नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आत्मसात करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम पिढी घडविण्याकरिता श्री शिवाजी महाविद्यालयाचा पुढाकार;

अकोला : नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी व धोरणांसाठी विदर्भातील प्रसिद्ध प्रथम क्रमांकाचे नॅक मूल्यांकन प्राप्त श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत होण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या अध्यापन पद्धतीवर संशोधन पूर्ण तीन दिवसीय (13 ते 15 मार्च 2023) रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी (एमएसएफडीए) च्या माध्यमातून तसेच आय आय एस इ आर पुणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय संस्थेने घेतला, यासाठी नुकताच काही दिवसांपूर्वी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचा सहयोग करार स्वाक्षांकित झालेला आहे. या कार्यशाळेत नाविन्यपूर्ण अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन पद्धती विज्ञान तसेच गणित शिकवणाऱ्या प्राध्यापकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत यासाठी आयआयएसइआर पुणे येथील तज्ञ मंडळी मार्गदर्शनासाठी आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. व्ही. डी. नानोटी, प्राचार्य आर एल टी कॉलेज अकोला यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल. कुलट यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या उद्घाटन समारंभासाठी आयआयएसइआर पुणे येथील डॉ. असीम औती, डॉ. सचिन राजगोपालन, डॉ. सुगंधा नेगी यांच्यासह आय क्यू एसी तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आशिष राऊत व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटन सत्राच्या प्रास्ताविकेतून महाविद्यालयाचे आयक्यूएसी तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आशिष राऊत यांनी पाहुण्यांचे स्वागत करून या कार्यशाळेच्या आयोजना मागची भूमिका विशद केली. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असे कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. नानोटी यांनी सांगितले तसेच अध्यक्षीय भाषणातून प्राध्यापकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आत्मसात करून त्याची अंमलबजावणी आपल्या अध्यापनात करावी असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुलट यांनी सहभागी असलेल्या सर्व प्राध्यापकांना आवाहन केले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. उज्ज्वला लांडे यांनी केले. या कार्यशाळेला उत्तम असा प्रतिसाद सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील विविध प्राध्यापकांच्या सहभागातून दिसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.