
अकोला: मुलींसाठी कार्यरत असलेल्या स्थानीय संस्था जी.आय.ओ. (GIO) तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत रामदासपेठ पोलीस स्टेशन, अकोटफाइल पोलीस स्टेशन आणि जुनाशहर पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस अधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना फुले आणि प्रेरणादायी पुस्तके भेट देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमात जमात ए इस्लामी हिंद महिला विभाग, अकोला या संस्थेच्या जबाबदार सदस्यांनीही सहभाग घेतला आणि महिलांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय, जी.आय.ओ.च्या महिला सदस्यांनी शिवाजी कॉलेज, एल.आर.टी. कॉलेज आणि आर.जी.डी. कॉलेज येथे जाऊन तेथील प्राचार्या, शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांना भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमादरम्यान महिलांविरुद्ध वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करण्यात आली आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व धर्म आणि समुदायातील लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करण्यात आले. यामुळे देशाची प्रगती शक्य होईल आणि महिलांना योग्य सन्मान मिळेल. जी.आय.ओ.च्या शहर अध्यक्षा रवीश फातिमा यांनी सांगितले, “इस्लाम धर्मात महिलांचा सन्मान आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे. पैगंबर मुहम्मद ﷺ यांनी सांगितले आहे की, ‘तुमच्यात सर्वोत्तम माणूस तो आहे जो आपल्या स्त्रियांशी चांगल्या पद्धतीने वागतो.’ त्याचप्रमाणे, कुरआनमध्येही महिलांचे हक्क पूर्ण करण्यावर आणि त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागण्यावर भर देण्यात आला आहे.” या कार्यक्रमात जी.आय.ओ.च्या स्थानीय अध्यक्षा रवीश फातिमा, सचिव फरिहा हुसेन, संयुक्त सचिव तहरीम फातिमा, सदस्य मसीरा फातिमा, आसेमा तबस्सुम आणि महाराष्ट्र राज्य जैड ए सी सदस्या मोनिसा बुशरा यांनी सहभाग घेतला.