
जळगाव (प्रतिनिधी)– बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरात ३९ वे राज्य अधिवेशन रविवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. कमल गणपती हॉल, शांतीनगर येथे आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन सत्यशोधक शेतकरी सभेचे महाराष्ट्र राज्य संघटक कॉ. किशोर ढमाले यांच्या हस्ते होईल. तर विशेष अतिथी म्हणून आयएमपीएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाणे (नवी दिल्ली), जेष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. राजेश झाल्टे (जळगाव), बामसेफ राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही. व्ही. जाधव, प्रभारी राष्ट्रीय समीक्षक दीपक वासनिक, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माया जमदाडे, संदीप मानकर, बीएमपी युवा प्रकोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार माने यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या सत्रात ओबीसींची जातीनिहाय जनगणना, भाजप व काँग्रेसच्या धोरणात्मक षडयंत्रांचा पर्दाफाश, शेतकरी-शेतमजूर-रेल्वे व इतर कर्मचाऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष, तसेच बहुजन समाजावर होणारे सामाजिक, आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण या मुद्यांवर सखोल विचारमंथन होणार आहे. बहुजन समाजाला साधनविहीन करून दीर्घ गुलामगिरीत ठेवण्याच्या योजनेवरही गंभीर चर्चा होणार आहे.
या ऐतिहासिक अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील सर्व मुलनिवासी भारतीयांनी व नागरिकांनी उपस्थित राहून बहुजन चळवळीच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन बामसेफ महाराष्ट्र राज्य व सर्व सहयोगी संघटनांतर्फे करण्यात आले आहे.