मणिपूर येथे एका अमानवी, पाशवी, क्रूर, हैवानालाही लाजवेल अशा नीच प्रवृत्तींनी दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्या शरीराची विटंबना केली, सामूहिक बलात्कार केले त्या घटनेला दोन महिन्याच्यावर दिवस उलटून गेले आणि आता कुठे त्या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे आता सर्व भारतात त्या घटनेचा निषेध, संताप व्यक्त केला जात आहे. देशाचे बोलघेवडे प्रधानमंत्री अशा घटनांच्या प्रसंगी मौन बाळगून होते. केंद्र व राज्य सरकार चुप्पी साधून होते. पण आता देशात संताप, उद्रेक होतांना दिसतो म्हणून प्रधान मंत्री दोन शब्द बोलले मात्र ही सारी नौटंकी आहे.त्यांचं लक्ष फक्त निवडणुका जिंकायच्या कशा यातच आहे. म्हणून “फोडा झोडा” नीती वापरून ते फक्त सत्तेचे समीकरण मांडण्यात मश्गूल आहेत. विदेशात जावून बडेजाव करण्यात धन्य मानत आहेत.मात्र देशात मणिपूर जळत आहे.
आजच्या सत्ताधाऱ्यांनी सर्व संवैधानिक संस्था, यंत्रणा ताब्यात घेवून विविध राजकीय पक्षाच्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून, त्यांना धाक दाखवून प्रत्येक राज्याची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी साम, दाम, दंड नीती वापरली जात आहे. संस्कृती, निती, नियम, धर्म, लोकशाही, सबका साथ, साबका विकास, बेटी पढाव बेटी बचाव, निर्भय भारत, सक्षम भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, न्याय हे शब्द केवळ भाषणापूरते प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हुकूमशाही चालवायची अशीच यांची कूटनीती आहे.
भारताने आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. आणि आता गणतंत्र दिनाचाही सुवर्ण महोत्सव साजरा होईल कदाचित. कदाचित यासाठी की, २०२४ मध्ये ईव्हीएमच्या साहाय्याने किंवा जाती, धर्माच्या नावाने निवडणुका जिंकल्यानंतर देशात लोकशाही गणतंत्र शिल्लक राहील याची खात्री नाही. कारण आताच देश गुंड पुंड, धर्मांध, जातीवादी, कट्टर सनातनी लोकांच्या विळख्यात सापडला आहे. कायदा, सुव्यवस्था, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता देशातून हद्दपार केल्या जात आहे. “हम करे सो कायदा” आणि “आम्ही म्हणू तसे वागा” अशी हिटलरशाही सऱ्हास सुरू झाली आहे. याचेच द्योतक म्हणजे सऱ्हास दंगली, खून, बलात्कार, धार्मिक दंगे घडवून देशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकार विरोधी बोलणारे तुरुंगात पाठविले जात आहेत आणि २०२४ नंतर तर संविधान व लोकशाही संपवून मनुचा कायदा लागू होईल आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित केली जाईल म्हणून वेळीच जर अठरापगड बहुजन समाजाने जागृत झाल नाही तर देशात दररोज मणिपूर सारख्या घटना घडत राहतील हे निश्चित.
मणिपूरच्या घटनेने हे पूर्णतः सिद्ध झाल आहे की, स्त्री ही गुलाम असून फक्त भोगदासी आहे. तिला ना मान आहे ना सन्मान, यासोबतच आदिवासी समाज देखील तसाच आहे.आम्ही त्यांच्या अंगावर मुतू किंवा तोंडात काहीही फरक पडत नाही, मागास प्रवर्गातील जातींना आम्ही कसेही वागवू कारण ते गुलाम आहेत. त्यांना सन्मानाने जगण्याचा कोणताच अधिकार नाही. एवढं भयावह चित्र आपल्या समोर स्पष्ट दिसत आहे.
सरकार हेतूत: मणिपूरच्या घटनेला वांशिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे देशाची धुरा सांभाळणारे काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात याहीपेक्षा भयंकर घटना होत आहेत हे सांगण्यासाठी काही म्होरके नेमून आपले दुष्कृत्ये झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ काय? म्हणजे याला आम्हीच जबाबदार आहोत ही कबुलीच होय ना…! अरे फक्त दुसऱ्याची पाप टाहो फोडून सांगितल्याने कधी स्वतःचे पाप झाकता येत नसते. अरे दुसऱ्याने खून केला म्हणून मी केला असं म्हणून कोणी खुनाच्या आरोपीला होणाऱ्या शिक्षेतून सुटका करून घेवू शकेल काय? आणि विरोधी पक्षाची बदनामी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या गोदी, भडव्या मीडियाने तर कहरच केला असता ना? कारण सत्याचं असत्य करण्यातच आपल्या पीत पत्रकारितेचं भलं आहे हे माहीत असणारे भडवे वार्ताहर, पत्रकार काही कमी नाहीत. दुसऱ्याची आई, बहीण, बायको, मावशी, पुतणी किंवा कोणीही असो त्यांची विटंबना झाली, की सामूहिक बलात्कार केल्या गेला तर आपल्याला त्याचं काहीही देणं घेणं नाही. अशा मानसिकतेत वावरणारे षंढ वाढत आहेत. समाज नपुसंक बनविला जात आहे. पण निसर्गाजवळ न्याय आहे. तो बरोबर न्याय करतो. फक्त त्याच्या न्यायात थोडी देर आहे मात्र अंधेर अजिबात नाही.
विशेषत: विद्यमान सरकारसाठी अत्यंत शरमेची बाब म्हणजे विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्या एका महिलेचा पती माजी लष्करी अधिकारी असून तो कारगिलच्या युद्धात देश संरक्षणासाठी लढला आहे. याचाच अर्थ या देशात सत्तेचा माज चढलेल्या सत्ताधाऱ्यांना कोणाचीच फिकीर नाही. त्यांच्यात आहे फक्त मस्तीची हैवानियत. एवढी नीच,क्रूर, स्त्रीची विटंबना झाली असतांना या देशाची महामहीम राष्ट्रपती जी आदिवासी समाजातील स्त्री आहे कुठे गेली? कुठे गेल्या महिला खासदार, आमदार, मंत्री. आता का त्यांनी तोंडे शिवून घेतली का? ज्यांना या घटनेची चीड नाही ते या प्रवृत्तीचेच प्रतिनिधीत्व करतात असेच म्हणावे लागेल. पण आज जे सुपात आहेत ते जात्यात जायला वेळ लागणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. पण ही सैतानाची पिलावळ सत्तेच्या माजात एवढे मग्रूर झाले की, त्यांना असं वाटते संपूर्ण सुरक्षा यंत्रणा फक्त त्यांच्या सुरक्षेसाठी आहे, त्यांचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही.पण “ये पब्लिक है सब जानती है” कब धक्का देगी कोई बोल नही सकता. इसिलिये पब्लिक को जगाना होगा, उनकी आँखो मे जो पट्टी बांधी है ऊसको हटाना होगा. औंर ये काम हर भारतीय नागरिक का है जो संविधान, लोकशाही, न्याय, समता, बंधुता पर विश्वास रखते हैं! तो चलो हम भारतीय है, हम सब एक है, “इंसान जोडो भारत जोडो…हिटलरशाही भगावो लोकशाही बचावो “जयभारत जयसंविधान…!
- प्रा. डॉ.एम.आर.इंगळे, अकोला(लेखक हे प्रखर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक आहेत)