुटावा असा टोह फोडणारी रमा आज गप्प का? असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. तिने रडावं. रडून मन मोकळं करावं. असं प्रत्येकाला वाटत होतं. तसे प्रयत्न सुरु असताना सहा सात वर्षीचा लहानगा जीव फक्त एवढंच बोलून मोकळा होतो की, “लहानपणीच कुणाचेही आई-वडील मरू नये”. आणि ती दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घेते.

भविष्याने पुढ्यात काय वाढवून ठेवलं होतं? याची कोणालाही कल्पना नसून काहीही सांगता येत नव्हतं. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या काका मामांनी या अनाथाचे नाथ होण्याचा विडा उचलला. म्हणून तीनही भावंड मुंबईला रवाना झाली. तिथेच मग दहा वर्षांच्या रमाचं समाजातील सर्वात जास्त शिकलेल्या दहावीत असणाऱ्या भीमरावांसोबत लग्न झालं. कुठेतरी थोड्या दिवसांसाठी का होईना, परंतु नशिबाने कुस बदलली. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले रमाने भिमारावाच्या घराला घरपण बहाल केलं. आईच्या संस्कारामुळे ती सर्वांच्या मनावर अधिराज्य करू लागली. त्यामुळे रमा कुटुंबातील प्रत्येकाच्या काळजाचा ताईत, जीव की प्राण झाली. घरात सतत रमाच नाव उच्चारलं जात होतं. तिच्याशिवाय घराचं पानही हलत नव्हतं. ती अडाणी जरूर होती, परंतु सात्विक आणि सुसंस्कृत होती. तिचं स्वतःचं सुख म्हणून असं काहीच नव्हतं. घरातील प्रत्येकाचं सुखच तिनं आपलं म्हणून मान्य केलं होतं.

लग्नानंतर एक दिवस रमानं शिकवं, लिहितं-वाचतं व्हावं, असा विचार भीमरावांना शिवला. त्यांनी तशी साद घातली. परंतु रमा म्हणाली, “आपण एवढं मोठं शिकता, लिहिता, वाचता हे काय कमी आहे? मी कशाला? तेव्हा ते महात्मा ज्योतिराव फुले यांचा दाखला देताना म्हणतात की, “अगदी दहा-वीस वर्षांपूर्वी एका महान व्यक्तीने आपल्या पत्नीला शिकवलं सुशिक्षित, सुसंस्कारित, शिक्षिका, मुख्याध्यापिका, लेखिका केलं. तेच आपले कुलपुरुष आहेत. त्यांचाच आदर्शआपण घ्यावा. हे ऐकून रमाने होकार दर्शविला. सन १९१२ ला जेव्हा रमा-भिमरावांना पुत्रप्राप्ति होऊन दोघांचेही व्यक्तिमत्व पूर्णत्व साधते, तेव्हा बाळाची वेगवेगळी नावं समोर येतात. पुन्हा बाबासाहेब ज्योतिराव फुलेंचा दाखला देऊन म्हणतात, “आपण आपल्या बाळाचे नाव यशवंत ठेवूया, कारण त्यांनी आपल्या दत्तक पुत्राचे नाव यशवंत ठेवलं होतं”. त्यावर दोघांचेही एक मत होते.

सन १९१३ ला जेंव्हा भिमराव शिक्षणासाठी विदेशी जातात, तेव्हापासून इकडे रमाईच्या संसाराला कोणाची तरी नजर लागल्यागत मरणांची झडी लागते. तिचा सासरा, भासरा, मुलगा, मुलगी, मीरा आत्या असे अनेक मरण ती उघड्या डोळ्यांनी पाहते. त्यामुळे ती खंगून आणि खचून जाते. नशीब जणू काही तिची परीक्षाच पाहत होतं. तिला हरवू पाहत होतं. परंतु ती हरत नव्हती.

सन १९१७ ला बाबासाहेब विदेशातून परत आल्यानंतर त्यांना सीडनहॅम कॉलेजमध्ये ४५० रुपये पगाराची नोकरी मिळते. जी दोनच वर्षासाठी असते. पुन्हा शिक्षणासाठी विदेशी जायचं म्हणून काटकसरी जीवन जगावं असा त्यांचा सक्त आदेश होता. त्यामुळे रमाई कधीकधी वैतागून जायची. यशवंताचं संधीवाताचं दुखणं, नवऱ्याचं संसारात लक्ष नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटत होतं. रमाईची कधीकधी खूप चिडचिड होई. ती संतापून बोलायची. बाबासाहेब मात्र हसण्यावर न्यायचे. प्रत्यक्ष जेव्हा विदेशी जाण्याची तयारी झाली तेव्हा मात्र दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. पण शेवटी रमाईनेच माघार घेतली. तिने विचार केला आपला नवरा म्हणजे विद्युतप्रवाह. एक वादळ. तो महासुर्य होऊ पाहतो. त्यामुळे त्यांला संसाराला जुंपू नये. त्या वादळाला थांबवू नये. तुफनाच्या पायात संसाराची बेडी टाकू नये. आता आपण त्या वादळासोबत वाहत जायचं, ते कुठेही नेवो, आपल्याला कितीही कष्ट पडोत, आता जगायचं फक्त सूर्याची सावली होण्यासाठी. त्यानंतर मात्र रमाईने त्यांना कधीच अटकाव करण्याचा किंवा थांबवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. संसाराची सुखदुःख, उनी-दुनी, दुखणे-खुपणे, टंचाई कधीच त्यांनी बाबासाहेबांच्या कानावर घातली नाही.

रमाईमध्ये सोशिक आणि स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच विकसित झालेली होती. ती लहान असताना तिच्या शेजारची एक बाई आजारी होती. जेवण तयार करून खाण्याइतपतही तिच्यात त्राण नव्हता. लहानगी रमा तिच्या घरी जाऊन डाळ-भात शिजवून तिला खाऊ घालते. ती तृप्त झाल्यावर रमाला भल्याआयुष्याच्या खुप सार्‍या आशीर्वादांसह एक ढबु पैसाही देते. परंतु तो पैसा आईच्या नजरेतून सुटत नाही. आईला समजल्यावर ती खूप रागावते आणि म्हणते, “कुणाला मदत करणं अतिशय चांगला आहे. परंतु त्याचा मोबदला घेणं अतिशय वाईट. त्यामुळे उपकाराचे मूल्य संपून जाते. त्याला अर्थ उरत नाही.” रमा लगेच तो पैसा त्या शेजारणीला परत करून येते. हे आईचे संस्कारमूल्य ती आयुष्याच्या अखेरपर्यंत जोपसते. बाबासाहेब जेव्हा चार-चार वर्षांसाठी दोन वेळा विदेशात शिक्षणासाठी गेले होते, तेव्हा रमाईला अतिशय हलाखीचे, दुःखी, कष्टी, दारिद्र्यपूर्ण दिवस व्यतीत करावे लागले होते, कारण घरात कमावणारा कोणीच नसतो. घराचा आधारवड ज्यांच्या पेन्शनवर घर चालायचं ते म्हणजे बाबासाहेबांचे वडील आणि दुसरा घराचा हातभार म्हणजे मोठा भाऊ आनंदराव हासुद्धा बवासीरमुळे मरण पावलेला होता. त्यावेळी रमाईच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा काळीज पीळवटून टाकणाऱ्या होत्या. ती एका बॅरिस्टर ची पत्नी सरपण गोळा करण्यासाठी मैलोंमैल फिरते. मोलमजुरी करण्यासाठी जाते. शेन गोळा करून त्याच्या गोवऱ्या थापून त्या विकते. एवढं करूनही पोटाने पोटभर अन्न मिळत नाही. कधी भिजलेली उडदाची डाळ खावी व पाणी पिऊन झोपून जावं. कधी एका सांजेला जेवावं. कधी अर्धपोटी राहावं तर कधी न जेवता ही झोपावं. रमाई बाजरीच्या चार भाकरी करायची. यशवंत, मुकुंदा आणि शंकर यांना प्रत्येकी एक आणि शेवटची चौथी लक्ष्मी, गौरा आणि स्वतः खायची. भाकरी सोबत भाजी असेलच असे नाही. बऱ्याच वेळा कांदा, मीठ, चटणी यावरच भागवलं जायचं. हे जेव्हा बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं तेव्हा सर्वांनी मिळून रमाईच्या संसाराला काही हातभार लावावा म्हणून थोडे पैसे गोळा केले. परंतु त्या सर्व कार्यकर्त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानून रमाईने ते आदरपूर्वक नाकारून पुन्हा आपला स्वाभिमानी बाणा सिद्ध केला. त्यावेळी शेजारपाजारच्या काही महिलाही रमाईला टोमणे मारत असत. एवढी मोठी बॅरिस्टरची बायको परंतु अंगावर गूंजभर सोनंही नाही. कामावर जावं लागते. सरपण गोळा करावं लागते. गोवऱ्या थापून बिचारी संसार चालवते. काय करावे एवढ्या शिक्षणाचं? रमाई त्यांच्या बोलण्याला कधीही प्रत्युत्तर देत नाहीत. उलट बाबासाहेबांना हे सर्व लिहून पाठवतात. प्रतिउत्तरात बाबासाहेब म्हणतात की, “रामू कुणालाही मिळाला नसेल असा दागिना तुला मिळेल. कदाचित तूच कोट्यावधी लोकांच्या गळ्यातील दागिना होशील. दुःख आणि कष्टानेच जीवन उजळून निघते. तेच आपल्याला मोठं करतात. त्यांचे आपण आभार मानले पाहिजे.” पत्र लिहिताना साहेबांच्या आणि वाचताना रमाईच्या डोळ्यांना महापूर आलेले असतात.

रमाईच्या दुःखी, कष्टी, त्यागी, समर्पित जीवनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनोमन जाणीव असते. म्हणूनच ते जेव्हा पहिल्या गोलमेज परिषदेसाठी लंडन येथे जातात तेव्हा तिथून रमाईला ३० डिसेंबर १९३० ला प्रदीर्घ असं पत्र लिहून भरल्या डोळ्यांनी म्हणतात. रमा तू नसतीस तर?…….

भिमराव परघरमोल

(व्याख्याता तथा अभ्यासक फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा)

तेल्हारा जि. अकोला मो.९६०४०५६१०४

Leave a Reply

Your email address will not be published.