
स्थानिक: बाळापूर येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाळापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण राष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने युवकांच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव व प्रोत्साहन मिळावे, यासाठी बाळापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता युवकांसाठी उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदचंद्र ठाकरे (जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी अकोला), तर प्रमुख अतिथी म्हणून सुभाष चांदणे (अध्यक्ष संस्था व्यवस्थापन समिती, बाळापूर) सैय्यद एहसानोद्दीन (नायब तहसीलदार बाळापुर) डॉ.अजय कुमार डमराल (सदस्य संस्था व्यवस्थापन समिती, बाळापुर), चैतन्य धनोकार (सदस्य संस्था व्यवस्थापन समिती बाळापुर) आणि प्रमुख वक्ते म्हणून विशाल नंदागवळी (संचालक, सार्थक वकृत्व अकॅडमी अकोला), गोकुळ मुंडे (प्राध्यापक व अशासकीय सदस्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभाग), गोविंद गावंडे (संचालक गावंडे कोचिंग क्लासेस, पारस) मंगेश देवगिरकर (संचालक एमडी करिअर पॉईंट अकोला) आदी मान्यवर व्यक्ती तसेच मार्गदर्शन करण्यासाठी यशस्वी उद्योजक आणि व्याख्याते उपस्थित राहणार आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या माजी प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालक यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाळापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश धोत्रे, आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.