“शैक्षणिक व सामाजिक क्रांतीच्या अग्रणी : सावित्रीमाई ज्योतिराव फुले”- प्रा. डॉ. एम.आर. इंगळे

आज 3 जानेवारी, 2023 क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिराव फुले यांचा 192 वा जयंतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस व कार्यास विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम. *सावित्रीमाई यांचे शैक्षणिक कार्य :* 3 जानेवारी, 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. सावित्रीमाई यांचा विवाह नवव्या वर्षी म्हणजे 1840 मध्ये ज्योतिराव फुले यांच्या सोबत झाला. राष्ट्रपिता ज्योतिरावांनी तत्कालीन विषमतावादी व माणसाचे माणूसपण नाकारणारी व्यवस्था अनुभवली, तिचे बारकाईने निरीक्षण केले आणि बहुजनांच्या गुलामीचे मुळ अज्ञान, अंधश्रद्धा, देव, दैव व धर्मग्रंथांत आहे हे त्यांनी ओळखले. ही गुलामी नष्ट करायची असेल तर समाजाला व विषेशतः स्त्रियांना शिकविले पाहीजे यासाठी त्यांनी समाज परिवर्तनाचे कार्य हाती घेवून मुलींना शिक्षण देण्याचा निर्धार केला. कारण *” जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी” याप्रमाणे “जिच्या हाती लेखणी ती समाजाला उद्धरी”* यावर त्यांचा दृढ विश्वास होता. यासाठी त्यांनी प्रथमतः सावित्रीमाई यांना लिहायला – वाचायला शिकविले. शिक्षकी प्रशिक्षण दिले आणि 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढुन त्या शाळेत मुलींना शिकविण्यासाठी सवित्रीमाई यांना शिक्षिका म्हणून नियुक्त केले. भारताच्या इतिहासात पहिल्या शिक्षिका, अध्यापिका, मुख्याध्यापिका म्हणून त्यांच्या नावाची अजरामर अशी नोंद झाली.

ज्या काळात मुलींना / महिलांना शिक्षण देणे हे धर्मशास्त्रानुसार पाप होते. त्यामुळे धर्म बुडतो अशी समजूत होती त्या काळात मुलींसाठी शाळा काढणे व मुलींना शिक्षण देणे महाकठीण कर्म होते. प्रतिगाम्यांनी या त्यांच्या कार्याविरुद्ध रान उठविले. तर तथाकथित धर्ममार्तंडांनी सावित्रीमाई यांचा खूप छळ केला. त्यांनी शिकविण्याचे काम करू नये म्हणून त्यांच्या अंगावर कचरा, गाळ, शेण टाकले. त्यांना दगड मारले. पण सावित्रीमाई यांनी न डगमगता स्त्री शिक्षणाचा घेतलेला वसा सोडला नाही. त्यामुळे धर्ममार्तंडांनी ज्योतिरावांचे वडील गोविंदराव फुले यांना बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. या धमकीमुळे त्यांनी ज्योतिरावांना संगितले की, मुलींना शिक्षण देणे सोडा किंवा घर सोडा तेव्हा सवित्रीमाई यांनी ज्योतिरावांना हिंमत देवून त्यांना साथ दिली. घर सोडले पण शिक्षणाचे कार्य अविरत सुरू ठेवले. या फुले दांपत्यांनी 1 जानेवारी, 1848 ते 15 मार्च, 1852 पर्यंत 18 मुलींच्या शाळा काढल्या. 1849 साली पुण्याच्या उस्मान शेख नावाच्या मुस्लिम बांधवांच्या घरी मुस्लिम महिलांनाही शिक्षित करण्यासाठी शाळा काढली. एकुणच ज्योतिरावांच्या शैक्षणिक क्रांतीत सावित्रीमाईंचा मोलाचा वाटा होता.

सामाजिक कार्य :

राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकणारे क्रांतिकारक समाज सुधारक होते. त्यांच्या या सामाजिक क्रांतीच्या कार्याला सावित्रीमाईंच्या कार्यकर्तृत्वाची जोड होती. ज्योतिरावांच्या प्रत्येक कार्यात त्या खांद्याला खांदा देऊन सोबत देत असत. त्यामुळे ज्योतिरावांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य अधिक गतीने पुढे जात होते. ज्योतिरावांनी सतीप्रथेला रोखण्यासाठी 1854 मध्ये विधवा पुनर्विवाह सुरू केले. बालहत्या प्रतिबंधक आश्रम काढले. त्याची जबाबदारी सावित्रीमाई सांभाळत. काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचे पाऊल वाकडे पडले त्यात त्या गर्भवती झाल्यामुळे आत्महत्या करणार होत्या तेव्हा ज्योतिरावांनी त्यांना स्वतःच्या घरी आणले व सावित्रीमाई यांनी स्वत: त्यांचे बाळंतपण केले. त्यांना झालेला मुलगा दत्तक घेतला. 24 सप्टेंबर, 1873 रोजी क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या संस्थेत क्रांतीज्योती सावित्रीमाई ह्या महिला प्रमुख होत्या. 28 नोव्हेंबर, 1890 मध्ये क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांचे निधन झाले. मात्र सावित्रीमाई यांनी त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पुढे अविरत सुरू ठेवले.सावित्रीमाई ह्या शिक्षिका व समाजसेविका तर होत्याच पण यासोबतच त्या थोर कवयत्रीही होत्या. त्यांनी काव्यफुले, बावनकशी, सुबोधरत्नाकार हे काव्यसंग्रह लिहिले. सवित्रीमाई आपला सामाजिक कार्याचा वसा जपत असतांना 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. तेव्हा आपला मुलगा डॉ. यशवंत याला पुण्यात बोलावून त्यांनी प्लेगच्या रुग्णांची सेवा सुरू केली. ही रुग्ण सेवा करतांना त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च, 1897 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याचा सुगंध सदैव भारतीयांच्या मनात दरवळत आहे.

सावित्रीमाई व आजची शिक्षित स्त्री :

क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या असीम त्यागातून व अपार कष्टातून भारतात स्त्री शिक्षण सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे स्वतंत्र भारतात संवैधानिक तरतूद करून स्त्रियांसह सर्वांना शिक्षणाचा हक्क दिला आणि आपल्या गुरूच्या या कार्याला गतिमान केले. त्यामुळे स्त्रिया शिक्षण घेवुन प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करत असुन यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. शिक्षण, कला, उद्योग, क्रिडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, नाटक, सिनेसृष्टी, समाजकारण, राजकारण, धर्मकारण इत्यादि विविध क्षेत्रात मानसन्मानाच्या पदावर आरुढ होवून देशाच्या विकासात महत्वाची भूमिका वठवीत आहेत. ही फार आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. पण काही सन्माननीय आपवाद वगळता या सुशिक्षित व उच्चशिक्षित झालेल्या स्त्रियांना सावित्रीमाईंच्या कार्यकर्तृत्वाची खरी ओळख आहे का? त्या सावित्रीमाई यांना अभिप्रेत असलेली शिक्षित स्त्री झाल्यात काय? हा खरा प्रश्न आहे. आजही शिक्षित व उच्चशिक्षित स्त्रिया अंधश्रद्धेच्या जोखंडातून मुक्त झाल्या नाहीत. देव, दैव व धर्माच्या पगड्यातून बाहेर पडल्या नाहीत. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीचा अभाव असुन त्या व्रत, वैकल्ये, उपास तापास, पोथी पुराण, सत्यनारायण, हळदकुंकू, टाकाऊ रूढी परंपरा, पूजाअर्चा, नवस, वटसावित्री, करवाचौथ यातच गुरफटलेल्या आहेत. तर विज्ञान तंत्रज्ञाच्या युगातही संतती न होण्यास किंवा मुलीच होण्यास स्त्रीलाच दोषी ठरविली जात असुन स्त्रियांच्या छ्ळात स्त्रियांचाच मोठा वाटा आहे. याचा अर्थ काय? तर स्त्रिया शिक्षित, उच्चशिक्षित होवून आधुनिक झाल्यात पण फक्त बाह्यस्वरुपात व राहणीमानाने. अंतर्मनात मात्र देव, दैव व अंधश्रद्धाच रुतून बसलेली आहे.

ज्योतिराव व सावित्रीमाई फुले यांच्या काळात स्त्रियांची अवस्था फार वाईट होती. तिला कुठलेच अधिकार नव्हते. केवळ रांधा, वाढा, उष्टी काढा आणि चूल व मुल एवढेच तिचे कार्यक्षेत्र होते. तिला ना आर्थिक व्यवहार करण्याचे ना शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य होते. ती गुलाम होती. स्त्रियांच्या या गुलामीला संपवून त्यांना देखील एक माणूस म्हणून समानतेचे व सन्मानाचे स्थान मिळावे. कारण ती एक शक्ती असुन संस्काराची जननी आहे. म्हणून घरात मुलांवर संस्कार करणारी ती पहिली शिक्षिका ठरते. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या मुलांवर विज्ञाननिष्ठ विचार व लोकशाही मूल्ये रुजविण्याचे कार्य करावे. देव, धर्म, अंधश्रद्धा, वाईट चालीरिती, रूढी, परंपरा व जाती-पातीची बंधनं झुगारून देण्याचे व सर्वांशी बंधुतेचे, समानतेचे व माणुसकीचे नाते जपण्याचे धडे शिकवावे. सक्षम समाज हा स्त्रियांच्या वैचारीक प्रगल्भतेवर व सक्षम मानसिकतेवर निर्भर असतो. म्हणून फुले दांपत्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी फार कष्ट घेतले व त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. पुरुषांवर वर्चस्व गाजविण्यासाठी किंवा मनमानी करण्यासाठी नव्हे. हे स्त्रियांनी लक्षात घ्यावे. यासोबतच पुरुषांनीही स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघावे आणि स्त्रियांसोबत समानतेने व सन्मानाने वागावे. आपल्यातील पुरुषी अहंकार सोडून द्यावा हे ओघाने आलेच. विशेष म्हणजे पती पत्नी हे जसे कुटुंबरुपी रथाची दोन चाक तसच स्त्री-पुरुष हे समाजरुपी रथाची दोन चाक आहेत. ती समान असतील तरच रथाला योग्य दिशा व गती प्राप्त होते आणि त्यातूनच देशाची प्रगती साध्य करता येते. म्हणून समाजात स्त्री पुरुष समानतेची मानसिकता असणे आवश्यक आहे. सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी समस्त स्त्रियांनी सवित्रीमाईंचा आदर्श समोर ठेवून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी, कुटुंब, समाज व देश जोडून ठेवण्यासाठी आपल्या स्त्री शक्तीचा उपयोग करण्याचा संकल्प करावा हीच सदिच्छा व हार्दिक शुभेच्छा…

जय सावित्री, जय ज्योती, जय भारत.

प्रा.डॉ. एम.आर.इंगळे अकोला

(लेखक महाराष्ट्रातील सुप्रसिध्द आंबेडकरी विचारवंत आहेत)

मो. 9423429060

Leave a Reply

Your email address will not be published.