
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, अमरावती विभाग,अमरावती
अकोला: महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982/84 अर्थात जुनी पेंशन योजना लागू व्हावी यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सुरू केलेल्या संपाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, अमरावती विभाग, अमरावतीच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.
“डाटा” ही सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून संवैधानिक मार्गाने संघर्षरत असणारी शिक्षकांची संघटना आहे. न्याय,स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर व संविधानावर संपूर्ण निष्ठा ठेवून कार्य करणारी ही संघटना सदैव मानवी हक्क व न्यायासाठी कार्य करणारी एक चळवळ असल्याने ज्या ज्या वेळी मानवी मूल्यांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होते, पायमल्ली होते त्या त्या वेळी प्रत्येक आंदोलनात संपूर्ण सामर्थ्याने सहभागी असते.
आपल्या देशात सर्वाँना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी सामाजिक न्याय खाते निर्माण केले असून सामाजिक कल्याणाच्या विविध योजना राबविण्याची संवैधानिक जबाबदारी शासनावर आहे. या सामाजिक कल्याण योजने अंतर्गत कर्मचारी पेन्शन योजना कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व कर्मचारी वर्गाला पेन्शन लागू आहे. मात्र शासनाने ही पेन्शन योजना बंद करून २००५ नंतर नवीन योजना सुरू केली. ही योजना अन्यायकारक आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग सातत्याने या योजनेचा विरोध करीत आहे. परंतु शासनकर्ते ” हम करे सो कायदा ” या न्यायाने वागत आहेत. परिणामी १७ वर्षानंतर अखेरचा मार्ग म्हणून कर्मचारी वर्गाला बेमुदत संप करावा लागत आहे. एकीकडे पाच वर्षे सत्तेत येणारे आमदार खासदार सर्व सोयी सुविधा व पेन्शन घेतात. आपल्या वेतनात भरघोस वाढ करून घेतात. मग कर्मचारी वर्गाच्या बाबतीत दूजाभाव का? हा खरचं एक यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांनी सुरू केलेला संप हा न्याय्य असून डाटा ही संघटना शिक्षकेतर/शिक्षक कर्मचारी बांधवांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी असून संपाला संपूर्ण पाठिंबा जाहीर करीत आहे.
अध्यक्ष/सचिव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अमरावती विभाग, अमरावती.