
अकोला – माळीपुरा परिसरात उभी असलेली दोन अॅटो रिक्षांची काच फोडून नुकसान करणाऱ्या गावगुंडांना रामदासपेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोधून काढत प्रभावी कारवाई केली. या पोलिस कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. ८ जुलै २०२५ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास माळीपुरा येथील सोरटेश्वर मंदिराच्या मागे उभ्या असलेल्या दोन अॅटो रिक्षांच्या समोरील काचा अज्ञात व्यक्तींनी फोडून अंदाजे ४,००० रुपयांचे नुकसान केले होते. हे अॅटो रेवनकुमार रामभाऊ गायकवाड (वय ६०) व नरेंद्र बाळाभाऊ रनपीसे या दोघांचे होते.
या घटनेची फिर्याद रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हा क्रमांक ४९९/२५, कलम ३२४ (४) भा.दं.वि. (बी.एन.एस.) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला.
सदर प्रकरण गांभीर्याने घेत प्रतिबंधक पथकाने गोपनीय बातमीदारांची माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने तपास करत अवघ्या काही तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले. ओम सुरेश खरे (वय २०) व ललित रमेश बनसोड (वय १९, दोघेही रा. माळीपुरा) या दोघांनी चौकशीदरम्यान अॅटो फोडल्याची कबुली दिली आहे. यानंतर दोघांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे.
माळीपुरा हा जातीयदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने अशा प्रकाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते. मात्र, रामदासपेठ पोलिसांनी अतिशय तत्परता आणि दक्षतेने कारवाई करत गुन्ह्याचा तपास करून परिसरात शांतता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे.
स्थानिक नागरिकांनीही पोलीस विभागाच्या या कार्यशैलीचे खुलेपणाने स्वागत केले असून, वेळेवर कार्यवाही केल्याने संभाव्य जातीय तेढ टळल्याचे मत व्यक्त केले आहे.