अकोला प्रतिनिधी : आज सकाळ पासून
पोलिस भरती सुरु झाली आहे. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने पोलिस भरती सुरु झाली आहे. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी यांचा वॉच आणि सर्व घडामोडींचा सीसीटिव्ही
रेकॉर्डीग होणार असल्याने कुठलीही त्रुटी या पोलिस भरतीत ठेवण्यात येणार नाही. त्याचबरोबर बायोमेट्रीक नोंद, उंची, धावणे यासाठीच्या अचुक नोंदीसाठी अत्याधुनिक मशिन्स येथे कार्यान्वित करण्यात आल्या आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली.
पोलीस भरती करीता आज सकाळी ५.०० वाजता उमेदवारांना पोलीस मुख्यालय अकोला येथे शारीरीक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यामध्ये आज रोजी बोलाविण्यात आलेल्या ८०० उमेदवारांपैकी ५७३ उमेदवार हजर झाले. हजर झालेल्या उमेदवारांची सर्वप्रथम कागदपत्र पडताळणी करण्यात आली, त्यानंतर छाती व उंची चे मोजमाप करण्यात आले. त्या मध्ये कागदपत्र पडताळणी मध्ये ०१ व छाती उंची मध्ये ७७ असे एकूण ७८ उमेदवार अपात्र झाले. पात्र उमेदवार यांची सर्वप्रथम १०० मीटर धावण्याची चाचणी व गोळा फेक चाचणी ही पोलीस मुख्यालय अकोला येथील कवायत मैदानावर घेण्यात आली व त्यानंतर १६०० मीटर धावण्याची चाचणी ही वसंत देसाई स्टेडीयम अकोला येथे घेण्यात आली.
तसेच पोलीस भरती करीता आदल्या दिवशी बाहेरगावावरून आलेल्या उमेदवारांची रात्रीला राहण्याची व्यवस्था राणी महल, पोलीस लॉन, अकोला येथे निःशुल्क स्वरूपात करण्यात आली आहे. तसेच मैदानावर चाचणी दरम्यान पाणी, शौचालय, रूग्णवाहिका, इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.