
यवतमाळचे रमेश बुरबुरे यांनी सादर केली सामाजिक जाणिवेची गझल..
स्थानिक: माझ्याशिवाय येथे कोणी धनाढ्य नाहीआईवडील माझे, माझ्या हिशात आहे! असे म्हणत आपल्या गझलेतून प्रेक्षकांना भावनिक करत सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे शेर आपल्या गझलेत यवतमाळचे गझलकार रमेश बुरबुरे यांनी अकोला येथे १० वे अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनात सादर केले.
ग़ज़ल सागर प्रतिष्ठान व तीक्ष्णगत मल्टिपर्पज सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग़ज़ल मुशायरा पार पडला. त्यात महाराष्ट्रभरातून गझलकार उपस्थित होते. या गझल मुशायऱ्याचे अध्यक्षीयस्थान निता भिसे यांनी भूषविले होते. तर निवेदक म्हणून गजानन वाघमारे आणि अनंत नांदुरकर यांनी जबाबदारी पार पाडली. संपूर्ण महाराष्ट्रातून गझलकार या मुशायऱ्यात सहभागी झाले होते. त्यात अनिल कोशे, रमेश बुरबुरे, वसंत शिंदे ,शेखर गिरी, जयश्री अंबास्कर,शरद काळे, संजय साठे,बापू दासरी ,अमोल शिरसाट,निलेश कवडे,सुनील तांबे,आबेद शेख, देवका ताई देशमुख,नजीम खान,गोपाल मापारी,मिलिंद हिवराळे,प्रचिती बडवाईक,ओमप्रकाश ढोरे इत्यादींनी आपल्या गझला सादर करत कार्यक्रमात रंगत आणून प्रेक्षकांची मने जिंकली.
माझी तशी सुपारी कोणीच घेत नव्हते
माझाच दोस्त साला तेव्हा तयार झाला..
आधुनिक युगात मैत्री कशी झाली यावर भाष्य करणारा शेर शेखर गिरी यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवत पुढे त्यांनी
डोन्ट अंडरेस्ट मी आय कॅन डू काहीही
इग्लिश माझी डेंजर होते सात वाजल्यानंतर..
या गझलेत मैफिलच सजवली होती. देशाच्या वर्तमान परिस्तिथीवर भाष्य करत शरद काळे यांनी
इतिहासाला नोंदच नाही असा शासक आहे
या देशाचा शासनकर्ता इतका घातक आहे
या शेरातून आपली व्यथा मांडली. अकोल्याचे अमोल शिरसाट यांनी
पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतू
उत्तर जर का नाही आले विषय संपला..
या गझलेने रसिकांच्या मनावर ताबा मिळवत सर्वांना बोलते केले. शेवटी ही मैफिल सामजिक जाणिवेतून माणुसकीकडे वळली आणि सहभागी गझलकरांनी देशातील अनेक क्षेत्रावर गझलेच्या माध्यमातून उपस्थितांना जागृत केले.

दुष्काळग्रस्त होते कंसात चारदाने
पक्षी मला उपाशी हुसकावताना आले..
नाजिम खान यांनी भुकेवर आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर प्रेक्षकांची मने वळवली.
भीमाचे बोट होकायंत्र ठरले आमच्या साठी
दिशा त्याचच बोटांने युगाला दावली आहे..
या गोपाल मापारी यांच्या शेराने टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात निता भिसे यांनी गझलकरांच्या सादरीकरणावर मनोगत व्यक्त करत आपली रचना सादर केली. अशा प्रकारे अकोलेकरांनी गझल मुशायरेचा आनंद लुटला…