
प्रमुख अतिथी सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे
नमस्कार ।
दहाव्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाच्या अध्यक्ष पदावरुन आपणा सर्वाना संबोधित करतांना मला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. आनंद अशासाठी की, कोरोनाच्या या महामारीमुळे सुमारे दोन वर्षे आपल्याला एकमेकांना प्रत्यक्षात भेटता येत नव्हते, तो अवघड काळ आता संपला असून आपण एकमेकांना प्रदीर्घ काळानंतर प्रत्यक्ष भेटत आहोत. अभिमान अशासाठी की, गजल नवाज भिमराव पांचाळे यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय मराठी गजल संमेलन २००१ साली पहिल्यांदाच संपन्न झाले तेव्हा त्या संमेलनात भिमराव पांचाळे यांचा सहकारी म्हणून मी उपस्थित व सहभागी होतो, व माझे स्वतःचे पहिले पुस्तक- शब्द झाले सप्तरंगी हा गजल संग्रह त्या संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे हस्ते प्रकाशित झाला होता. आणि आज अकोला येथे मोठया उत्साहामध्ये हे संमेलन पार पडत असून या दहाव्या संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान मला प्राप्त झाला आहे. याबद्दल सुरुवातीलाच गजल नवाज भिमराव पांचाळे व गजल सागर प्रतिष्ठाण यांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.
गजलच्या आजवरच्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनांमधून अनेक गजलकांराना गजल लिहिण्यासाठी प्रोत्साहन व ऊर्जा मिळत आलेली आहे व मी स्वतः याचा साक्षी आहे. संमेलनांमधील मुशायरे परिसंवाद, मुक्त चर्चा, गजल गायनाच्या मैफली ही रसिकांसाठी केवळ एक पर्वणी नसून त्या निमित्ताने मोठया प्रमाणात नव्या गजलकारांना व गायकांना ऐकण्याची तसेच परिसंवाद, चर्चासत्रांमधून गजलेबद्दलच्या आपल्या जाणिवा रुंदावण्याची संधी गजलकार व रसिकांना या संमेलनांमधून मिळत असते.
या प्रसंगी कविवर्य सुरेश भट यांची प्रकर्षाने मला आठवण येत आहे. सुमारे ३६ वर्षा पूर्वी म्हणजेच तीन तपांपूर्वी भट साहेबांची म्हणजेच दादांची माझी पहिल्यांदा गाठ पडली. साधारणपणे १९८० पासून दादा हे नवोदित गजलकारांना मार्गदर्शन करु लागले होते. एखादा चांगला गजलकार किंवा गजल लिहू इच्छिणारा कवी त्यांच्या लक्षात आला तर ते
स्वतःहून त्याच्याशी पत्रव्यवहार करत असत आणि ‘गजलेची बाराखडी’ नावाची मार्गदर्शन पर पुस्तिका त्याला स्वतःहून व स्वखर्चाने ते पाठवत असत.
१९८६ मध्ये दादा हे पुण्याच्या मेनका मासिका मध्ये गजलिस्तान नावाचे सदर चालवत असत. त्यामध्ये नव्याने गजल लिहू लागलेल्या कवींच्या गजला निवडून त्या प्रसिध्द केल्या जात. मी देखील तेव्हा नव्याने गजल लिहिण्याचा प्रयन्त सुरु केला असल्याने माझी देखील एक रचना त्यांच्याकडे पाठवून दिली होती. त्यावर दादांनी मला एक पत्र लिहिले. त्यांनी मुळात माझ्यासारख्या नवख्या गजलकाराला असे पत्र लिहिणे हाच मला आश्चर्याचा सुखद धक्का होता. त्या पत्राचा आशय असा होता की, ‘तुझी गजल मी या सदरामध्ये प्रसिध्द करु शकत नाही, कारण ती गजलेच्या तंत्रात पूर्णपणे बसत नाही. पण मी तुला पत्र लिहीण्याचे कारण हे आहे की, तुझी रचना वाचतांना माझ्या हे लक्षात आले की, तू एक चांगला कवी आहेस आणि तुला योग्य मार्गदर्शन मिळाले तर तू खूप चांगला गजलकार होऊ शकतोस तरी तू मला पुण्यात माझ्या पत्त्यावर येवून भेट. या पत्राच्या शेवटी त्यांनी लिहिले होते ‘तू मला जरुर भेट तुझा चाहता सुरेश भट यातील तुझा चाहता’ हे शब्द मला कोणत्याही पुरस्कारापेक्षा तेव्हाही मोठे वाटले आणि आजही इतक्या वर्षांनी तितकेच मोठे वाटतात. कारण या शब्दांतून भट साहेबांचा मोठेपणा आणि नवोदित व अनोळखी व्यक्तीला त्यांनी दिलेली उदार दाद दिसून येते. हा प्रसंग तपशीलात सांगण्याचे कारण हे आहे की, असेच प्रोत्साहन आणि मार्गदर्शन भट साहेबांनी मराठीतील अनेक उदयोन्मुख व दूरदूरच्या खेडयापाडयात राहणाऱ्या नवोदित गजलकारांना निरपेक्ष वृतीने आणि मनापासून दिले. सुरेश भट यांचे हेच काम नंतरच्या काळात गजल नवाज देखील तळमळीने केले. त्यांच्यामुळेच भिमराव पांचाळे यांनी देखील तळमळीने केले. खेडापाडयांतील अनेक गजलकार महाराष्ट्राला जात झाले, आणि गजल ही विधा केवळ जिवंत राहिली नाही तर ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बहरत गेली व रसिकांना आनंद देत गेली. अशा प्रकारे गजलच्या प्रचार प्रसाराला चळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याने ती जनमानसात रुजत गेली.
गजल ही अधिक लिहिली आणि ऐकली व वाचली गेली पाहिजे, कारण गजलेतून मिळणारा आनंद हा शब्दामध्ये सांगता येण्याइतका संकुचित नाही. ज्या ज्या भाषांमध्ये गजल रुजली आणि वाढली त्या भाषांना तिने समृध्द केले आहे व रसिकांना अवर्णनीय आनंद दिला आहे. अनेक जण गजल आणि इतर कविता यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक गजल आणि कविता यांचे भांडण नाही. तसे ते असूही शकत नाही. कारण गजल हा कवितेचाच एक प्रकार आहे. अशा अकारण निर्माण केलेल्या वादामधून गजलेचे, कवितेचे व एकूणच मराठी भाषेचे नुकसान होते. बऱ्याचदा गजल लिहिणाऱ्या कांहीची मानसिकता अन्य काही न लिहिण्याची व न वाचण्याची असते. पण गजल लिहिणारांनी, त्यांचा तसा पिंड असेल तर, अन्य कविता व गदय लेखनही करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे गजल हा हवाबंद कप्पा असल्याचा काही जणांचा समज काही अंशी तरी दूर होईल. यासाठी कवि संमेलनाच्या आयोजकांनी आपल्या संमेलनात गजलचाही समावेश केला पाहिजे. गजल ही फक्त मुशायन्यांमध्येच ऐकविली पाहिजे किंवा ऐकविली जावी असा अट्टाहास योग्य नाही. गजलांचे मुशायरे आयोजित करणारांनीही गटबाजी, कंपूबाजी न करता दर्जेदार, नव्या जुन्या गजलकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर गजलची लोकप्रियता आणि लोकमान्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
माधव जूलियन यांनी मराठीत गजल सुरु केली असे मानायला काहीच हरकत नाही. त्यांच्यामुळेच मराठीला गजल हा काव्यप्रकार पहिल्यांदा ज्ञात झाला ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठी गजलेवरील त्यांचे ऋण हे वादातीत आहे. जूलियन यांच्या गजल वाचताना त्यांची तंत्रशुध्दता व वृत्तांवरील त्यांची पकड आपल्याला प्रभावित करते. जूलियन यांचे काही शेर येथे मी उद्धृत करतो. ‘आई नांवाचा गज्जल’ या शीर्षकाखाली लिहिलेले हे शेर पुढीलप्रमाणे आहेत.
नाही तुझ्या मी पोटचा गोळा परी
‘आई’ म्हणूनी हाक मारी वैखरी
माझे तुझे नाते कधीचे कोठले ?
ही काय माया, योजना वा ईश्वरी?
माझी मला काही कळेना पात्रता
तैशीच तूझ्या थोरवीची पायरी
हे शेर मी अशासाठी उद्धृत केले आहेत की, जूलियन यांनी केवळ पर्शियन प्रभावाखाली गजल लिहिली आहे हे म्हणणे खरे नाही, हे मला सांगायचे आहे. अर्थातच जूलियन यांची गजल आशयाच्या दृष्टीने तितकीशी बहुरंगी व व्यापक नव्हती. त्यामुळेच सुरेश भट यांनी जेव्हा गजल या काव्य प्रकाराला मराठीमध्ये हात घातला, तेव्हा त्यांच्या प्रतिभेने, वैविध्यपूर्ण अनुभवांमुळे, अस्सल देशी प्रतिमांमुळे व त्यांच्या संवादी शब्दकळेने मराठी गजलचे एक वेगळेच विश्व आकाराला आले. कधी अलवार, हळुवार होणारी तर कधी वार-पलटवार करणारी रसरशीत शब्दकळा त्यांच्याकडे होती. वृत्ती-प्रवृत्ती निवृत्तीचा खेळ त्यांच्या ओळीओळींत होता. कधी जगण्याचे अवघे रंग घेऊन त्यांच्या गजलचे इंद्रधनुष्य क्षितिजावर उमटू लागले तर कधी वीज होऊन त्यांची गजल- सौदामिनी आभाळाला तेजाळू लागली.
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ हे त्या गजलेचे जणू घोषवाक्यच होते. सुरेश भट यांच्या गजलांची रेंज एवढी मोठी होती की त्यांच्या गजलांमधून जीवनाच्या रंगांपैकी एकही रंग किंवा काव्याच्या नवरसांमधील एकही रस सुटला आहे असे वाटत नाही. भटांच्या गजलेने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या शब्दांचे गारुड अदयाप ओसरलेले नाही व ओसरणारही नाही. काही अतिविद्वान समीक्षक चांगल्या गजलकारांची हेटाळणी करण्यासाठी त्यांच्यावर सुरेश भटांचा प्रभाव आहे असा हिणकस शेरा मारतात. वास्तविक मराठीतील प्रत्येक गजलकारावर भटांचा प्रभाव असणे नैसर्गिक आहे व ते गजलेच्या गुणवत्तेसाठी उपकारकदेखील आहे. एखादया गजलकारावर सुरेश भटांचा अजिबातच प्रभाव नसेल तर तो असंवेदनशील दगड आहे असे म्हणता येईल, त्यामुळे, “भट संप्रदाय’, ‘भटांचा भटारखाना’ वगैरे शब्द केवळ व्देषमूलक आहेत.
गजल लिहायला नुसतीच शब्दांची झाडे-झुडपे पुरेशी नसतात तर अरण्यासारखा घनदाट आशयही आवश्यक असतो. गजल लिहिणे म्हणूनच एक थ्रिल आहे. गजल लिहिताना जो आनंद मिळतो, तो खरा महत्वाचा; ती कुठे छापून आली / नाही आली, तिचे पुढे काय झालं हे सगळे निरर्थक. कथा लिहून झाल्यावर माझा तिच्याशी संबंध संपतो, असं जी. ए. म्हणायचे तसे भटही गजल लिहितानाच अफाट रंगून जायचे. एखादा शेर छान जमला तर वा। सुरेश भट, वा!' म्हणत स्वतःच्या हातांनी स्वत:ची पाठ थोपटायचे, अशी ब्रम्हानंदी टाळी लागणे ही खरी क्रिएटिव्हिटीची खूण. लोकांनी दिलेल्या प्रतिसादाला मोल आहे. पण ते सगळे नंतरचे स्वान्तः सुखाय हेच खरे. चूक-बरोबर माहीत नाही. पण मला तरी असेच वाटल आले आहे.
गजलशी असा सूर जुळला की मग बाकीच्या सगळ्याच औपचारिकता निरर्थक होतात. हातात हात घालून चालणाऱ्या आणि डोळयांत डोळे घालून बोलणाऱ्या माणसाला त्याचे आपले नाते काय हे विचारु नये. गजलची सोबतही अशीच शब्दांच्या, समीक्षेच्या, टीकाटिपणीच्या पलीकडची आहे. खरे सांगायचे तर गजल ही एखादया नदीसारखी आहे. आपण फक्त तिच्या प्रवाहात झोकून दयावे आणि तिच्यावर विश्वास टाकावा. ती कधीच दगा देणार नाही. आपल्या थरारक वेगात आणि धुंद लयीत ती आपल्याला आनंदाच्या समुद्राकडे नक्कीच घेऊन जाईल. गजलमध्ये अन्य भाषांतील शब्दांचा मुक्तपणे वापर झाला पाहिजे. गजल हे मुळातच गंगाजमनी संस्कृतीचे प्रतीक आहे. म्हणून गजलची भाषा देखील प्रवाही, संवादी आणि सर्वव्यापी अशी असणे आवश्यक आहे. गजलमध्ये रचनेचे स्वातंत्र्य येण्यासाठी स्वरांचा काफिया ही उर्दूमध्ये प्रचलित असणारी यमकाची पध्दत अवलंबविण्यास काहीच हरकत नाही. तसेच उर्दूप्रमाणे एकाच गजलमध्ये एकच काफिया आहे. अनेकवेळा वेगवेगळ्या शेरांमध्ये वापरायला हवा. असे केल्याने मराठी गजल अधिक मोकळी ढाकळी, बंधमुक्त तर होईलच पण कोणताही रसभंग न होता उलट त्यामुळे रस परिपोषच होईल.
गजलकाराने बहुश्रुत असले पाहिजे असे भट साहेबांचे म्हणणे असे. त्यासाठी प्रत्येक गजलकाराने आपले वाचन सतत वाढवत राहिले पाहिजे. केवळ गजलच नव्हे तर इतर साहित्य व अन्य भाषांमधील व मराठीमधील अन्य गजलकार वाचले पाहिजेत ‘इतरही वाचावे व इतरांचेही वाचावे’ हा मंत्र गझलकाराने कधीही विसरू नये, असे मला सुचवावेसे वाटते.
साहित्यामध्ये कविता उत्कट असते तर कविते मध्ये गजल हे उत्कटतेचे टोक असते. वृताचे बंधन ठेवून मोजक्या शब्दांत ( आणि दोन ओळींत) एक विषय मांडायचा आणि तो ही प्रभावीपणे ही साधी गोष्ट नाही. त्यामुळे हे ज्याला जमते तो गजल लेखनाकडे आपोआपच वळतो. गजलच्या प्रत्येक शेरात वेगळा विषय हाताळता येतो हे गजलचे बलस्थान आहे. जो बहुश्रुत आहे आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या रंगात जो रंगला आहे त्याला गजल लिहीण्याची नशाच चढते असे म्हणता येईल. अनेक यशस्वी कवींना गजल लिहिता येत नाही कारण हा फॉर्म वरकरणी सोपा वाटला तरी हाताळायला तसा सोपा नाही. हा फॉर्म मी निवडला कारण त्याची परिणामकारकता त्यामध्ये असलेली लय मला अत्यंत विलोभनीय वाटते. आणि वृताच्या बंधनामुळे गजलचे सौंदर्य अधिकच गूढ आणि आकर्षक होते. गजलचा एखादा प्रभावी शेर मैफलीचा अख्खा नूर पालटण्याची जादू करतो. वेगवेगळे विषय एकच हाताळण्याची संधी फक्त गजलमध्येच मिळते, त्यामुळे प्रत्येक चांगली गजल ही सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखीच असते. कविच्या शब्दप्रभुत्वाचा, कल्पनाशक्तीचा, प्रतिभेचा खरा कस गजल लिहिताना लागतो. म्हणूनच गजल लिहिणारा प्रत्येक जण आधी उत्तम कवी असावा लागतो. (आणि सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे तो प्रथम उत्तम माणूसही असावा लागतो.)
गजल म्हटले की बरेचजण उर्दूचे नांव घेतात आणि कानाची पाळी पकडतात. यात गैर काही नाही. मात्र यात डोळस वाचन आणि अभ्यासापेक्षा भोंगळ श्रध्देचा आणि ऐकीव माहितीचा भाग जास्त असतो ही दुःखाची गोष्ट आहे. गजल फक्त उर्दूतच प्रभावीपणे लिहिली जाऊ शकते आणि अन्य भाषांत ती तितकी परिणामकारक वाटत नाही या म्हणण्याला काहीच आधार आणि अर्थ नाही. गजलचा फॉर्म इतका अदभुत आहे की कोणत्याही भाषेतला भाषाप्रभू, प्रतिभावंत कवी आपल्या शब्दांनी गजलची मनोहारी सृष्टी पाहता-पाहता उभी करु शकतो. तरीही उर्दू गजलचा दबदबा अमान्य करुन चालणार नाही. कारण उर्दू गजलची परंपरा प्रदीर्घ आहे आणि अनेक प्रतिभावंत शायरांनी उर्दू गजलला मोठे वैभव प्राप्त करुन दिले आहे. त्यामुळेच मीही उर्दूच्या प्रेमात पडून उर्दू भाषा व लिपी शिकून उर्दूतूनही रिंद हे टोपणनाव म्हणजे तखल्लुस धारण करून गजललेखन केले आहे.उर्दू गजलचा अभ्यास म्हणजे एका अर्थाने भारतीय संस्कृतीचाच अभ्यास आहे मुळात उर्दू ही भारतातच जन्मलेली भाषा आहे. वेगवेगळ्या कालखंडांत, वेगवेगळ्या प्रदेशांतल्या, वेगवेगळ्या जाती धर्माच्या कविनी उर्दू गजल समृध्द केली. सामाजिक संदर्भाची, मानवी सुख-दुःखांची फार मोठी रेज उर्दू गजलमध्ये आढळते. त्यामुळे तमाम कला रसिकांनी आणि गजलकारांनी उर्दू गजलांचे वाचन आवर्जून करायला हवे. महम्मद कुली कुतुबशाह, वली दकनी, मीर तकी मीर, गालिब, मोमीन, दाग, जिगर मुरादाबादी, कतील शिफाई, दुष्यंतकुमार, राजेश रेड्डी...... उर्दू शायरांची किती नांवे घ्यावीत ?
उर्दू गजलचा हा प्रवाह कधीच थांबणार नाही कारण या प्रवाहात गंगा, यमुना आणि असंख्य नदया वाहताहेत. भारताची गंगा जमनी – तहजीब उर्दू गजलच्या रुपाने दिमाखात जगापुढे उभी आहे. म्हणून प्रत्येक सच्च्या भारतीयाला उर्दू भाषा आणि उर्दू गजलचा अभिमान वाटला पाहिजे. यासाठी प्रत्येकांने शक्य झाल्यास उर्दू भाषा आणि उर्दू (म्हणजेच अरेबिक) लिपी आत्मसात केली पाहिजे. त्यामुळे मूळ उर्दू लिपीतील गजलचे भांडार हाती येईल. अर्थात, हे प्रत्येकाला शक्य नाही याची मला जाणीव आहे. कारण त्यासाठी चिकाटी, परिश्रम आणि वेळ यांची आवश्यकता आहे. हे सगळ्यांना शक्य नसले तरी निदान उर्दूचा शब्दसंग्रह वाढवणे प्रत्येकाला सहज शक्य आहे. बऱ्याचदा उर्दू शेर वाचल्यावर / ऐकल्यावर रसिकांना भारावल्यासारखे वाटते पण बरेचसे शब्द अनोळखी असल्याने शेराचा अर्थ कळत नाही. म्हणून कंटाळा न करता सतत शब्दकोश पाहण्याची सवय केल्यास उर्दू शब्दभांडार आपोआप वाढेल आणि उर्दू गजला वाचण्याची गोडीही वाढत जाईल.
मराठी गजलमध्ये समाजातील उपेक्षित घटकांचे सुख:दुख अत्यंत समर्थपणे प्रतिबिंबित झालेले दिसते. याचे कारण सुरेश भट व भिमराव पांचाळे यांनी उपेक्षित वर्गातल्या अशा गजलकारांना लिहिते केले आणि त्यांनी लिहित रहावे यासाठी त्यांची सतत पाठराखण केली. त्यांतल्या प्रत्येक गजलकारामुळे एक वेगळी शब्दकला वेगळा भाषेचा बाज वेगळे अनुभव विश्व मराठी गजलेला मिळत राहिले व मिळत आहे.
जगाची झोकुनी दुःखे सुखांशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकुनी भेगा, मनुष्ये साधतो आम्ही..
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही..
जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिठयांशी बोलतो आम्ही..
हे शब्द जणू मराठी गजलच्या या नव्या शिलेदारांसाठीच भटांनी लिहिले आहेत. हे सामाजिक भान हा निश्चितच मराठी गजलचा एक लोभसवाणा पैलू आहे. अहमद फराज यांच्या शब्दांत सांगायचे तर
‘गमे दुनिया भी गमे यार में शामिल कर लो
नश्शा बढ़ता है शराबें जो शराबोंमें मिलें’
मराठीत गजल हल्ली मोठया प्रमाणावर लिहिली जात आहे. यात आनंद वा दुःख दोन्ही वाटण्यासारखे काही नाही. गजलकाराची तंत्रावर हुकूमत हवी हे जितके खरे तितकेच हेही खरे की त्याच्याकडे अस्सल कवित्वही हवे. काव्यात्मता नसेल तर कोणतीही गजल तंत्ररष्ट्या परिपूर्ण असूनही निर्जीव ठरते. ते तिरडीच्या ‘मापा’त डेकोरेट करुन ठेवलेले गजलचे कलेवर असते. पण यावर उपाय काही नाही. एकूणच काव्यात, साहित्यात व इतर कलांमध्ये चांगले-वाईट हे बऱ्यापैकी सापेक्ष असते. त्यामुळे लिहिणाराने लिहित जावे, वाचणाराने वाचत जावे’ हेच उत्तम. वाईट (बहुधा) कालौघात नष्ट होईल आणि चांगले (बहुधा) टिकून राहील. गजलला आधीच वृत्ताची आणि रदीफ, काफिया, अलामत वगैरे बंधने असतात. ती पाळण्याने गजल सुंदर बनते. पण उर्दूतही नसलेली पण मराठी गजलकारांनी बळेच ओढवून घेतलेली काही बंधने दूर केल्यास गजल अधिक मोकळी आणि जिवंत होईल. वृतासाठी अथवा रदीफ. काफियासाठी अनेकदा मराठी भाषेचाच खून पडतो. ज्यांना स्वतःच्या भाषे विषयी पुरेशी माहिती आणि प्रेम नाही, त्यांनी गजल किंवा अन्य कोणतीही कविता लिहिण्याच्या फंदात पडू नये असे आवर्जून सुचवावेसे वाटते.
मी काव्याच्या प्रांतामध्ये मुक्तछंदापासून लावण्या, कोळीगीतांपर्यंत जमेल तशी मुशाफिरी केली आहे. पण गजल हा माझा मूळ स्वभाव आहे असे म्हणता येईल. प्रत्येक शेरात वेगळा विषय मांडण्याची असलेली मोकळीक आणि दोन ओळीत सगळा आशय व्यक्त करायचा असल्याने शब्दांशी चालणारा रोमांचक रोमान्स ही गजलची बलस्थाने आहेत असे मला वाटते. काही लोक म्हणतात त्याप्रमाणे या गजलच्या मर्यादा नाहीत. उलट ही तर गजलची शक्ती आहे. गजलमधला पंच इतर कोणत्याही काव्यप्रकारात नाही. अर्थात गजल लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. हा ताकदीचा मामला आहे. ज्यांना गजल लिहिणे कधीच जमले नाही त्यांनी गजलला दूषणे देणे हे कोल्हयाला द्राक्षे आंबट या म्हणीचे उत्तम उदाहरण आहे. गजलला बंधने आहेत असे म्हटले जाते. पण मग सगळ्याच काव्य प्रकारांना आणि साहित्य प्रकारांना काही ना काही बंधने असतात. गदय वाक्याचे तुकडे केल्यावर ती कविता होत असेल तर गजल ही कविता का नाही याचे उत्तर उपरिनिर्दिष्ट कोल्हयांनी देणे आवश्यक आहे. यांचा आणखी एक आक्षेप म्हणजे गजलला वृत्ताचे बंधन असते आणि दोन ओळीत एक पूर्ण शेर संपवायचा असतो, त्यामुळे गजलमध्ये उत्स्फूर्तता कमी आणि कारागिरी किंवा रचना कौशल्य जास्त असते. खरे तर साहित्याच्या सगळ्याच प्रकारांत रचनाकौशल्य खूप महत्वाचे असते. ‘तुंबाडचे खोत सारख्या महाकादंबरीपासून ते अगदी शिरीष च्या तीन ओळींच्या हायकूपर्यंत सर्वत्र रचनेचे सौंदर्य आणि कौशल्य प्रकर्षाने उठून दिसते. आख्खीच्या आख्खी कविता किंवा कथा माणसाला एक दमात स्फुरु शकत नाही. तिचा जर्म फक्त त्याला एका झटक्यात सुचतो. बाकीची कमाल रचनेचीच असते. मला मला संपूर्ण कविता एका क्षणात सुचते आणि मी अजिबात रचना बिचना करत नाही म्हणणाऱ्या कवीला आपल्या पादत्राणांजवळही कुणी उभे करु नये असे माझे मत आहे. कारण अशी धडधडीत थाप मारणारा माणूस किती धोकादायक असेल याची कल्पना येणे कठीण आहे. अशा मंडळींना ग. दि. माडगूळकरही कवी वाटत नव्हते कारण काय तर म्हणे ते गाणी रचायचे. गाण्यात काव्य नसते है। त्यांनी कोणत्या मम्मटाच्या काव्यशास्त्रात वाचले कळत नाही. खरे तर ‘ज्ञानेश्वरी रचलेली आहे आणि तुकोबांचे अभंगही रचलेले’च आहेत. रामायण रचलेले आहे आणि महाभारतही रचलेलेच आहे. असे काही चांगले रचता येणे हीही एक मोठी ताकदच आहे.
गजलच्या बाबातीत तर उलट असे म्हणता येईल की ज्याच्याकडे भरपूर काही सांगण्यासारखे आहे आणि ते योग्य व नेमक्या शब्दांत मांडण्यासारखी भाषेवर ज्याची हुकमत आहे तोच उत्तम गजल लिहू शकतो. गजलकार एकाच गजलमध्ये आयुष्याचे अनेक रंग आणू शकतो आणि तेही कुठेही लय बिघडू न देता. जगाच्या आणि जगण्याच्या सगळ्या रंगांमध्ये जो रंगला आहे आणि तरीही ज्याचा स्वतःचा रंग मात्र वेगळा आहे, अशा कलंदराला गजल सापडली की त्याच्या हातून गजलचे एक देखणे इंद्रधनुष्यच निर्माण होते. किंबहुना एखादया गजलकाराची गजल, त्याही पुढे जाऊन, एक अनेकरंगी आभाळच बनून जाते. याची उदाहरणे उर्दूतही आहेत. मराठीतही आहेत.
पण म्हणून गजल लिहिणे ही काहीतरी गूढ, अगम्य व क्लिष्ट गोष्ट आहे असे सांगण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात हेही चुकीचे आहे. त्यामुळे बरीच रसिक मंडळीही आपल्याला त्या गजलमधले काही कळत नाही बुवा’ असे म्हणताना आढळतात. गजलबद्दलचे हे असले गैरसमज काढून टाकायचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. विदर्भ आणि मराठी गजलचे नाते जुने आहे. आजही नव्या दमाच्या गजलकारांत विदर्भातील गजलकारांची संख्या लक्षणीय आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील पण स्थळकाळाअभावी तो मोह मी आवरत आहे. पश्चिम विदर्भातील एक महत्वाचे सांस्कृतिक आणि वाड्.मयीन केंद्र अशी अकोला शहराची ओळख आहे. भिमरावांची गजलची पहिली मैफल अकोल्यातच झाली. या संमेलनाचे यजमानपद अकोलेकरांनी मनापासून आणि उत्साहाने स्वीकारले व अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाच्या इतिहासातील एका देखण्या व संस्मरणीय संमेलनाचे यशस्वी आयोजन केले, याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाची ही परंपरा खंडित न होता नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने नवनवीन प्रांतांमध्ये त्यांचे आयोजन व्हावे असे माझ्याप्रमाणे सर्वच गजलप्रेमींना वाटते. माझेच शब्द मी उसने घ्यायचे ठरवले तर
‘नसे फक्त हा सोहळा अक्षरांचा
नसे बहर हा फक्त पाना फुलांचा
मरुभूमी ही जीवघेण्या व्यथांची
गजल हा असे कारवा वेदनांचा
ही गजलची खरी पहचान आहे. हा तुमच्या-माझ्या सुख दुःखांचा कारवा या संमेलनांच्या रुपाने सतत न थांबता अखंडित चालत राहो हीच अपेक्षा आणि सदिच्छा व्यक्त करुन मी माझ्या भाषणास पूर्णविराम देतो.
धन्यवाद !