अकोला..
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता मोदींच्या कार्यकाळात देशावरील कर्ज कितीतरी पटीने वाढले, हे ताज्या आकडे वरून स्पष्ट झाले असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते एड .प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मुस्लिम समाजाच्या वतीने फतेह चौकात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पुरुषोत्तम दातकर, मौलाना अब्दुल रशीद मदनी, जावेद कुरेशी, मजहर खान, अब्दुल रऊफ पहेलवान, गजानन गवई, शाहिदभाई, अफरोज मुल्ला, एड.अनवर शेरा, सय्यद अलीमुद्दीन, जुनेद मंजर, नकिर खान, जमील खान यांची उपस्थिती होती.
आंबेडकर पुढे म्हणाले की, मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. देशातील किसान आजही दिल्लीत आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमाल त्यांच्या शेतातच खरेदी करावा, असे मोदी सरकारचे धोरण आहे याला विरोध म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले.
मोदींच्या हुकूमशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही सांगता येत नाही. केंद्र सरकारने आणलेला एन आर सी , सी ए ए हा कायदा बेकायदेशीर असून अन्यायकारक आहे. भारतात जन्मलेल्या लोकांना जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल. देशात अशी काही जमात आहे की, त्यांचा राहण्याचा ठाव ठिकाणा नसतो दोन वेळचे जेवण भेटलं तरी त्यांच्यासाठी खूप आहे अशा लोकांकडे जन्माचा दाखला नसेल तर त्यांना आतंकवादी म्हणणार काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या अन्यायकारक कायद्याचा विरोध करण्यासाठी संसदेत आवाज उठवणे गरजेचे आहे. यासाठी मी आपणास सर्वांना विनंती करतो की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकजुटीने एका ताकदीने वंचित बहुजन आघाडी पाठीशी आपण उभे राहावे. मोदी सरकारला लोक कंटाळले आहेत. प्रत्येकाला परिवर्तन हवे आहे. कोणी उघडपणे बोलते तर कोणी बोलत नाही. तमाम जनता हे मोदीच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे.
नरेंद्र मोदी हा पंतप्रधान देशासाठी लाभदायक नाही. ते मुख्यमंत्री होते तेव्हा गोद्रा हत्याकांड घडले. पंतप्रधान झाले तेव्हा मणिपूर जळले. आता पुन्हा पंतप्रधान झाल्यास संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही, हा संभाव्य धोका आपण लक्षात घेतला पाहिजे.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात अशांतता माजेल, दंगली भडकतील. असा इशारा आंबेडकर यांनी दिला.
डॉ.दातकर यांची उपस्थिती
वंचित बहुजन आघाडीच्या या प्रचार सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खारपान पट्टा आंदोलनाचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर पुरुषोत्तम दातकर यांनी अचानक हजेरी लावल्याने अनेकाच्या भुवया उंचावल्या. मी काँग्रेसचा निष्ठावान आहे, मात्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ मी आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. बाळासाहेब आंबेडकर हेच योग्य उमेदवार आहेत यांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी आपली आहे असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.