
आज ७ फेब्रुवारी, २०२५, बहुजनांची आई रमाईची १२८ वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या विचारांना आणि कर्तृत्त्वाला कोटी कोटी प्रणाम. आई रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी, १८९८ रोजी गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) आणि आईचे नाव रुख्मिणी होते. दाभोळ जवळील वंणदगाव हे त्यांचे गाव होते. त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. रमाईचे वडील दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचविण्याचे काम करत असत. रमा लहान असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे रमाईवर फार मोठा आघात तर झालाच पण त्यांच्यावर घरातील कामाची आणि आपल्या भावंडाना सांभाळण्याची जबाबदारीही येऊन पडली होती. रमाईचे वडील भिकू धूत्रे यांना छातीचा त्रास होता. त्यामुळे काही दिवसांनी त्यांचेही निधन झाले आणि रमाईवर आभाळच कोसळले. त्यांची धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. पण रमाई मोठ्या मनाची, धैर्यवान काळजाची आणि समंजस विचारांची होती. तिने आपल्या भावंडांचा त्यांची आई म्हणून सांभाळ केला. रमाईचे आई आणि वडीलाचेही निधन झाल्याने ही मुले पोरकी झाल्याचे मुंबई येथे राहत असलेले काका वलंगकर आणि मामा गोविंदपुरकर यांना कळले. त्यामुळे त्यांनी या पोरक्या झालेल्या मुलांना आपल्यासोबत मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत आणले.रमाईचा विवाह:
सुभेदार रामजी आंबेडकरआपल्या भीमरावसाठी वधू शोधत होते. त्यांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. त्यामुळे ते मुलगी पाहण्यासाठी गेले. रमाईचे अप्रतिम सौंदर्य, शीतल स्वभाव, निर्मल शालीनता पाहून सुभेदार रामजी खुश झाले कारण त्यांना आपल्या भीमासाठी रमा सारखीच मुलगी हवी होती. म्हणून त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली आणि रूढी परंपरेनुसार रमाला मागणी घालून लग्न ठरविले. त्यानुसार भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ साली रमा आणि भीमराव आंबेडकर याचा विवाह साध्या पद्धतीने नात्यागोत्याच्या आणि स्नेही आप्तेष्टांच्या साक्षीने पार पडला.
दुःख, कष्ट आणि त्यागमय जीवन:
रमा भीमरावांची पत्नी म्हणून सुभेदार रामजीच्या कुटुंबात आली. रमा त्या घरात नवीन होती तरीही तेथील नावीन्यपूर्ण वातावरणात ती इतकी समरस झाली की लवकरच जुनी होऊन गेली. कारण रमा मुळचीच अतिशय कर्तव्यदक्ष, चाणाक्ष, समंजस, प्रेमळ, संयमी आणि दूरदृष्टीची होती. म्हणून तिच्या गुणांचा प्रभाव घरातील सर्वांवर पडला. ती सर्वांची लाडकी झाली. तिच्या सेवाभावी वृत्तीने तिने आपले सासरे रामजी यांना आपलेसे केले. पित्याच्या प्रेमाला पारखी झालेली रमा सासऱ्यांना मामाजी नव्हे तर बाबाच म्हणू लागली.
घरातील कामे आटोपल्यावर ती बाबांच्या जवळ जाऊन बसे. त्यांनी सांगितलेले जीवनानुभवाचे धडे समंजसपणें गिरवत असे.
एकदा रामजी रमाला म्हणाले, रमा, माझी मोलाची ठेव मी तुझ्या हातावर ठेवली आहे. तुला त्याला त्या पायऱ्या चढायला शिकवायचं आहे. नव्हे तुला त्याची शक्ती बनायचं आहे. त्याची स्फूर्ती बनायचं आहे आणि तू बनशील यात शंका नाही. रामजींच्या बोलण्यातील गंभीरता रमाने हेरून त्यांनी भीमराव आंबेडकरांच्या शिक्षणासाठी पूर्ण सहकार्य व वाटेल तो त्याग करण्याचा दृढसंकल्प केला.
रमाईने अनेक मरणे पाहिली होती आणि प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मरत होती. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू झाला होता. तर इ.स. १९१३ साली रामजी सुभेदार जो रमाचा फार मोठा आधारस्तंभ होता तेही निघून गेले होते. इ.स. १९१४ ते १९१७ साली डॉ. बाबासाहेब अमेरिकेला असताना मुलगा रमेश गेला तर ऑगस्ट १९१७ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सावत्रआई जिजाबाईचा मृत्यू झाला, त्यापाठोपाठ मुलगी इंदू गेली, डॉ. बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू झाला. इ.स. १९२१ डॉ. बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व इ.स. १९२६ मध्ये अत्यंत प्रिय राजरत्नचा मृत्यू झाला. म्हणजे रमाने जवळच्या लोकांचे मृत्यू पाहिले आणि असह्य व अतीव दुःख झेलले. मात्र डॉ.बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून तिने त्यांना कळविले नाही. तर स्वतःच सर्व दुःख सहन करत राहिली. आपल्या परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या पतीला म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही.
डॉ. बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेले असता रमाई एकट्या पडल्या. मात्र त्यांनी हार न मानता घर चालवण्यासाठी शेण गोळा करून गोवऱ्या थापल्या आणि विकल्या, सरपणासाठी वणवण फिरल्या. रमाई पोयबावाडीपासून दादर माहीम पर्यंत शेण गोळा करण्यासाठी जात असत. मात्र बॅरिस्टरची पत्नी शेण वेचते असे म्हणून लोकांनी नावे ठेवू नये यासाठी त्या पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असत. म्हणजे त्यांनी डोंगरा एवढे कष्ट उपसले, असीम दुःख सहन केले आणि आपल्या पतीचा मानसन्मानही सांभाळला.

बाबासाहेबांची सहचारिणी आणि ध्येयपूर्तीची स्फूर्तिदायक शक्ती :
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले होते. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्यास करु लागले होते. त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून डॉ. बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात जमला होता. रमाईलाही भेटीसाठी जायचे होते. पण नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून त्या डॉ. बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या होत्या. डॉ. बाबासाहेब बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली तसे ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? त्यावेळी रमाई म्हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असतांना मी तुम्हाला आधी भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते. असा समजूतदार आणि समंजस स्वभाव होता रमाईचा.
राजगृहातील वास्तव्य आणि रमाई:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या दादर येथे बंगला बांधला. त्याला राजगृह नाव दिले, त्या बंगल्यात राहावयास आल्यानंतर ते नेहमी अभ्यास व वाचण करण्यात व्यस्त असायचे. त्यांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाई राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. डॉ. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत आणि नम्रपणे म्हणत की, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा.” मात्र आलेल्यांची रवानगी करतांना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत असत.
आदरयुक्त स्वाभिमानी रमाई:
इ.स. १९२३ साली डॉ. बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. डॉ. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले गेले नाहीत. म्हणून त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसै रमाईला देऊ केले. मात्र रमाईने नम्रपणे समाजबांधवांच्या भावनांचा आदर करून पैसे स्वीकारले नाहीत. अशी होती स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी. ती परिस्थितीशी, गरिबीशी आणि दुःखांशी जिद्दीने भांडत होती पण लाचार झाली नाही. तिने कधी आपल्या दुःखाचे भांडवल करून समाजासमोर हात पसरले नाहीत.
करुणामय हृदयाची रमाबाई रमाआई झाली :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत असतांना एकदा अचानक त्यांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते. पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे असा त्यांनी विचार केला. म्हणून त्यांनी धारवाडच्या आपल्या बळवंत वराळे या मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. हे बळवंत वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाईने वराळे काकांना विचारले की, दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत. खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे काका म्हणाले ती लहान मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला दर महिन्याला जे अन्नधान्याचे अनुदान मिळायचे ते अजून मिळालेले नाही. ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. म्हणून अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत. वराळे काका अगदी कंठ दाटून अस सांगू लागले. त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोलीमध्ये जातात. या करुणामय आईचे हृदय भरून येते, त्या रडायला लागतात. पण लगेच सावरतात आणि आपल्या खोलीतल्या कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे काका यांच्याकडे देऊन म्हणतात तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू आणा. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी राहिलेली पाहू शकत नाही. त्यावेळी वराळे काका त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात. लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी होतात हे पाहून रमाईलाही खूप आनंद होतो. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना “रमाआई” म्हणून बोलायला लागतात. त्या क्षणापासून रमाबाई ही माता रमाई झाली. ती सगळ्यांची आई झाली. याबाबत ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे म्हणतात,
“भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या सोन्याच्या रमान दिल्या काढुनी, धन्य रमाई धन्य रमाई”

रमाईचे आजारपण आणि निर्वाण :
रमाईचे शरीर काबाड कष्ट करून व अपार दुःख सोसून पोखरून गेले होते. त्यांना क्षयरोग जडला होता. तो त्यांचा आजार दिवसेंदिवस बळावत चालला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून तर त्यांचा आजार वाढतच गेला. डॉ. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले पण औषधोपचारही लागू होत नव्हता. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून डॉ. बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. डॉ. बाबासाहेब त्यांना स्वतः औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. पण त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. मे महिन्यात तर रमाईचा आजार खूपच विकोपाला गेला आणि २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. रमाई सगळ्यांना पोरकी करून निघून गेली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची रमाईप्रती भावना:
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तीळतीळ तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित होत असत.
पुढे १९४० साली जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ प्रसिद्ध केला तेव्हा तो रमाईस समर्पित केला. त्या अर्पणपत्रिकेत त्यांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या अंत:करणाचा चांगूलपणा, तिच्या मनाचा उदारपणा आणि चारित्र्याचा निष्कलंकपणा, त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता आणि आमच्या पोटापाण्याच्या विवंचनेचा काळ होता असे दिवस आमच्या वाट्याला आले असता, जिने ते दिवस मुकाटपणे सहन केले, व माझ्याबरोबर ते दुःख सहन केले आणि मजबरोबर तसलेही दिवस कंठले म्हणून तीच्याठायी असलेल्या वरील सद्गुणांची आठवण ठेवण्यासाठी हा ग्रंथ तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहे.”
अशा या करुणामय हृदयाच्या कृतार्थ माऊलीस, बहुजनांच्या आईस विनम्र अभिवादन…!
संदर्भ: १) रमा, डॉ.सौ. करूणा जमदाडे, २००२
२) अभिवादन, विश्वनाथ शेगावकर, २०२३
३) मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या सहवासात, राधाबाई बळवंतराव वराळे, २००४
लेखक: प्रा. डॉ.एम.आर.इंगळे
सेवानिवृत्त प्रोफेसर आणि संविधान प्रचारक तथा विभागीय सचिव, डाटा अकोला ९४२३४२९०६०/७२७६४६५६९२ (w)