मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर

कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ईडी कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे.

कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे.

गेल्या वर्षी २ नोव्हेंबररोजी ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी अटक केली होती. गेल्या ११ महिन्यांपासून ते ‘ईडी’ कोठडीत होते. यादरम्यान, त्यांनी जामीनासाठीही प्रयत्न केला होता, पण त्यांना जामीन मिळू शकला नव्हता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला.

अनिल देशमुखांविरोधात नेमके आरोप काय?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनीच हे आरोप केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेदेखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.

ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली होती, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले होते. हे पैसे हवाला चॅनेलद्वारे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.