निःसंग, निर्मोही, निरासक्त…संत गाडगेबाबा – संतोष अरसोड

संत गाडगेबाबा यांना आपण वैराग्यमूर्ती म्हणतो. वैराग्य आणि गाडगेबाबा यांचे नाते सूर्य आणि प्रकाशाइतके जवळचे नाते आहे. अवघा संसार सुखाचा करण्यासाठी बाबांनी आपल्या आयुष्याचे कोळसे केले. अत्यंत व्रतस्थ जीवन ते जगले. गृहत्याग, समाजभ्रमण आणि प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा उभा केलेला डोंगर आणि त्यासाठी उपसलेले कष्ट बघितले की हा संत किती उंचीचा होता हे आपल्या लक्षात येईल. धगधगीत वैराग्याचे दुसरं नाव म्हणजे गाडगेबाबा होय. त्यांनी या महाराष्ट्रात धर्मशाळा, आश्रमशाळा, प्राथमिक शाळा , आदिवासी मुलांसाठी शाळा ,सदावर्ते ,अन्नछत्र ,पाणपोया, दवाखाने ,कुष्ठरोग्यांची सेवा, वस्त्रदान आदी उपक्रम राबवलेत. त्यांनी उभ्या केलेल्या संस्थेमध्ये आपल्या नातेवाईकांना प्रवेश दिला नाही. सुतळीच्या तोड्यावरही नातेवाईकांचा हक्क त्यांनी अमान्य केला. त्यांच्या एकेका शब्दावर दानशूर लोक पैसे द्यायचे. या पैशाचा त्यांनी अत्यंत पारदर्शकपणे वापर केला. लोकांच्या पैशातून उभे केलेल्या या कामास त्यांनी कलंकित होऊ दिले नाही. इतके प्रचंड वैभव त्यांनी निर्माण केले मात्र त्यांनी त्याचा स्वतः फायदा घेतला नाही आणि कुटुंबियांनाही घेऊ दिला नाही. स्वतः कधी ते धर्मशाळेत राहिले नाही. कुटुंबासाठी त्यांनी धर्म शाळेच्या आवारात झोपडी बांधून दिली. एकुलती एक लेक अलोकाबाई मूर्तिजापूरच्या धर्मशाळेत राहू लागली तेव्हा तिला त्यांनी तेथून हुसकावून लावले. जे.जे. येथील धर्म शाळेत अलोका थांबली तर तीच्या नावाने चार दिवसाची भाडे पावती घेऊन ते भाडे भरले. त्यांची पत्नी कुंताबाई मूर्तिजापुरात भीक मागत होती. डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी बाबांच्या पत्नीने भीक मागू नये म्हणून त्यांना आश्रय दिला. मात्र या निराकार वृत्तीच्या संताने डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांना पत्र लिहून पत्नीस फुकट खाऊ घालू नका, घरचे काम करून घ्या अशी विनवणी केली. असे एक ना अनेक प्रसंग आहेत. ऐकले कि अंगावर काटे उभे राहतात. समाज हितासाठी मेणाहून मऊ असलेला हा फकीर कुटुंबासाठी मात्र वज्राहून कठीण होता. कुटुंबासाठी तो एक पत्थरदिल इन्सान होता. असे असले तरी कुटुंबाची काही तक्रार नव्हती. या निर्मोही फकिराच्या वागण्याचे चटके आई सखुबाई, पत्नी कुंताबाई, लेकी अलोका, कलावती आणि एकुलता एक मुलगा गोविंदा यांना बसले आहे. अकाली वैधव्य वाट्यास आलेल्या आई सखुबाईला मात्र लेकाच्या वैराग्यवणव्याचा भाग व्हावे लागले. रानावनात गोवर्‍या वेचत ,भीक मागत या संताचे कुटुंब जगले. बाबा ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी कुटुंबासाठी एक झोपडी बांधून देत. त्या झोपडीत साक्षीला सूर्य,चंद्र ,तारे असायचे. दारं-खिडक्या नसलेली ही झोपडी मात्र राजवाड्यापेक्षाही श्रेष्ठ होती. मूर्तिजापूर येथील झोपडी जेव्हा जळून खाक झाली तेव्हा मात्र या फकिराने पेढा खाल्ला. यावेळी बायकोला ते म्हणाले “आता कशी मस्त दिसते झोपडी”. झोपडी आगीत भस्म झाल्यानंतर निघालेले वरील उद्गार हे साधेसुधे उदगार नाहीत. निरासक्त प्रवृत्तीचे ते सर्वश्रेष्ठ विधान आहे. असेच एके दिवशी पत्नी कुंताबाईसह मुंबई जायचे ठरले. बिचाऱ्या माऊलीने गाठोडे सोबत घेतले. गाठोड्यात भाकरी व पीठ होते. मूर्तिजापूर स्टेशन गाठले. गाडी यायला वेळ होता. स्टेशनवर भिकारी होते. उपाशी भिकारी पाहून हा संत अस्वस्थ झाला. “आपण तर सारेच खातो गड्या पण या भुकेकंगाल लोकायचं कसं?” मनात भूतकाळ क्लिक झाला. पत्नीच्या गाठोड्यातील भाकरी आणि पीठ भिकाऱ्यांची सांज भागवून गेले. ऋणमोचन ही या महानायकाच्या सामाजिक आयुष्याची प्रारंभभूमी आहे. ऋणमोचन इथूनच ऋणविमोचणाचे सामाजिक काम त्यांनी हाती घेतले. या ऋणमोचन येथे गोरगरीबांना वस्त्र वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमास लेक अलोकाबाई हजर होती . गोरगरीब महिलांना साड्या वाटप सुरू असताना फाटकं लुगडं परिधान केलेली अलोकाबाई हे सर्व बघत होती. कार्यक्रम संपला. वीस साड्या शिल्लक होत्या. आपलं फाटकं लुगडं बापास दाखवत अलोकाबाई लुगडं मागू लागली. त्यावेळी हा बाप म्हणाला,”हे आपल्यासाठी नाही लोकांसाठी आहे”. यावेळी लेक अलोकाचे डोळे आभाळ झालेत. हीच अलोका बाळंतपणासाठी मूर्तिजापुरात आली. कुंताबाईने निरोप दिला. लेकीला साडी चोळी करायची आहे. बाबांनी उलट निरोप दिला. रानात जा , गोवऱ्या वेचा त्यातून आलेल्या पैशातून साडी चोळी करा. असा हा कठोर बाप. बाहेरगावावरून आल्यानंतर बाबा अचानक झोपडीत शिरायचे. कुणीतरी झोपडीत खाद्यपदार्थ आणून ठेवलेले असायचे. बाबांची आई सखुबाई आपल्या नातवासाठी ते लपवून ठेवायची. बाबांच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटायचे नाही. झोपडीतील हे सारे खाद्यपदार्थ ते मजुरांना वाटून द्यायचे अन आईला म्हणायचे “हे मजूर बी तूह्ये लेकरंच आहे”. डोक्यावरची मोळी गावभर वाटणारा तुकाराम आणि झोपडीतील खाद्य पदार्थ मजुरांना वाटणारा गाडगेबाबा हे एकाच निर्मोही वाटेवरचे प्रवासपक्षी आहेत. मुलीच्या लग्नाच्या वेळी सुद्धा भीक मागून सहा पायल्या धान्य आईस गोळा करावे लागले होते. एकुलता एक मुलगा गोविंदा. त्याचेही लग्न अजब-गजब झाले. गोविंदा झोपेतच असताना बाबांनी त्याला उठवले. “बाबू , ऊठ ! आज तुहये लगन करायचेआहे. जा भीक मागून ये”. लग्नाच्या दिवशी गोविंदास मुंबईच्या सात रस्त्यावर भीक मागावी लागली. मुंबई येथील वरळी च्या डोंगरावर हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलबंडी वरून त्याची वरात काढण्यात आली. रात्री जुन्या कपड्या वर त्याचे लग्न लावण्यात आले. वरळीचा डोंगर या लग्नाचा साक्षीदार आहे. कुणी चांदीचं ताट आणलं तर कुणी फुलांच्या हारात दागिन्यांचा हार लपवून ठेवला. पण बाबांनी हे सर्व नाकारले. सात रुपये पन्नास पैशांमध्ये त्यांनी गोविंदा चे लग्न उरकवले. लाखो लोकांना मिष्ठान्न खाऊ घालणारा हा माणूस आयुष्यभर मात्र भीक मागून आणलेल्या भाकरीवर जगत होता. लोकांना वस्त्रदान करणारा हा खरा साधू स्वतः मात्र अठरा ठीगळांचे चिवर घालत होता. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची लेक अलोकाबाई, पत्नी कुंताबाई सुद्धा माधुकरी मागूनच जगल्यात. आयुष्याच्या संध्याकाळी ईरविन दवाखान्याचे बील चुकवण्यासाठी त्यांना प्रथमच वर्गणी करावी लागली. एक हजार रुपये गोळा झाले. पाचशे रू.दवाखान्याचे बिल देण्यात आले. 250 रुपये अच्युतराव देशमुख यांच्याकडे तर 250 रू. नगीनभाई यांच्याकडे देण्यास सांगितले. आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःसाठी ही वर्गणी करावी लागली. शेवटच्या काही दिवसात जेव्हा चष्मा घ्यायचा होता तेव्हा त्यांनी पंचवीस रुपये चा चष्माही विकत घेवू दिला नाही. “मले काय पुस्तक वाचायचे हाय का ? या पैशात एखाद्या गरीब पोरीचं लग्न करून टाका ” असे ते म्हणाले. मोहाच्या कुठल्याही क्षणास बळी न पडणारा हा आधुनिक काळातील बुद्धच होय असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. इरविन दवाखान्यातून सुटी घेऊन गाडी नागरवाडी कडे निघाली. त्यावेळी पत्नी कुंताबाईला गाडीत बसू नको असे सांगितले.ते म्हणाले “तू नको येऊ आता, तू अथीसा राहा अमरावतीत , भाकरी मागून खात जा”. 19 डिसेंबर 1956 चा हा प्रसंग आहे. ह्या प्रसंगानंतर पाच-सहा तासातच 20 डिसेंबर 1956 ला रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी हा क्रांतीनायक जगाचा निरोप घेतो. या वेळी कुंताबाई यांची मनोवस्था कशी असेल ?

अंतिम श्वासापर्यंत हा सत्यशोधक संत अत्यंत निर्मोही पणे जगला. आईन्स्टाइन जर मूर्तिजापुरात आला असता तर तो म्हणाला असता की “महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा ही दोन हाडामासाची माणसं या पृथ्वीतलावर होऊन गेली यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही”.

Leave a Reply

Your email address will not be published.