महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
अकोला: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या नागरिकांना उद्देशून ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधतात आणि नागरिकांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करतात, आणि इतरांना प्रेरणा देतात, भारतातील करोडो लोक हा कार्यक्रम ऐकतात आणि प्रेरणा घेतात. तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनातं व प्रा .संजय खडसे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समन्वयात राबविण्यात आलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनच्या माध्यमातुन हजारो नागरिकांनी एकत्र येत नदी स्वच्छतेसाठी केलेल्या कार्याचा गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून केला होता.अकोला जिल्ह्यात राबविलेल्या मोर्णा अभियानाचा उल्लेख करून जिल्हा प्रशासन व अकोल्यातील जनतेचा गौरव केला होता, आणि हे अभियान देशासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार करीत नागरिकांचे अभिनंदन केले होते.
‘मन की बातचा’ 100 वा कार्यक्रम 30 एप्रिल रोजी संपन्न होत असून या माध्यमातून पंतप्रधान देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत, त्यांचे औचित्य साधून महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत दूरदर्शनच्या माध्यमातून 30 एप्रिल रोजी मुंबई राजभवन मुंबई येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाला मोर्णा मिशनचे समन्वयक म्हणून प्रा.संजय खडसे यांना विशेष आमंत्रीत करण्यात आले आहे.या माध्यमातून अकोलेकर जनतेचा हा गौरव आहे.अकोला येथील मंगेश दांदळे यांनी पी.एम.ओ कार्यालयाला फोटो ट्विट करुन मोर्णा मिशन बाबत माहिती दिली होती, मोर्णा मिशन व अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या सहभागातून राबविलेल्या कार्यक्रमाची खुद्द प्रधानमंत्री यांनी दखल घेतली त्यांचा आनंद झाला, आपल्या अकोलेकरांचा सर्वांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहत असल्याचे प्रा.संजय खडसे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.