अकोला(प्रतिनिधी)— अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘मिशन उडान’ उपक्रमांतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या “अमली पदार्थ – मृत्युचा मार्ग” या विषयावरील पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव समारंभ मंगळवारी पोलीस लॉन, अकोला येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी भूषवले.
२६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेमध्ये पथनाट्य, शाळा भेटी, व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, पोस्टर स्पर्धा यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीची जाणीव निर्माण व्हावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. अ-गट (१६ वर्षांखालील) व ब-गट (१६ वर्षांवरील) अशा दोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धेत जिल्हाभरातील तब्बल ५,४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्ष भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर “मिशन उडान” व “ऑपरेशन प्रहार” या उपक्रमांचे लोगो पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. प्रास्ताविक श्री. सतीश कुलकर्णी (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांनी केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
🔷 अ-गट:
प्रथम क्रमांक: कु. प्राची विनोद तायडे – ₹५,०००
द्वितीय क्रमांक: कु. हंसिका पेढीवाल – ₹३,०००
तृतीय क्रमांक: कु. अक्षरा शशिकांत पाटील – ₹१,०००
🔷 ब-गट:
प्रथम क्रमांक: कु. मधुरा थोरात – ₹५,०००
द्वितीय क्रमांक: कु. गायत्री खोतरे – ₹३,०००
तृतीय क्रमांक: कु. मोहिनी राजकुमार विश्वकर्मा – ₹१,०००
या विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन पोलीस अधीक्षकांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यासोबतच १२० विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देण्यात आली.
कार्यक्रमात एन्करेज फाउंडेशन, साने गुरुजी मंडळ पातुर, नाट्यकर्मी युवा मंच, पंचफुलादेवी समाजकार्य महाविद्यालय, खडकी, परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव यांच्या पथनाट्य सादरीकरणाचेही विशेष कौतुक करून संस्थांना सन्मानित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “अमली पदार्थांचे व्यसन समाजासाठी घातक आहे. युवकांनी सकारात्मकता, आरोग्यदायी जीवनशैली आणि समाजहिताचे कार्य निवडावे. पोलीस दल ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची यंत्रणा नसून, समाज बदलणारी शक्ती आहे.”
या कार्यक्रमाला जिल्हाभरातील विद्यार्थ्यांसह पालक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, राखीव पो.नि. गणेश जुमनाके, पोहवा संदीप तवाडे, विलास बंकावार, पो.कॉ. आशिष आमले, मपोका दिपाली राठोड, भारती ठाकूर व स्वप्ना चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी डोगरे व पो.हवा. गोपाल मुकुंदे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

