‘एक लाख चलनी नोटाच्या बदल्यात चार लाखाच्या नकली नोटा’ व्यवहार फसला; एकास अटक, पाच फरार

अकोला: महाबीज कार्यालय समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्या इसमास एम आय डी सी पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भारतीय चलनामधील 500 रुपयाच्या नकली नोटांचा गैरव्यवहार करताना या इसमास पकडले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास एक इसम अमरावती मुर्तिजापूर अकोला महामार्गावर एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील शिवणी सुलाई बुद्ध विहार जवळ नकली बनावट नोटांचा रोख आर्थिक व्यवहार करणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीसांनी या मार्गावर जाळे पसरविले. मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम दुचाकीगाडीवर पुतळ्याजवळ संशयास्पद दिसले. यामुळे या दोघांवर पोलीसांनी नजर ठेवली. थोड्या वेळाने येथे चार चाकी गाडीने चार इसम अमरावतीच्या दिशेने घटनस्थळी पोहचले. यावेळी या इसमांमध्ये व्यवहार होत असताना पोलिसांनी जाळं टाकलं. दुचाकीवाला पोलिसांच्या हाती लागला. पण त्याच्या साथीदाराने तिथून पळ काढला. आणि कारमध्ये आलेले चौघेही फरार झाले.

पोलिसांच्या हाती लागलेल्या इसामाचे नाव अब्दुल अकिल अब्दुल अनिस असल्याचे सूत्रांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या नोटामधे बंडलच्या सर्वात वरची आणि सर्वात खालची नोट (500 रूपये) ही खरी असून, मधल्या सर्व नोटा या बनावट खोट्या असून, त्यावर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया अस लिहिलेलं आढळून आले. हा व्यवहार 1 लाखाच्या बदली 4 लाख असा होणार होता, असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. तसेच प्रथम दर्शनी काही खऱ्या दिसणाऱ्या नोटा या चलनी असली नोटा आहेत की नकली नोटा आहेत, याची देखील तपासणी सुरू आहे.

यासर्व नकली नोटा 5 लाखाच्या असल्याची बाब समोर येत आहे. यावर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, चौकशी करून अधिक माहिती कळविण्यात येणार असल्याच त्यांनी म्हंटल आहे. तर एक लाखाच्या चलनी नोटाच्या बदल्यात चार लाखाचा नकली नोटा देण्याचा व्यवहार फसला असला तरी या टोळीने नकली चलनी नोटाचा व्यवहार याआधी कुठे केला का, ही बाब तपासात समोर येणार आहे.दरम्यान देवानंद जवळे व इतर दोघांच्या मदतीने तसेच पोलीस कर्मचारी उमेश इंगळे, सतिश इंदोरे, ट्रॅफिक कर्मचारी रवि चौहान, उपलकर यांनी या एक आरोपीला पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती मुळे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.