पहाटे हॉस्पिटलमधून दीड वर्षांची चिमुकली गायब; रामदासपेठ पोलिसांचे ‘ऑपरेशन शोध’ अवघ्या काही तासांत यशस्वी !

अकोला प्रतिनिधी,(प्रशिक मेश्राम):–रामदासपेठ परिसरातील केळकर हॉस्पिटलमधून दीड वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन निघालेल्या एका मनोरुग्णाच्या तावडीतून पोलिसांनी अवघ्या काही तासांत सुटका करत चिमुकलीला सुखरूप आईच्या ताब्यात दिले.

पोलिसांच्या या तत्पर आणि शिताफीपूर्ण कारवाईमुळे आई-नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलसिंग सोलंकी (वय ३०, रा. शाहपूर, ता. जि. बुरापूर, मध्यप्रदेश) हा व्यक्ती रामदासपेठ येथील केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. रविवारी (दि. ९ मार्च) पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्याने रुग्णालयातून दीड वर्षांच्या मुलीला कोणालाही न सांगता सोबत घेऊन निघून गेला. ही बाब लक्षात येताच मुलीची आई व नातेवाईकांनी तातडीने रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली.


घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी त्वरित ‘ऑपरेशन शोध’ सुरू केले. एक पथक पोलीस ठाण्याच्या परिसरात शोध मोहीम राबवत असताना दुसरे पथक तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत होते. दरम्यान, अकोट रोडवर तो व्यक्ती चिमुकलीला पायी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत पोलिसांनी शिताफीने त्या व्यक्तीच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. त्यानंतर तिला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणून आई व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पो.हे.कॉ. गितेश कामळे, सुरेश लांडे, अनिल भातखडे, संदीप वानखडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र खंडारे, रोशन पटले आणि नितीन तेलगोटे यांनी सक्रिय भूमिका बजावली


पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून शहरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.