
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील भरती प्रक्रियेत नियमबाह्य निविदा प्रक्रिया राबवल्याप्रकरणी शासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरंगतुषार वारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांना निलंबित केले आहे. या तिघांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी फुले आंबेडकरी राष्ट्रीय युवक संघटनेकडून करण्यात आली असून, कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, यापूर्वीच शासनाकडे निवेदन पाठवून कारवाईची मागणी केली होती, मात्र कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. याशिवाय, रुग्णालयातील भांडारपाल प्रमोद ढेंगे यांनी चलानचे पैसे शासनाच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवून शासकीय निधीचा दुरुपयोग केला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, लाखो रुपयांचे भंगार कोणतीही निविदा न काढता व वरिष्ठांची परवानगी न घेता विकून रक्कम गळप केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
संघटनेचा आरोप आहे की, या प्रकरणात प्रमोद ढेंगे यांचा अपहार सिद्ध झाला असून, शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करून गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. तसेच, सध्या आरोग्य विभागात भ्रष्टाचाराचे थैमान असून, संबंधित प्रकरणांच्या चित्रफिती आणि बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत.
या सर्व घडामोडींवर संघटनेने परिमंडळाचे उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांच्यावरही दोषारोप केला आहे. संघटनेचा आरोप आहे की, डॉ. भंडारी हे दोषी व भ्रष्टाचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाठराखण करत असून, त्यांना अभय देत आहेत.
या पार्श्वभूमीवर दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ ते सायं. ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात अधिकाधिक जागृत व भ्रष्टाचारविरोधी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फुले आंबेडकरी राष्ट्रीय युवक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भोजने यांनी केले आहे.