
सन 2014 मध्ये मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे स्वीकारत 21 जून 2015 पासून जगभरात अतिशय उत्साहात साजरा केला जाणे ही आम्हा सर्वांसाठी भूषणावह बाब असून खऱ्या अर्थाने आजचा दिवस जगभरातील लोकांना एकत्र येण्यासाठी आणि निरोगी निरामय आरोग्यासाठी पर्वणीच असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्ताने अकोला जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नेहरू युवा केंद्र, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस प्रशिक्षण केंद्र, पतंजली युवा भारत व योग समिती, क्रीडा भारती, प्रजापिता ब्रह्मकुमारी, भारत स्वाभिमान संघ, आर्ट ऑफ लिव्हिंग, अजिंक्य फिटनेस पार्क अकोला तथा विविध शैक्षणिक तथा सामाजिक संस्थांचे संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित “आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे” प्रसंगी उपस्थिताना संबोधित करताना ते बोलत होते. “वसुधैव कुटुम्बकम” हे यंदाच्या योग दिनाचे ब्रीद असून या वसुंधरेच्या संरक्षणासाठी आपण सर्वच सिद्ध होऊ या असे आवाहन करताना सध्याच्या धकाधकीच्या आणि शारीरिक मानसिक तणावाच्या परिस्थितीत निरोगी निरामय आनंदी जीवनासाठी योग प्राणायाम आवश्यक बाब असल्याचे देखील डॉ. गडाख यांनी अधोरेखित केले.

तर शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्यासाठी दैनंदिन व्यायाम योगा प्राणायाम योग्य आहार व विहारासह सामाजिक बांधिलकी जोपासणे सर्वच देशवासियांचे कर्तव्य असल्याचे भावनिक प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी केले. दीक्षांत सभागृहात सकाळी सात वाजता सुरू झालेला हा भव्य दिव्य सोहळा नऊ वाजेपर्यंत योगा प्राणायाम ध्यानधारणा संगीत आणि आनंदाची उधळण करून गेला. याप्रसंगी पतंजली योग समितीचे डॉ. सुहास काटे व त्यांचे सहकाऱ्यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. यामध्ये अजिंक्य फिटनेस पार्कचे धनंजय भगत यांचे सक्रिय सहकार्यासह त्यांचे सहयोगी श्री. प्रशांत वाहूरवाघ, माया भुईभार व वैशाली शाहू यांचे कृतीयुक्त सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट यांनी केले तर प्रजापिता ब्रह्मकुमारी अकोला केंद्राच्या प्रमुख राज योगिनी रुक्मिणी दीदी व त्यांच्या सहकारी वर्गानी राजयोग मेडिटेशन क्रिया व तिचे महत्व विषद केले. या संपूर्ण सोहळ्यात आर्ट ऑफ लिव्हिंग च्या अकोला पदाधिकाऱ्यांनी सुरेल संगीतमय गीत गायनातून उपस्थितांमध्ये उत्साहाची अनुभूती जागविली. आजचे योग दिनाच्या प्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉक्टर श्यामसुंदर माने, सहयोगी अधिष्ठाता सर्वश्री डॉ. ययाती तायडे, डॉ. शैलेश हरणे, डॉ. राजेंद्र गाडे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, कुलगुरू कार्यालयाचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आज संपन्न झालेल्या योग दिनासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे सर्व प्रशिक्षणार्थी स्त्री-पुरुष पोलीस, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य, आर्ट ऑफ लिविंग पतंजली, प्रजापिता ब्रह्मकुमारी, निरंकारी सेवा समिती यासह विविध संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.