शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त ज्ञानोत्सव स्नेहसंमेलन दिनांक १७,१८ व १९ जानेवारी २०२४ या तीन दिवसात साजरा होत आहे. या जयंती उत्सवाच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष मा.हर्षवर्धन देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, उद्घाटक डॉ.शांतारामजी बुटे माजी प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय, अकोला. प्रमुखवक्ते डॉ.हेमंत खडके, मराठी विभाग, संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती, प्रमुख अतिथी ॲड.गजाननराव पुंडकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, मा.सुरेशदादा खोटरे, कार्यकारिणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, प्रा.सुरेश राउत सदस्य महाविद्यालय विकास समिती, अकोला. मा.अशोकराव देशमुख, सदस्य शाळा समिती सदस्य, मा.शिरीष धोत्रे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला, त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट, डॉ.किशोर देशमुख, समन्वयक जयंती उत्सव समिती, प्रा.अनिता दुबे, सहसमन्वयक, जयंती उत्सव समिती हे मंचावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मा.हर्षवर्धन देशमुख म्हणाले – “नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीचे स्वरूप हे जन्माध लोकांच्या स्पर्शावरून हत्तीचे वर्णन केल्यासारखे भासत आहे, कोणतेही शैक्षणिक धोरण प्राथमिक ते उच्च शिक्षण असा क्रम असावा परंतु येथे उच्च शिक्षणा पासून प्राथमिक शिक्षण असा उलट क्रम लावताना दिसतो आहे. हा सर्व प्रकार अनाकलनीय वाटतो. त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण हा म.फुले, शाहू महाराज आणि भाउसाहेबांचा शिक्षण विषयक विचार पुढील काळात टिकेल की नाही हा प्रश्न आहे. जो वर्ग सक्षम आहे, त्याचे ठिक आहे. तो व्यवस्थेत टिकेल. म्हणून मला असे वाटते मला शिखराची चिंता नाही तर पायथ्याची काळजी वाटते.’’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांनी केले. त्यामध्ये महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उल्लेख ‘शायनिंग स्टार’ असा त्यांनी केला. आणि महाविद्यालय, ‘एनइपी-२०’ च्या येणाऱ्या आव्हानासाठी आम्ही तत्पर आहोत, त्याची तयारीही आम्ही सुरू केलेली आहे.
डॉ.शांताराम बुटे यांनी उद्घाटनपर भाषण करताना त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आणि महाविद्यालयाचे वर्णन करताना ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळीयाशी आला.’ असे सार्थ वर्णन केले.
डॉ.हेमंत खडके यांनी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख यांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांना उद्बोधक अशा ओघवत्या शैलीमध्ये विशद केला. आणि भाउसाहेब देशमुखांच्या पत्रलेखनावर त्यांनी विशेष लक्ष वेधले. कार्यक्रमाची सुरूवात डॉ.पंजाबराव देशमुखांच्या गौरव गीताने डॉ.किशोर देशमुख यांनी आपल्या सुरेश स्वराने केली. आणि संपूर्ण परिसर भावना मग्न झाला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिता दुबे, सहसमन्वयक, जयंती उत्सव समिती यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.किशोर देशमुख यांनी केले. याप्रसंगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्राविन्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आजीवन सभासद, पालक, प्राध्यापक, व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.