माणसा माणसा कधी होशील रे माणूस ! कवयित्री बहीणीबाई चौधरी यांच्या ह्या ओळी या वेबसिरीज साठी सार्थक ठरतात.या जगात सर्वात जहरी प्राणी कोणी असेल तर तो आहे माणुस…महाराष्ट्रातील मानवत हत्याकांडावर आधारित सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ४ ऑक्टोबरला सीरिज प्रदर्शित झाली. आशुतोष गोवारिकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम असे दिग्गज कलाकार या सीरीजमध्ये आहेत. आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरीज, महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेंची निर्मिती आहे.महाराष्ट्रासह देशाला हादरवणारं हे मानवत हत्याकांड होतं नेमकं काय, ते आपण जाणून घेऊ काळी जादू, झाडाखालचा मुंजा, गुप्तधन आणि ते मिळवण्यासाठीची कर्मकांड, नरबळी… या गोष्टी आता जुन्या झाल्या असं वाटत असतानाचं महाराष्ट्रात चं नव्हे तर अनेक ठिकाणी गुप्तधनाच्या लालसेपायी कितीतरी लहाण मुलांचा’ बळी’ देण्यात येते हे सर्वश्रुत आहे. पत्रकार शरद देऊळगावकर यांनी ‘मानवत हत्याकांड’ या नावाने या प्रकरणाची विस्तृत माहिती आणि खटल्याचं कथन करणारं पुस्तक चं लिहिलं आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधात कायदा लागू होऊन या ऑगस्टमध्ये बरोबर १० वर्षं झाली. पण अजूनही अशा घटना अनेकदा समोर येत राहतात. याच पार्श्वभूमीवर पन्नास वर्षांपूर्वी अवघा महाराष्ट्र हादरवणाऱ्या त्या क्रूर घटनेची आठवण ताजी झाली. क्रौर्याच्या कहाणीने महाराष्ट्र त्या वेळी थरारला होता. मराठवाड्यातल्या एका गावातून एका मागोमाग एक लहान मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या. त्यांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले. नोव्हेंबर १९७२ ते जानेवारी १९७४ दरम्यान हा प्रकार सुरू होता. महाराष्ट्राला ज्ञात असलेलं हे एवढं घृणास्पद असं पहिलं ‘सीरिअल किलिंग’ प्रकरण कसं घडलं? गूढ कसं उकललं? कोण होता सूत्रधार? गुन्हेगारांना शिक्षा झाली का? हत्याकांडानंतर खून खटलाही गाजला याची उत्तरे आपल्याला या सिरीज मधे मिळतात. या सगळ्यांचे मृतदेह सापडले तेव्हा त्यांची अवस्था भीषण होती. गुप्तांगावर जखमा होत्या आणि एका चिमुरडीचं तर शिर छाटून टाकण्यात आलं होतं. बोटं छाटली होती तर कुणाच्या छातीचा भाग. हे अमानवी, क्रौर्याची परिसीमा गाठणारं कृत्य केलं गेलं होतं एका मांत्रिकाच्या सल्ल्याने. एखाद्या गावाचं किंवा शहराचं नाव तिथल्या वैशिष्ट्यासाठी लक्षात राहतं. पण मानवत म्हटलं तर ‘हत्याकांड’ हाचं शब्द पुढे यावा इतकं हे प्रकरण त्या वेळी गाजलं.पोलीस तपासात 11 स्त्रियांचे खून हे गुप्तधनाच्या लालसेपायी आणि बंद झालेली मासिक पाळी पुन्हा सुरू होऊन मूल व्हावं म्हणून केल्याचं उघड झालं.
या सिरीज मध्ये सोनाली कुळकर्णी यांनी मुल होत नाही या स्त्री ची भूमिका इतक्या दमदार पध्दतीने सादर केली की वाटतं खर चं महान कलाकार खरोखर महान चं असतात आपल्या अंगभूत कलागुणांच्या बळावर ते भूमिकेत जीव ओततात आणि भूमिका अजरामर करतात..१४ नोव्हेंबर १९७२ या दिवशी गयाबाई सखाराम गच्छवे ही १० वर्षांची चिमुरडी गोवऱ्या गोळा करायला म्हणून दुपारी घराबाहेर पडली. ती परत घरी आलीचं नाही.या घटनेला जेमतेम पंधरवडा उलटला असेल तेवढ्यात शकीला अल्लाउद्दीन ही ९ वर्षांची पोर गायब झाली. तीही सरपण आणायला म्हणून बाहेर पडली होती. ती परतलीच नाही. दोघींच्या ही अंगावर सारख्या जखमा गुप्तांगात होत्या शरीराची विटंबना झाल्याचा संशय होताचं..या दोन गरीब घरच्या मुली. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेचा फार वेग नव्हताच. त्यात फेब्रुवारी महिन्यात आणखी एक खून पडला. या वेळी ३५ वर्षांची सुगंधा सुंदऱ्या मांग ही पारधी वाड्याजवळ राहणारी महिला मृत्युमुखी पडली. पुढे एप्रिल महिन्यात पुन्हा १० वर्षांची नसीमा सय्यद करीम ही खाटकाची मुलगी दिसेनाशी झाली तिचा मृतदेह सापडला तोही भयानक अवस्थेचत गुप्तांगाला जखमा होत्या. छातीचा भाग काढलेला होता. उजव्या हाताची करंगळी तोडलेली. या अशा क्रूर पद्धतीने चिमुरडीचा कोणी प्राण घेतला हे कळत नव्हतं आता मात्र तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. तीन अल्पवयीन मुलींचे सारख्याच पद्धतीने झालेले खून आणि सुगंधा मांगचाही झालेला खून एकाच कटाचा भाग असला पाहिजे या दिशेने पोलीस तपास करू लागले. यामध्ये मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी यांना तपासाला पाठवण्यात आले.ही भूमिका बजावणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी अत्यंत सामंजस्य पणे आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली…
अखेर १८ जून १९७३ ला उत्तमराव बारहाते आणि साथीदारांना संशयित म्हणुन पोलीसांनी अटक केली. उत्तमराव बारहाते हे मानवतमधील मोठे प्रस्थ. गावात शेती आणि मोठा व्यापार होता त्यांचा. ते नगराध्यक्षपदीही होते. मोठा वाडा होता. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी फार ताकदीने निभावली..संशयित आरोपी अटकेत असले तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती. हे चौघे अटकेत असताना मानवतमध्ये पाचव्या महिलेचा खून झाला. कलावती बोंबले या ३२ वर्षीय विवाहितेचा खून झाला. मृतदेहांची अवस्था पाहता या हत्याकांडामागे काळी जादू, नरबळी वगैरेसारखा प्रकार असण्याचा पोलिसांचा संशय होता. त्या दृष्टीने तपास सुरू झाला. पण गूढ वाढलं कारण पाचवा खून झाला. पाठोपाठ पुन्हा एक १० वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आणि तिचाही छिन्नविच्छिनन्न अवस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. ६ खून झाले तरी गूढ उकललं नव्हतं. पोलिसांच्या हाती पुरावे, धागे-दोरे काहीच लागत नव्हते. प्रकरण तापलं आणि थेट विधानसभेत पडसाद उमटू लागले.दरम्यान अटकेनंतर दीड महिन्याच्या आता ३० जुलै १९७३ ला उत्तमरावांसह चौघांची जामिनावर सुटका झाली होती. हत्यांचं सत्र थांबलं नव्हतं. विधानसभेत त्याविषयी पडसाद उमटले. तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घातले होते हे विशेष दरम्यान, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोंडिबा रिळे नावाच्या इसमाचा खून झाला होता. पुढे डिसेंबरमध्ये पोलीसांनी समिंदरी नावाच्या रुक्मिणी काळेच्या बहिणीला कोंडिबा रिळेच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथून गूढ उकलायला सुरुवात झाली. समिंदरी ही भूमिका जणु काही सई साठी चं होती असा अभिनय सई ने केला आहे. भाषा वेशभूषा राहणीमान अगदी पात्र जगत होती अशी ग्लॅमरस असणाऱ्या सई ची भूमिका पाहतांना वाटतं हीचं ती सई का??? अप्रतीम ॲक्टींग चा तडका..मानवत हत्याकांडातील शेवटचे तीन खून एकाच दिवशी झाले. एकाच कुटुंबातील तिघींची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. तो दिवस होता ४ जानेवारी १९७४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे मानवत खून खटल्यात महत्त्वाचा दुवा ठरला. ग्रामीण भागात मुंजा नावाचं दैवत काही ठिकाणी पूजलं जातं. अविवाहित ब्राह्मण तरुणाचा लहान वयात मृत्यू झाला तर त्याच्या नावाने मुंजा पूजला जातो. ६० वर्षांच्या गणपतने त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचं रक्त लागेल असं उत्तमरावांना सांगितल्याचं कबुल केलं. हि भूमीका अत्यंत मातब्बरपणे निभावणारा कलाकार म्हणजे सौमित्र उर्फ किशोर कदम….”मी मांत्रिक आहे. शकुन सांगतो. उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलावलं होतं. वाड्यात असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूल होत नाही त्यावर उपाय सांगा, असं त्यांनी सांगितलं. त्या वाड्यातल्या मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल. तिच्या रक्ताचा नैवेद्य लागेल, असं मी सांगितलं.
सोपान आणि शंकर या उत्तमरावांच्या नोकरांनी रक्त आणायचं ठरलं. त्यांनी आणलेल्या रक्ताने उत्तमराव-रुक्मिणी यांनी पूजासुद्धा केली.” अंगावर शहारा येणारी साक्ष गणपतने दिली. त्याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला. त्याच्याबरोबर आणखी एक आरोपी शंकर काटे हादेखील माफीचा साक्षीदार ठरला.या दोघांशिवाय शेवटचे तीन खून होताना पाहणारा उमाजी पितळे याची साक्ष ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने निकाल दिला.दोन्ही माफीच्या साक्षीदारांनी दिलेल्या कबुलीजबाबातून उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्रप्राप्तीसाठी आणि गुप्तधन मिळण्याच्या हेतून हे खून करवून घेतल्याचं स्पष्ट झालं. “उत्तमराव आणि रुक्मिणी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावरही काहीच वाटलं नाही. उत्तमराव बारहाते तर हसत बाहेर पडले. रुक्मिणीसुद्धा निवांत होती. उत्तमरावांनी न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी चक्क खिशातून तंबाखू काढून हातात शांतपणे मळून बारही लावला”, असं एका पत्रकाराने सांगीतले..फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं. प्रसिद्ध वकील अॅड. बी.जी. कोळसे पाटील हे आरोपींचे वकील होते. त्यांनी बारहातेंची बाजू मांडली. हायकोर्टाने बारहाते आणि रुक्मिणी यांच्याविरुद्धचा परिस्थितीजन्य पुरावा अमान्य करत त्यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. सरकारतर्फे या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. १८ मार्च १९७६ ला उत्तमराव आणि रुक्मिणी निर्दोष सुटले. त्याच दिवशी रुक्मिणीला मूल झालं. मुलीचं नाव कीर्ती ठेवण्यात आले…उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या शिक्षेत आणखीही बदल केले. दगडू काळे, देव्या चव्हाण, सुकल्या चिंत्या आणि वामन अण्णा या चौघांना जन्मठेपेऐवजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सोपान थेटेची मूळ फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, त्या वेळी संशयाचा फायदा देत वामन अण्णाची फाशी रद्द करण्यात आली आणि त्याला मुक्त केलं गेलं. बाकी चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. केवळ माफीच्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, कारण इतर कुठलाही पुरावा सरकारला सादर करता आलेला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि उत्तमराव-रुक्मिणीची सुटका झाली. मानवत हत्याकांडावर चार जणांच्या फाशीनंतर कायदेशीररीत्या पडदा पडला.नक्की पहा….आजही विज्ञानयुगात जगतांना भूत, प्रेत, भाणामती अंधश्रद्धा, गुप्तधन, नरबळी, मुंज्या, करणी, हे प्रकार ग्रामीण भागातचं नव्हे तर शहरी भागात ही मोठ्याप्रमाणात पाहावयास मिळतात. शिक्षणाने हे कमी व्हायला पाहीजे होतं पण वाढत चं चालले आहे. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. यासाठी विचारांच्या कक्षा रुंदावणे आणि विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे.
(लेखक हे प्रासिद्ध चित्रपट समीक्षक देखील आहेत.)