
अकोला:
देशात असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी फुले आंबेडकरी चळवळीला बळकट करणे गरजेचे आहे. गोरगरिबांवर होत असलेला अन्याय अत्याचार हाणून पाडण्यासाठी अमानवीय कृत्यांना रोखण्यासाठी फुले आंबेडकरी चळवळीच्या विचारांची राष्ट्रीय पातळीवर मांडणी होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. संजय मून यांनी दिवंगत बी. आर. शिरसाट यांच्या पंधराव्या स्मृतीदिनानिमित्त प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित व्याख्यानमालेमध्ये केले.
भारिप बमसंच्या अकोला पॅटर्नचे शिलेदार दिवंगत बी आर शिरसाट यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त प्रमीलाताई ओक सभागृह येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘फुले आंबेडकरी चळवळीची पुनर्मांडणी’ या विषयावर औरंगाबादचे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा साहित्यिक प्रा.डॉ. संजय मून यांनी प्रकाश टाकला.
फुले आंबेडकरी चळवळीच्या पाच शाखा आहेत. सामजिक,आर्थिक,राजकीय, धार्मिक आणि वाड:मयीन या शाखांना मजबूत करण्याचे कार्य चळवळीतील विद्वानांनी करावे आणि समाजांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारावे असे आव्हान त्यांनी केले. पुढे बोलत असताना ते म्हणाले की, चळवळ ही एक जातीय होता कामा नये त्याच्या कक्षा भेदून सर्वव्यापी विचार झाला पाहिजे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पि. जे. वानखडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणुन वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, प्रा. डॉ. भारत शिरसाट, अॅड. संतोष राहाटे, संतोष हुशे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जि.प.अध्यक्षा संगीता अढाऊ, जि.प. सभापती आम्रपाली खंडारे, मायाताई नाईक, योगिता रोकडे, रिजवान परवीन, पंचायत समिती सभापती आम्रपाली गवारगुरु, सुनिता टप्पे, शारदा सोनटक्के, आम्रपाली तायडे, पंचायत समिती उपसभापती किशोर मुंदडा, इम्रान खान, राजकन्या कवळकार, अजय शेगोकार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल शिरसाट प्रास्ताविक प्रभाताई शिरसाट यांनी व आभार प्रदर्शन डॉ. अभिजित शिरसाट यांनी केले.